Thursday, February 11, 2016



 मानसिक परिवर्तनाशिवाय थांबणार नाही भ्रष्टाचार
 भ्रष्टाचार संपविण्यासाठी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याची गरज असून, भ्रष्टाचार करणार नाही आणि होऊ देणार नाही, असे मानसिक परिवर्तन झाल्याशिवाय भ्रष्टाचार थांबणार नाही. सर्वत्र भ्रष्टाचार सुरू राहिला, तर नागरिकांनी कर का भरावा, असा संतप्त सवाल एका जामीन अर्जाच्या सुनावणीदरम्यान मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्या. अरुण चौधरी यांनी गत आठवड्यात विचारला. भ्रष्टाचाराचा ’कॅन्सर’ केवळ कायदे करून थांबणार नाही, त्यासाठी मानसिकतेत बदल आणि भ्रष्टाचार करणारांविरुद्ध कठोर कारवाई होण्याची गरज आहे. भ्रष्टाचाराला थांबविण्यासाठी कर न भरण्याचा उपाय होणार नाही, तर सरकारने भ्रष्टाचारविरोधी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी व प्रभावी उपाययोजना करण्याची गरज आहे. प्रत्येक क्षेत्रात पारदर्शकता असल्यास भ्रष्टाचाराला आळा बसणार असून, भ्रष्टाचाराविरोधात जनगजागृतीची गरज आहे. भ्रष्टाचार करणार नाही आणि होऊ देणार नाही, अशी नागपूर हायकोर्टाची टिप्पणी समाजातील प्रत्येक घटकाला आत्मचिंतन करण्यास भाग पाडणारी आहे. भ्रष्टाचार थांबवून सामान्यांना न्याय मिळाला पाहिजे. कर जमा करावाच लागेल. भ्रष्टाचार करणार नाही अन् करूही देणार नाही,असा निश्चय केल्यास गैरप्रकारांना आळा बसेल.   


 झटपट श्रीमंतीच्या मृगजळापासून फायदा नाहीच!
 झटपट श्रीमंत व्हायचे असेल, तर मल्टीलेवल मार्केटिंगसारखे दुसरे काहीच नाही, असे सांगितले जात असले तरी हे फक्त मृगजळासारखेच आहे. यात पैसा गुंतविताना सावधानता बाळगणे गरजेचे आहे. अनेक अशा बाबी आहेत, की ज्यामुळे मल्टीलेवल मार्केटिंग म्हणजे व्यवसायापेक्षा फसवणूक जास्त, हे सिद्ध करतात.
 इतर व्यावसायिक पद्धतीपेक्षा मल्टीलेवल मार्केटिंग ही सोपी व जास्त फायद्याची आहे, असे सांगितले जाते. मात्र, केवळ 1 टक्काच लोकांनी अशा योजनातून फायदा मिळविला आहे. जे सुरुवातील अशा योजनात गुंतवणूक करु शकले, त्यांनाच भरपूर कमाई झाल्याची उदाहरणे आहेत. दुसरी अजून एक बाजू सांगितली जाते, की नेटवर्किंग मार्केटिंग ही उत्पादन वेगाने विकण्याची सर्वात प्रभावी आणि प्रसिद्ध पद्धत आहे. लोकांचा अशा सरळ पद्धतीने मिळालेल्या उत्पादनांवर विश्वास असतो. परंतु, अशी थेट किंवा घरोघरी उत्पादने विकण्याची पद्धत कालबाह्य ठरलेली आहे. लोकांच्या खरेदीच्या सवयी आता बदलल्या असून, वस्तू घेताना त्यात वैविध्य, किंमत, बजेट सार्‍याच गोष्टी तपासल्या जातात. त्यामुळे तर आता ऑनलाइन खरेदीचे मार्केटही गेल्या काही वर्षात अब्जावधींची उलाढाल करीत आहे. मुळात मल्टीलेवल मार्केटिंग हे उत्पादन विकण्यापेक्षा नवीन सदस्य जोडण्यावर जास्त भर देते. दुकानापेक्षा जास्त उत्पादने ही मल्टीलेवल मार्केटिंगने विकल्या जातात आणि त्यासाठी जाहिरातीचा कोणताही खर्च होत नाही, हे आणखी एक असत्य आहे. जेवढी उत्पादने योजनांद्वारे विकल्या जातात, त्याचे प्रमाण एकदम नगण्य आहे. त्यासारख्याच उत्पादनाची रिटेल व होलसेल मार्केटमध्ये मोठी विक्री होत असते. अशा योजनांमध्ये सदस्य झालेला एखादा एजंट मात्र सामान्य गुंतवणूकदारांच्या फक्त गुंतवणुकीकडे लक्ष देऊन असतो. त्याला उत्पादन विकण्यापेक्षाही फक्त समोरच्याला आपल्या चेनमध्ये समाविष्ट केल्यास आपले उत्पन्न वाढेल, एवढाच उद्देश असतो. हे उत्पादन दुसर्‍याचे उपयोगाचे आहे किंवा नाही, त्याचा दर्जा, टिकाऊपणा ह्या केवळ बोलण्याच्याच गोष्टी असतात. त्यामुळे सामान्य माणूस सदस्य झाल्याबरोबर तोही दुसरे कुणी गळाला लागतो काय, याचीच चाचपणी करत फिरतो. या सर्व चक्रात उत्पादनाला काही महत्त्व राहत नसते. ते फक्त सदस्य जोडण्याचे माध्यम म्हणून राहते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्यावेळी लोक अशा कंपन्यांचे सभासद होतात, तेव्हा त्यांना सुखसमृद्धीचा आणि जीवनात आनंद निर्माण करण्याचा हा मार्ग असल्याचे भासविले जाते. तुम्हाला बंगला, कार, विदेशयात्रा, महागड्या वस्तूंचे स्वप्न दाखविले जाते. मात्र, अशा योजनात फसले तर स्वत:चा पैसाही जातोच आणि ज्यांना तुम्ही सभासद बनवून घेतले आहेत, त्यांच्याशीही संबंध खराब होतात. उच्चभ्रू राहणीमान तर सोडाच घराच्या बाहेरही निघणे मुश्कील होते. काही प्रसंगी तर तुरुंगाची हवा खावी लागूशकते.

                                                                       

No comments:

Post a Comment