Wednesday, May 22, 2013

विज्ञान क्षेत्राला प्राथमिकता देण्याची गरज

     जगात आता वैज्ञानिक आणि तांत्रिक ज्ञान आर्थिक स्रोत बनले आहेत. कुठल्याही देशाची वैज्ञानिक आणि तांत्रिक क्षमता त्याची आर्थिक प्रगती मोजण्याचे साधन बनले आहे. आपल्या देशात असं काय कमी आहे की, ज्यामुळे इथे विज्ञान, तंत्रज्ञान पोसलं जात नाहीये. पाश्‍चिमात्य देशांमध्ये आज जे विज्ञान आणि तंत्रज्ञान इतके पुढे पोहचले आहे, ते पुढे कसे गेले याचा अभ्यास केला पाहिजे.     शास्त्रज्ञ आणि अभियंता यांच्या संख्येच्या दृष्टीने विचार केल्यास हिंदुस्थान जगात तिसरा सर्वात मोठा देश आहे. परंतु विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत मात्र तो बरेच पिछाडीवर आहे. पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी भारतीय विज्ञान कॉंगे्रसच्या कोलकात्यातील शताब्दी महोत्सवी अधिवेशनात संबोधताना देशातल्या सामाजिक समस्यांच्या समाधानासाठी प्रयत्न केले जावेत, अशी विनंती शास्त्रज्ञांना केली आहे. यासाठी सरकारने विज्ञाननीती - २०१३ आखली आहे. त्यांनी विकेंद्रित पद्धतीने सार्थक विकासाला प्रोत्साहन मिळावे, अशी अपेक्षाही यातून व्यक्त केली आहे. यापूर्वीदेखील त्यांनी चीनने हिंदुस्थानला मागे टाकल्यावरून चिंता व्यक्त केली होती आणि वैज्ञानिक संशोधनावरचा खर्च एक टक्क्याने वाढवला जाईल, असे आश्‍वासन देत म्हटले होते. वास्तविक, अद्यापि या वाढीव खर्चाची रक्कम त्यांनी दिली नाही. खरे तर पहिल्यांदा देशात वैज्ञानिक शोध आणि आविष्कार यासाठीचे वातावरण तयार करण्याची गरज आहे. आपल्या देशातले तमाम शास्त्रज्ञ विदेशात निघून जातात. गेल्या वर्षाच्या अधिवेशनात त्यांनी विदेशात काम करणार्‍या अशा शास्त्रज्ञांना माघारी परतण्याचे आवाहन केले होते. ते अशा पोकळ आवाहनाने परतणेही शक्य नाही आणि अपेक्षेप्रमाणे ते परतले नाहीतच.
     मुळात आपले वैज्ञानिक विदेशात जातातच का, हा मोठा प्रश्‍न आहे. याचे उत्तर चार वर्षांपूर्वी रसायनमध्ये संयुक्तरीत्या नोबेल पारितोषिक मिळवलेल्या हिंदुस्थानी वंशाच्या वेंकट रमण रामकृष्णन या शास्त्रज्ञाने दिले होते. त्यांनी म्हटलं होतं की, हिंदुस्थानी शास्त्रज्ञांना लालफीतशाहीपासून मुक्तता आणि अधिक स्वायत्ततेची गरज आहे. देशातल्या वैज्ञानिक संस्था आणि राष्ट्रीय प्रयोगशाळा जोपर्यंत नोकरशाहीच्या तावडीत आणि नात्यागोत्यांनी ग्रस्त राहील तोपर्यंत हिंदुस्थानात विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विकासाचा रस्ता सापडणार नाही. देशात वैज्ञानिक शोध आणि आविष्कारासाठी पोषक वातावरण तयार करण्याची जबाबदारी अर्थात देशाची पर्यायाने पंतप्रधानांची आहे.
     आपल्या देशात आजच्या घडीला रामन, खुराना का निर्माण होत नाहीत, याचा गांभीर्याने विचार कधी झालाच नाही. इतक्या सगळ्या वैज्ञानिक संस्थांमध्ये इतक्या मोठ्या संख्येने असणार्‍या शास्त्रज्ञांचे संशोधन कोणत्या दिशेने चालले आहे आणि ही मंडळी तिथे काय करते, याचा देखील शोध घेतला गेला पाहिजे. एक तर ते काही करत नसले पाहिजेत किंवा आपल्या देशात वैज्ञानिक प्रगतीसाठी पोषक वातावरण नसले पाहिजे.
     जगात आता वैज्ञानिक आणि तांत्रिक ज्ञान आर्थिक स्रोत बनले आहेत. कुठल्याही देशाची वैज्ञानिक आणि तांत्रिक क्षमता त्याची आर्थिक प्रगती मोजण्याचे साधन बनले आहे. तांत्रिक ज्ञान आता व्यापाराचे हत्यार बनले आहे. म्हणूनच विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विकासाविना आता देशाची प्रगती अशक्य आहे. आपल्या देशात असं काय कमी आहे की, ज्यामुळे इथे विज्ञान, तंत्रज्ञान पोसलं जात नाहीये. वास्तविक, समाजच विज्ञान आणि तंत्रज्ञान कोणत्या दिशेला न्यायचं हे निश्‍चित करू शकतो.
जर अगदी लक्षपूर्वक विचार केला तर आपल्या लक्षात येईल की, पाश्‍चिमात्य देशांत यासाठी इतकी अनुकूल परिस्थिती होती, की त्यामुळे वैज्ञानिक विकास आवश्यक झाला होता. स्वातंत्र्याच्या आनंदात लोक साहसी प्रवासाला निघायचे. त्यांचा संपर्क जगात काही तरी नवे करण्याचा ध्यास घेतलेल्या लोकांशी व्हायचा. त्यातून त्यांना प्रेरणा मिळायची. त्यामुळे विकासाची एक नवी प्रक्रिया सुरू झाली. पश्‍चिमी युरोप आणि अमेरिका यांनी विज्ञान विकासाला जेवढे प्राधान्य दिले, तितके अन्य कुठल्या देशांनी दिले नाही. त्यांना या नव्या वैज्ञानिक संस्कृतीचे फायदे स्पष्ट दिसत होते. यामुळेच काही आणखी देशांनी त्यांचे अनुकरण केले. आपण मात्र या देशांच्या तर्‍हा स्वीकारल्या नाहीत. त्यामुळे या क्षेत्रात हिंदुस्थान कायम पिछाडीवरच राहिला. आज देशात ९०० पेक्षा अधिक विज्ञान संस्था, विद्यापीठांमध्ये विज्ञान - तंत्रज्ञान संशोधनावर काम चालले आहे. पण तरीदेखील जगातल्या विज्ञान साहित्यात आमचा साधा नामोल्लेख नाही. जगभरातल्या विद्यापीठांमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान संशोधन व विकासाचे काम होते. परंतु आपल्या इथली विद्यापीठे अथवा अभियांत्रिकी कॉलेजेस राजकारणाचे अड्डे बनले आहेत. इथे फक्त पदव्यांच्या भेंडोळ्या वाटल्या आणि विकल्या जातात. त्यामुळे तंत्रज्ञानाच्या बाबतीत आम्ही दुसर्‍या देशांवर अवलंबून आहोत. त्यासाठी आपल्याला मोठी किंमतही चुकती करावी लागते आहे. आज वीस हजारांपेक्षा अधिक तंत्रज्ञान विदेशातल्या कंपन्यांच्या सहाय्याने हिंदुस्थानी बनावटीच्या इंजिन अथवा अन्य वस्तूंमध्ये वापरले जात आहे. साधे आपण टूथपेस्ट, बूटपॉलिश, च्युइंगम, रंग अथवा शवपेटी बनवण्याचे तंत्रज्ञानदेखील आम्ही विकसित करू शकलो नाहीत. आम्ही कुठल्याही कामात सार्वजनिक भागीदारीला प्रोत्साहन दिलं नाही. नद्यांवर बांध घातले, रस्ते बनवले, पण चीनप्रमाणे आम्ही त्यांना लोकांशी जोडू शकलो नाही. याउलट आम्ही   निवडणूक जिंकण्यासाठी आणि पाठिंबा मिळवण्यासाठी जातीयवाद आणि धर्मवादाला प्रोत्साहन दिले. इथली अध्यापक आणि वैज्ञानिक मंडळी राजकारण्यांचे उंबरठे झिवत राहिली आणि विद्यार्थी मात्र कुठल्याशा विदेशी संस्थेचे सर्टिफिकेट मिळवण्यासाठी धडपड करत राहिले अथवा करताहेत. पोखरण अणुस्फोट, अंतरिक्ष उपग्रह आणि अग्निबाण निर्मितीत आमच्या शास्त्रज्ञांची विलक्षण क्षमता जगजाहीर आहे. आता आपल्याला गरज आहे ती आपली प्राथमिकता निश्‍चित करण्याची आणि त्यानुसार नीती ठरवून अंमलबजावणी करण्याची.

Sunday, May 19, 2013

बालकथा विचित्र शिक्षा

     एकदा बादशहा अकबरच्या सर्वात लाडक्या बेगमने तातडीने भेटायला येण्यासाठी म्हणून  एका सैनिकाकरवी  निरोप  धाडला.  बादशहा दरबारात होता. त्यामुळे तो सैनिक थेट दरबारात आला आणि बादशहाच्या कानात कुजबुजला. तातडीने बादशहा उठला आणि जायला निघाला. बादशहाची बेगमला भेटण्याची अतुरता पाहून बिरबलला हसू आले. ते पाहून बादशहाला संताप आला.  तो बिरबलला म्हणाला," माझा अशा प्रकारे उपहास करण्याची तुझी हिम्मतच कशी झाली? तू स्वतः ला समजतोस कोण? चल, आत्ताच्या दरबारातून चालता हो.  आणि पून्हा म्हणून   माझ्या राज्यात पाय ठेवायचा नाहीस. "
     बिरबलने बादशहाची आज्ञा शिरसावंद्य मानली आणि काही एक न बोलता  तो दरबारातून निघून गेला. बिरबलवर जळणार्‍यांच्या पोटात आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या. आता आपलेच राज्य ,असे म्हणत ते एकमेकांकडे पाहून गालातल्या गालात हसू लागले. आता बरेच दिवस झाले, पण बिरबल काही  दरबारात परतला नाही. आता बादशहाला त्याची उणीव भासू लागली. त्याची बिरबलाशिवाय म्हणजे मोडलेल्या कण्यासारखा अवस्था झाली. बादशहाची कोणतीही समस्या एका चुटकीसरशी सोडवणार्‍या बिरबलच्या अनुपस्थितीमुळे बादशहाला अनेक समस्यांशी सामना करावा लागत होता. प्रश्नांची सोडवणूक होत नसल्याने  अनेक प्रश्न रेंगाळत पडले होते.
     एकदा बादशहा महालाच्या खिडकीतून बाहेर पाहत असताना त्याला कोणी तरी रथात बसून रस्त्यावरून जात असल्याचे दिसले. त्याने लगेच सैनिकाला त्याची माहिती काढून आणावयास सांगितली. सैनिकाने परत येऊन तो बिरबल असल्याचे सांगितले. आता स्वतः बादशहा रस्त्यावर आला. आणि समोरून येणार्‍या बिरबलला अडवले. त्याला  बादशहा म्हणाला," माझ्या आज्ञेचं पालन केलं नाहीस." बिरबल म्हणाला," हुजुर, आपल्या आज्ञेची  मी कधीच अवहेलना  केली नाही. आपण मला आपल्या राज्याच्या जमिनीवर पाय न ठेवण्याची आज्ञा केली होती, म्हणून मी दुसर्‍या देशातील माती आणून रथात पसरली आहे आणि त्यावर मी उभा आहे. त्यामुळे मी आपल्या राज्याच्या मातीवर उभा राहण्याचा प्रश्नच येत नाही. आता माझे संपूर्ण जीवन मला याच रथावर  घालवावे लागणार आहे." बिरबलची ही चतुराई बादशहाला भारी आवडली. शेवटी बादशहा त्याच्या या चतुराईवर तर फिदा होता. बिरबल आपल्याला सोडून जाणार नाही, याची पक्की खात्री बादशहाला होती.
     तो बिरबलला म्हणाला," बिरबल, मी तुला दिलेली आज्ञा आत्ताच्या आत्ता मागे घेत आहे. आता उतर खाली" असे म्हणून त्याच्या उतरण्याची वाट न पाहता  बादशहा स्वतः बिरबलजवळ गेला आणि त्याला हाताला धरून खाली उतरवले. बिरबल खाली उतरताच बादशहाने बिरबलला मोठ्या प्रेमाने  अलिंगन दिले. दुसर्‍यादिवशी बिरबल हसतमुखाने दरबारात आलेला पाहून त्याच्यावर जळफळाट करणार्‍यांची तोंडे मात्र पाहण्यासारखी झाली होती.

Friday, May 17, 2013

माकडाचा पराक्रम

     चिन्नी फार गोड मुलगी होती. तिला कोणी बाहुली म्हणायचं, तर कोणी परी म्हणायचं. घरातले सगळेच तिच्यावर जीवापाड प्रेम करायचे. अशा चिन्नीकडे खेळणीही सुंदर सुंदर होती. डोळे मिचकावणारी बाहुली, डमरू वाजवणारे अस्वल, झुक-झुक करत शिट्टी वाजवणारी आगगाडी अशी भरपूर खेळणी तिच्याकडे होती. तिला ती सगळी खेळणी आवडायची. पण फक्त टाळ वाजवणारं माकड मात्र आवडत नसे.
     टाळ वाजवणा-या त्या माकडाला पाहिलं की, तिचा संताप व्हायचा. ते माकड चावीवर चालायचं, पण त्याच्यात एक खोड होती. चिन्नी त्याला चावी द्यायची, तेव्हा ते टाळ वाजवायचं नाही. गप्प राहायचं. पण चिन्नी कसल्या तरी कामात असली किंवा झोपलेली असेल तर मात्र ते हमखास टाळ वाजवायला सुरुवात करायचं. त्यामुळे तिला माकडाचा मोठा राग यायचा. तिला वाटायचं, फेकून द्यावं कोठे तरी याला! पण ती फेकूनही देऊ शकत नव्हती. कारण ते तिला तिच्या आजीने मोठया प्रेमाने वाढदिवसाला दिलं होतं.
     एक दिवस चिन्नी खेळण्यांशी खेळत बसली होती. तिने विचार केला, चला, माकडाला पुन्हा एकदा चावी देऊन पाहू. नाही तरी त्याचा त्रासच आहे नुसता! आता शेवटचा प्रयत्न करून पाहू. नाही तर अडगळीच्या खोलीत फेकून देऊ. असा विचार करून तिने माकडाला हातात घेतलं. त्याला चावी दिली आणि त्याला खाली सोडलं. पण कसलं काय! माकड मख्ख उभं. त्याने टाळ वाजवलंच नाही.
     चिन्नी रागारागाने उठली आणि माकडाला उचललं. तरातरा जात त्याला अडगळीच्या खोलीत फेकून आली. सगळ्या खेळण्यांना माकडाविषयी चीड होतीच. ते माकड कधीही उठायचं आणि टाळ वाजवून सगळ्यांनाच त्रास द्यायचं. त्यामुळे बाकी खेळणीही त्याला वैतागलेली होती. त्याला चिन्नीने अडगळीच्या खोलीत फेकून दिल्याने सगळ्यांनाच आनंद झाला. डोळे मिचकावणा-या बाहुलीने त्याच आनंदात अनेकदा डोळे मिचकावले. अस्वल डमरू वाजवत नाचू लागलं. झुक-झुक आगगाडीने शिट्टी वाजवली.
     रात्री खाणं-पिणं झाल्यावर चिन्नी सगळ्या खेळण्यांना पुढय़ात घेऊन झोपी गेली. पण अडगळीच्या खोलीत पडलेल्या माकडाची झोप उडाली होती. आपण योग्य वेळेला टाळ वाजवू शकत नाही, म्हणून ते स्वत:ला दूषणं देत होतं. दु:खात ते उशिरापर्यंत जोरजोराने रडत राहिलं. पण त्याचं ते रडणं ऐकायला, तिथं कोणी नव्हतंच!
     दु:ख आवरून माकड शांत झालं, तोच त्याच्या कानावर कसला तरी आवाज पडला. त्याने थोडं वाकून पाहिलं तर त्याला घरात दोन चोर घुसले असल्याचं दिसलं. घरातले सगळेच झोपलेले होते.
     माकडाला आता काय करावं काही सुचेना. घरातल्यांना जागं करावं आणि चोरांना पकडून द्यावं, असं त्याला फार वाटत होतं, परंतु ते काहीच करू शकत नव्हतं. ते चिन्नीच्या खोलीपर्यंत जाऊनही आलं, पण तिचा दरवाजा आतून बंद होता. तेवढय़ात त्याला एक आयडिया सुचली. त्याने स्वत:ला एखाद्या बाटलीला हलवावं, तसं हलवलं. पुढं-मागं झुकवलं. हात हलवण्याचाही प्रयत्न केला. तरीही हात काही हलले नाहीत. पण त्याने हार मानली नाही. पुन्हा प्रयत्न करण्याचं ठरवलं. आता नाही तर कधीच नाही. कारण आता या लोकांना मदत केली नाही तर आपल्या जीवनाला मग कसलाच अर्थ राहणार नाही.
     आपण निरुपयोगी ठरू, असा विचार करून त्याने पुन्हा हात हलवून टाळ वाजवण्याचा प्रयत्न केला. आणि काय आश्चर्य! टाळ वाजू लागले. एवढंच नव्हे तर टाळ वाजणं थांबतच नव्हतं. मग काय! घरातले सगळे लहानथोर माकडाच्या दंग्याने जागे झाले. त्याला गप्प करण्यासाठी सगळेच त्याच्या दिशेने धावले. पण ते माकड चोर जिथे होते, तिथे घरंगळत जाऊन पोहोचलं. झालं, चोर आयते तावडीत सापडले. घरातल्या सगळ्या सदस्यांनी त्या चोरांना चांगलंच बदडून काढलं.शेवटी पोलिस आले. चोरांना त्यांच्या ताब्यात दिलं. पोलिस गेल्यावर माकड चुपचाप अडगळीच्या खोलीकडे जाऊ लागलं. तेवढय़ात चिन्नीने त्याला हाक मारली, ‘अरे हे काय? तुझी जागा अडगळीच्या खोलीत नाही, तर माझ्याजवळ आहे. सॉरी, मला माफ कर’.
     माकडाच्या डोळ्यांतून अश्रूधारा वाहू लागल्या. ते म्हणालं, ‘मी नेहमीच चुकीच्या वेळी टाळ वाजवून तुला त्रास देत असतो. त्यामुळे माझी जागा तिथेच योग्य आहे’. चिन्नी म्हणाली, ‘अरे, प्रत्येकात काही ना काही खोड असते. तशी माझ्यात देखील आहे. पण तू तर आज कमालच केलीस. यामुळे तू मला आवडू लागला आहेस. आता यापुढे एक क्षणही तुला दूर लोटणार नाही. नेहमी तुला माझ्याजवळ ठेवीन’. असं म्हणत चिन्नीने त्याला उचलून कडेवर घेतलं आणि आपल्या खोलीत आली. त्याला एका खास जागेत ठेवलं. त्याला पाहिल्यावर बाकी सगळ्या खेळण्यांचा जळफळाट झाला, पण चिन्नीने त्याचा पराक्रम सांगितला. तेव्हा सगळेच कौतुक करायला त्याच्याकडे सरकले.

Thursday, May 9, 2013

विकासाच्या पोकळ बाता

     नऊ वर्षांपासून देशाचे सरकार चालवणारे पंतप्रधान मनमोहन सिंग आणि कॉंग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी देशाच्या वर्तमान समस्यांवर तोडगा कसा काढला जाणार आहे हे अजूनही सांगू शकलेले नाहीत. देश आणि उद्योग क्षेत्रातील निराशा, त्याचबरोबर हतबलता हा जो माहोल देशात निर्माण झाला आहे तो दूर सारण्यासाठी त्यांनी कुठली पावले उचलली आहेत किंवा पुढे काय करणार हे काहीच त्यांनी सांगितलेले नाही.