Saturday, January 14, 2017

(बालकथा) ढोंगी साधू


     राजा कृष्णदेवराय साधू-संतांचा मोठा आदर करायचा. त्यांना राज्यात आश्रय मिळायचा. भोजन आणि वस्त्रेदेखील मिळायची. हे पाहून निरुद्योगी, ऐतखाऊ माणसे साधू बनली होती. राजाच्या जीवावर मौजमजा करत होती.
    याचा परिणाम असा झाला की, साधू-संतांवरचा खर्च वाढला.राजा काळजीत पडला.राजाने हा विषय राजदरबारात मांडला.दरबारी म्हणाले, ‘ महाराज, नकली साधूंना राज्यातून हाकलून लावल्यास खर्च आटोक्यात येईल.
‘असली-नकली साधू-संत कसे ओळखायचे?’ राजाचा प्रतिसवाल.
तेनालीरामला नेहमीच दातांत धरून बसलेल्या दरबारी मंडळींनी या कामी तेनालीरामची नियुक्ती करण्याची शिफारस केली.राजाने तेनालीरामवर ही कामगिरी सोपवली.
तेनालीरामने राज्यातल्या साधूंची शिरगणती केली.मग राज्यात दवंडी पिटवली,‘ राज्यातल्या प्रत्येक साधूच्या गळ्यात राजाची प्रतिमा असली पाहिजे. ज्याच्या गळ्यात राजाचा फोटो असणार नाही, त्याला भोजन मिळणार नाही. वस्त्रे मिळणार नाहीत.
दुसर्या दिवशी भोजनाला आलेल्या साधूंच्या गळ्यात राजाची प्रतिमा दिसली.तेनालीरामने साधूंची गिणती केली.गिणतीनुसार बारा साधू कमी होते.
तेनालीरामने शिपाई पाठवून त्या बारा जणांना बोलावून घेतले.साधू आल्यावर त्यांना तेनालीरामने विचारले, ‘आपण भोजनाला का नाही आलात?
आम्ही परमेश्वराचे भक्त आहोत. आमच्या ध्यानी-मनी फक्त परमेश्वर आहे. मग आम्ही आमच्या गळ्यात राजाचा फोटो का लटकवावा? अशा घमेंडी राजाच्या अन्नाचा एक कणदेखील आम्हाला निषिद्ध आहे. पाप आहे,’ साधू म्हणाले.
तेनालीरामने त्या साधूंना राजाकडे नेले. तो राजाला म्हणाला, ‘महाराज, खरे साधू हे आहेत.
मग त्याने सगळी हकिकत राजाला ऐकवली. राजाने बारा साधूंचा आदर-सत्कार केला. आणि बाकीच्या नकली साधूंना राज्याबाहेर हाकलून लावले. तेनालीरामची तोंडभरून स्तुती केली.
यानंतर मात्र निरुद्योगी लोकांनी साधू बनण्याची हिम्मत कधी केली नाही.
                                                                                                                                           -मच्छिंद्र ऐनापुरे, जत
पत्ता-संभाजी चौक, के.एम.हायस्कूलच्या पाठीमागे,जत ता.जत जि.सांगली 416404




No comments:

Post a Comment