Wednesday, January 4, 2017

अशी ही मैत्री


बालकथा                                             
     एक फार मोठा समुद्र होता. त्याचं पाणीदेखील फार  सुंदर होतं. आभाळासारखं  निळं निळशार होतं. त्यात खूप प्रकारचे रंगीबेरंगी मासे होते. त्यात काही डॉल्फिनही होते. एक डॉल्फिन तर फारच सुंदर होता, पांढर्‍याशुभ्र  रंगाचा! तिथेच जवळ असलेल्या एका  गावात एक सुंदर, गोड  मुलगी राहात होती. तिचं नाव पार्वती! पार्वती डॉल्फिनला पाहायला रोज समुद्रकाठी यायची. त्याला रोज काही ना काही खाऊ घालायची. दोघांमध्ये दाट मैत्री झाली होती. पार्वतीने आपल्या मित्राचे नाव चिकप्पा ठेवले होते. चिकप्पादेखील रोज पार्वतीची  वाट पाहायचा.तिला रोज पाण्यातला नानाविध कसरती दाखवून तिचे मनोरंजन करायचा. पार्वती ते पाहून फार आनंदून जायची. हळूहळू पार्वतीला चिकप्पाची भाषादेखील समजू लागली होती. त्यामुळे त्यांच्यांमधली मैत्री आणखी घट्ट झाली होती.
     एक दिवस अचानक समुद्रात मोठं वादळ आलं. चिकप्पा पाण्यात निघून गेला, पण पार्वती समुद्रात कुठे वाहून गेली. ती वाहत- वाहत एका दुसर्‍या किनार्‍याला लागली. तो किनारा निर्जन होता. तिला खूप भिती वाटू लागली. भितीने रडू लागली. चिकप्पाचा धावा करू लागली. चिकप्पा पार्वतीला शोधत शोधत तिथे पोहचला. दोघांनाही फार आनंद झाला. तेवढ्यात कुठूनसे समुद्रीचाचे आले आणि त्यांनी पार्वतीला पकडले. चिकप्पा  त्यांच्याजवळ गेला. ते त्याला पकडणार, तोच तो सुळ्ळकन पाण्यात निघून गेला. अशाप्रकारे तो त्यांना चकवत राहिला, दमवत राहिला. त्याने त्यांना उशीरापर्यंत दमवून दमवून बेजार करून टाकले आणि संधी मिळताच पार्वतीला आपल्या पाठीवर बसवून तिथून पसार झाला. थोड्या वेळातच ते  पहिल्या किनारी पोहचले. आता दोघेही पहिल्यासारखे आनंदात राहू लागले. 

No comments:

Post a Comment