Sunday, January 8, 2017

रस्ते अपघात प्रलयांपेक्षा भयंकर


जगभरात वर्षाला साडेबारा लाख लोक रस्ते अपघातात मरण पावतात.जखमींचा आकडा त्यापेक्षा कित्येक पटींनी जास्त आहे. या जगाने दोन महायुद्धे पाहिली.सुनामी,भुकंपासारखे मोठे प्रलय पाहिले,पण अपघातातील बळींची संख्या ही या प्रलयांपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. त्यामुळे रस्ते सुरक्षा ही काळाची गरज आहे. रस्ता अपघातांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यावर आपल्या लक्षात ये ईल की, या अपघातातील बळींमध्ये तरुणांची संख्या मोठी आहे. ही मोठी दुर्दैवाची बाब आहे. 15 ते 28 या वयोगटातील बळींची संख्या आपली चिंता वाढवणारी आहे. दरवर्षीच्या एकूण रस्ते अपघातापैकी 15 ते 44 या वयांतल्या व्यक्ती मरण पावण्याचे प्रमाण 72 टक्के आहे. करायला-सावरायला आलेली ही पिढी अशी रस्ते अपघातांची बळी ठरत असल्याने कुटुंब,समाज आणि देशाचे मोठे नुकसान करणारे आहे. स्वत:ची कर्तबगारी दाखवण्याचे,भरभराट करण्याचे,देशाच्या प्रगतीत योगदान देण्याचे हे वय असते. ही एक प्रकारे राष्ट्रीय हानीच म्हणायला हवी.हे टाळण्यासाठी व्यापक प्रमाणात जनजागृती करण्याची गरज आहे. दरवर्षी जानेवारी महिन्यात राज्य महामार्ग पोलिस दलाकडून रस्ता अभियान राबवण्यात येते.मात्र यात फारसा दम नसतो. कुठे तरी औपचारिक कार्यक्रम उरकले जातात. ग्रामीण भागात तर याचा मागमूसच नसतो. त्यामुळे या रस्ता अपघाताबाबत सर्व स्तरातून जागृतीचा उठाव झाला पाहिजे.लोकप्रतिनिधी,सामाजिक संस्था, शाळा-महाविद्यालय, अन्य शासकीय-खासगी कंपन्यांमधून याबाबत मोठ्या प्रमाणात जागृती व्हायला हवी आहे.
रस्त्यावर वाहन चालवताना सगळे व्यवधान समोर असले पाहिजे. आणि मुळात म्हणजे नशापान करून वाहन चालवू नये, यावर अधिक भर दिला पाहिजे. वेगावर नियंत्रण मिळवले की,संभाव्य अपघातातून  बर्याच गोष्टींना नियंत्रणात आणता येते.तरुण पिढी भन्नाट वेगाची दिवानी आहे.त्यांना त्यांच्या भावी कर्तबगारीची,भरभराटीची जाणीव व्हायला हवी आहे,त्यांना ती करून देण्यासाठी पोलिसांसह, शिक्षक-प्राध्यापक,वक्त्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. कोणतीही गोष्ट शिकण्यासाठी ती शालेय स्तरापासूनच विद्यार्थ्यांत बिंबवली तर ते आयुष्यभर त्यांच्या लक्षात राहते. तिसाव्या किंवा चाळीसाव्या वर्षात नवीन काही शिकण्याची ऊर्मी त्यामानाने कमी झालेली असते.त्यामुळेच रस्ते सुरक्षा नियमांची माहिती देण्यापासून त्यांना प्रत्यक्ष फिल्डवर आणून प्रॅक्टिकल घेतले जायला हवे.
अपघातात अगदी लहानसहान चुकांमुळे होत असतात. पण त्यामुळे एखाद्याला प्राणाला मुकावे लागते.नेमक्या याच चुका टाळण्यासाठी जागृतीला महत्त्व आहे. हेल्मेट न घालणे,रस्ता ओलांडताना झेब्रा क्रॉसिंगचा वापर,नशापान करून गाडी चालवणे,सिग्नल तोडणे,अतिवेग,नजरेसमोर अपघातात झाल्यावर त्याकडे दुर्लक्ष करून पुढे जाणे,पोलिसांना मदत न करणे अशा अनेक बाबी वाहनचालक किंवा लोकांकडून घडतात. जागृती करतानाच पोलिसांनीही कायद्याची कसून अंमलबजावणी करायला हवी. त्याशिवाय वाट चुकलेला माणूस सरळ मार्गावर येणार नाही. चिरीमिरी किंवा वरिष्ठांच्या,पुढार्यांच्या दवाबाला बळी न पडता त्यांनी आपले कर्तव्य त्यांनी चोख बजावायला पाहिजे. कर्तव्यदक्ष कर्मचार्यांची सुरक्षितता वरिष्ठांनी जपली पाहिजे.
आणखी एक महत्त्वाचे म्हणजे पोलिसांकडे मनुष्यबळाची मोठी कमतरता आहे. वाहतूक मदत केंद्रांचा अभाव आहे.शासनाने याकडे लक्ष देऊन या भरती प्रक्रिया राबवली पाहिजे. सुसज्ज प्रशिक्षित मनुष्यबळ आणि मदत केंद्रांची संख्या वाढवली पाहिजे. वाहने उपलब्ध करून देतानाच पोलिसांपुढे आलेल्या अडचणींचा निपटारा केला पाहिजे. वाहनधारकांनीही आपली स्वत:ची काळजी घेतली पाहिजे. लवकर घरी जाण्याची घाई करण्यापेक्षा आपण सुरक्षित घरी जातोय की नाही, हे बघितले पाहिजे. आपली घरी कोणीतरी वाट पाहात आहे, हे कायम लक्षात ठेवले पाहिजे.

No comments:

Post a Comment