Friday, January 6, 2017

आजची पत्रकारिता चिंता करण्यासारखी...


      विधिमंडळ, न्यायालय, प्रशासन हे आपल्या देशाच्या लोकशाहीची तीन स्तंभ आहेत. यानंतर मान्यता नसला तरी मानला गेलेला चौथा स्तंभ आहे,प्रसारमाध्यम. यात प्रिंट,दृकश्राव्य,सोशलमाध्यमांचा समावेश आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात प्रिंटमाध्यमांना महत्त्व होते. आता त्यात टीव्ही आणि सोशलमाध्यमांची भर पडली आहे. या माध्यमांचा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जात असल्याने त्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले असले तरी आजची पत्रकारिता लोकशाहीची बूज राखणारी आहे, असा प्रश्न पडतो. समाजात घडणार्या अविधायक,भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचार याला वाचा फोडून संबंधितांना न्याय मिळवून देण्याचे व्रत या माध्यमाने स्वीकारायचे आहे. मात्र हे माध्यम व्रत राहिलेले नाही, तो धंदा झाला आहे, हे कोणीही नाकारणार नाही. आज ही माध्यमे जाहिरातीशिवाय चालत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. जाहिराती असायला हव्यात,त्याशिवाय वृत्तपते किंवा टीव्ही चॅनेल्स चालणार नाहीत,ही वस्तुस्थिती आहे.मात्र त्या किती हव्यात, याला महत्त्व आहे. वृत्तपत्राचे पहिले पानदेखील जाहिरातीसाठी रिझर्व्ह होत असल्याने या लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाविषयी नागरिकांना थोडी काळजी वाटणं स्वाभाविक आहे. जिथे संसद,न्यायालय आणि प्रशासन यांच्या कारभाराविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, तिथे आता चौथ्या स्तंभाविषयी तरी का काळजी करावी, असा प्रश्न असला तरी या स्तंभाविषयी अजूनही काही थोडी फार विश्वासाहर्ता आहे,ती टिकून राहिली पाहिजे, असेच वाटते. समाजात घडत असलेल्या घडामोडींचे वास्तव लोकांसमोर आणून त्यातील उणीवा उजागर करण्याचे महत्वपूर्ण कार्य प्रसारमाध्यमांनी करावे, अशी आजही अपेक्षा व्यक्त केली जात आहे. कारण या माध्यमांशिवाय दुसरा कोणी हे कार्य करणारे नाही.खरे तर  याच माध्यमातून ब्रिटीशकाळात लोकमान्य टिळक, बाळशास्त्री जांभेकर, यांनी वर्तमानपत्रांना समाजाचा आरसा बनविण्याचे महत्वपूर्ण कार्य केले. त्या काळच्या वृत्तपत्र चालकांनी वृत्तपत्राच्या माध्यमातून देशाला स्वराज्य मिळवून दिले. आज मात्र धनदांडग्या वृत्तपत्र चालकांनी याच माध्यमातून त्या स्वराज्याला सुराज्य करण्यासाठी या माध्यमाचा वापर करण्यापेक्षा स्वत:च्या स्वार्थासाठी व राजकारणासाठी करुन घेतला आहे, अशीच परिस्थिती समोर येताना दिसत आहे. याला काही सन्माननीय वृत्तपत्रे किंवा त्याचे चालक अपवाद आहेत, मात्र ही संख्या फारच नगण्य आहेबडी म्हणविली जाणारी माध्यमे याबाबतीत आघाडीवर आहेत. सत्ता आणि पैशाच्या हव्यासापोटी पत्रकारिता कर्म न राहता धंदा बनला आहे.
    ग्रामीण पत्रकारांना अल्प मानधनात वर्षोगणती वापरुन त्यांना वेठबिगाराची वागणूक देऊन त्यांच्या कडून लाखोच्या घरात जाहिरातीचा मिळविणारे व स्वत:चा नंबर एक असल्याचा किंवा आघाडीवर असल्याचा उल्लेख करणारे महाभाग कमी नाहीत. आजचा मजूर रोज तीनशे रुपये सहज मिळवतो,मात्र वृत्तपत्रांसाठी किंवा टीव्ही माध्यमांसाठी काम करणारा ग्रामीण पत्रकार कितीही राबला तरी रोज तीनशे रुपये मिळवू शकत नाही. अल्पवेळ वार्ताहर म्हणून त्याची तुटपुंज्या मानधनावर बोळवण केली जाते. यातून त्याच्या फोन,फॅक्स किंवा घरचे लाईटबीलही भागत नाही. ग्रामीण वार्ताहराच्यामागे जाहिरातीचा भुंगा मागे लावून अनेक वृत्तपत्रे अत्यल्प मानधन ग्रामीण तालुकास्तरावरील पत्रकारांना देऊन आपली पोळी भाजून घेताना दिसत आहेत. आपला वाढीव खप दाखवून जाहिरातीच्या दरात अव्वाच्या सव्वा वाढ करुन घेणारेही कमी नाहीत. राष्ट्रीय पातळीवरील इंग्रजी दैनिके व नियतकालिके याबाबतीत खूपच आघाडीवर आहेत. पूर्वी वर्तमानपत्रात 20 टक्के जाहिरात तर 80 टक्के सामाजिक व वाचनीय मजकुर असायचा. आता त्याच्या उलट परिस्थिती झाली आहे. नव्हे  पहिल्या पानापासून तर शेवटच्या पानापर्यंत जाहिरातींचाच भरणा असतो. वृत्तपत्र चालविण्यासाठी जाहिरात आवश्यक आहे हे अमान्य करता येणार नाही पण मग समाज प्रबोधनाचे काय, हा प्रश्न उरतोच. त्यामुळेच काही सन्माननीय अपवाद वगळता धंदेवाईक पत्रकारांनीच पत्रकारितेची विश्वासार्हता धोक्यात आणली आहे.
     देशात 14 हजाराच्या वर वृत्तपत्रे आहेत. तसेच 600 च्या वर टि.व्ही. चॅनेल असल्याची माहिती आहे. जसे राजकीय पक्षांचे पीक फोफावले आहे तसेच माध्यमांचे पीकही फोफावते आहे.प्रामुख्याने प्रिंट मिडीया, इलेक्ट्रानिक मिडीया व सोशल मिडिया असे माध्यमांची तीन भाग पडतात. त्यामध्ये सर्वाधिक विश्वासार्हता म्हणून प्रिंट माध्यमांकडे पाहिले जाते. त्यामुळेच प्रिंट मिडियातील छापील पुरावा न्यायालयातही वेळोवेळी ग्राह्य मानला जातो.पिंट्र मिडियाचा स्वातंत्र्यपूर्व काळ व स्वातंत्र्योत्तर काळ यात बरीच तफावत झाली आहे. स्वातंत्र्पूर्व काळात हे मिशन व ध्येय होते तर आता कमिशन व धंदा झाला आहे. आता वृत्तपत्र हे वस्तू म्हणून लाँच केले जाते व विकले जाते.आजच्या महागाईच्या तुलनेत त्याची तशी किंमतही कमी असली आणि वस्तू म्हणून स्वस्तात उपलब्ध होत असली तरी या वस्तूच्या उत्पादनाची किंमत जाहिरातदारांकडून तसेच बातमी छापून यावी असे वाटणार्या कडून अर्थात पेड न्युज माध्यमाने वसूल केली जात आहे. या प्रकारामुळेच वृत्तपत्रांची विश्वासार्हता धोक्यात आली आहे. निवडणूक काळात हा प्रकार मोठया प्रमाणात होत असतो. अनेक वेळा तर निवडणुक काळात एकाच वृत्तपत्रात सर्वच उमेदवारांचे पारडे जड दाखविण्यात येते. निवडणुकीतला जनमानसातला कल आजकाल वृत्तपते व्यक्त करताना दिसत नाहीत. सगळे पक्ष किंवा उमेदवार निवडणून येणार अशाच प्रकारचे लिखाण मांडलेले आढळते. त्यामुळे वृत्तपत्राचा धंदा आता सामान्य वाचकांच्याही लक्षात आला आहे.

      वास्तविक दैनंदिन जीवनात प्रसारमाध्यमांचे महत्व खुप वाढत असतांना त्याची विश्वासार्हता मात्र कमी होत जाणं ही चिंताजनक बाब आहे. तेव्हा विश्वासार्हता टिकविण्याचे मोठे आव्हान या माध्यमांसमोर आहे. पत्रकारिता क्षेत्रातील लहान मोठया पत्रकारांची एकूणच वागणूक, राहणीमान, व्यसनपुर्तीसाठी रोजची जुळवा जुळव, दलालीचे तंत्र आदी प्रकारामुळे हे पत्रकार आपल्याला न्याय मिळवून देतील असा विश्वास जनतेत कमी होत आहे. पत्रकार स्वत:चे भले करुन घेतात. आपली माहिती दुसर्याला पुरवितात. काही मोठया पत्रकारांनी तर लाखोची माया गोळा केली असा आरोप पत्रकारांवर केला जात आहे. तात्पर्य, पत्रकारांबद्दल आदरयुक्त भीती ओसरली आहे. याला पत्रकारच जबाबदार आहेत.आता तर हवसे, नवसे, गवसेही या क्षेत्रात उतरले आहेत. पत्रकारितेतला प ज्याला  कळत नाही तोही आता आपले काळे बेरे धंदा लपवण्यासाठी स्वता:चे वृत्तपत्र काढतो आहे किंवा  बातमीदार बनतो आहे. सामुहिक ट्रेंडही काही ठिकाणी रुजु झाला आहे. नवशिके पत्रकार जवळच्या पत्रकाराची बातमी जशीच्या तशी प्रकाशित करण्याचा प्रकार वाढीस लागला आहे. यालाही पत्रकाराच जबाबदार आहेत. पत्रकार हुशार असतात. काय केल्याने काय होते, समाजात कसे राहावे, ज्याने आत्मसन्मान राखता येईल. पत्रकाराचे कर्तव्य काय, हे सर्व पत्रकारांना कळते. मात्र वैयक्तिक स्वार्थ साधून श्रीमंत होण्याच्या प्रकारात त्यानीही स्वत:ला सहभागी करुन घेतले आहे. काही सन्माननीय पत्रकार वगळता अनेक पत्रकारांनीच विश्वासार्हता धोक्यात आणली आहे. एवढे मात्र खरे की, शेवटी सर्व कळूनही सुधरायचे की नाही याबाबत ज्यालात्यालाच निर्णय घ्यायचा आहे. समाजात जे आहे ते दाखविण्यापेक्षा समाजात काय असायला पाहिजे हे दाखविणे जास्त महत्त्वाचे वाटते.  6 जानेवारी दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती आहे. हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने प्रसारमाध्यमांतील मंडळी आत्मपरीक्षण करतील काय,असा प्रश्न उपस्थित होतो आहे. आणि तसे त्यांनी करावे, अशी अपेक्षा आहे.

No comments:

Post a Comment