Sunday, January 8, 2017

पर्यावरणवादी वृद्धा सालुमरदा थिमाक्का




    
ही कथा आहे, कर्नाटकात राहणार्या सालुमरदा थिमाक्का यांची! त्यांचा जन्म तुमकूर जिल्ह्यातल्या गब्बी गावात झाला. ती खूपच गरीब कुटुंबातील मुलगी होती. तिला कधीच शाळेत जाण्याची संधी मिळाली नाही. कळायला लागण्याच्या अगोदरपासूनच काबाडकष्ट करू लागली होती. दहा वर्षांची झाल्यावर,तिच्या घरच्यांना तिच्या लग्नाची काळजी वाटू लागली. वराचा शोध सुरू झाला. घरच्यांनी रामनगर जिल्ह्यातल्या एका गावातल्या कुटुंबात तिचे लग्न ठरवून टाकले.लहान वयातच लग्न करून ती सासरला आली.
     सासरच्यांचीही घरची शेतीवाडी नव्हती. नवरा चिकय्या दुसर्यांच्या शेतात राबायला जायचा. लग्नानंतर काही दिवस तिच्या घरच्यांनी तिला घरकामाला लावलं. नंतर त्यांनी तिलाही मोलमजुरीच्या कामाला पाठवायला सुरूवात केली. ती रोज उठून नवर्याबरोबर दुसर्याच्या शेतात राबायला जाऊ लागली. संध्याकाळी कामावरून आल्यावर घरकामाची जबाबदारीही तिच्यावरच होती. कितीही थकवा येवो, कंटाळा येवो पण तिने कधी कुरकुर केली नाही.हातावरचे पोट असूनही ती आनंदी होती. पण हा तिच्या समस्यांचा शेवट नव्हता.लग्नानंतर काही वर्षे गेली,तिला मूलबाळ नाही.सुरुवातीची काही वर्षे सून लहान आहे,म्हणून घरातले गप्प होते.पण नंतर घरात हलकल्लोळ उडाला.तिला रोज टोमणे मारले जाऊ लागले. अगोदर घरचे बोलत होते,पुढे शेजारी-पाजारी,जाणारे-येणारे तिला बोलू लागले.तिची अवहेलना सुरू झाली.सगळे तिला वांझोटी म्हणून लागले.सकाळी तिचा चेहरा पाहणं अपशकून समजले जाई. त्यामुळे मान वर करून चालणं तिला मुश्किल झालं. सालमुरदा सांगतात,लोक म्हणायचे की,बाई वांझोटी आहे.हिचं तोंडदेखील पाहू नये. जाता-येता नेहमी बोलणी ऐकावी लागायची.
     सालमुरदांना कळायचं नाही, त्या विचार करायचा, यात आपला काय दोष? सासरच्यांची इतकी भीती मनात बसली होती की, वर तोंड करून उत्तर देण्याची हिम्मतच होत नव्हती.पण एक गोष्ट मात्र चांगली होती. नवर्याची तिच्याविषयी कुठली तक्रार नव्हती. त्यांना बायकोचे दु:ख समजत होते.सालमुरदा सांगतात, माझा नवरा खूप चांगला माणूस होता.सगळे वाईट-वंगाळ बोलायचे,पण हे मात्र माझी समजूत घालायचे.काळजी करू नकोस, मी आहे तुझ्यासोबत,म्हणायचे. त्यामुळे धीर यायचा.त्यांच्या प्रेमळ वागण्यामुळे मी हे दु:ख सोसू शकले.असेच दिवस लोटले. लग्नाला 25 वर्षे हो ऊन गेली. रोज देवापुढे आई होण्यासाठी साकडे घालायची. पण इच्छा काही पूर्ण झाली नाही. आता आई बनण्याची उमेदही धुसर झाली.एक दिवस घरापासून थोड्या अंतरावर एक वडाचं झाड लावलं.विचार केला, अदाचित असं केल्यानं मनातलं थोडं फार दु:ख कमी होईल.रोपाची काळजी घेऊ लागली.सकाळी पहिलं काम करायचं, बादलीभर पाणी घ्यायचे आणि त्याला घालायचे.पुढे तर त्याचा सांभाळ म्हणजे त्यांच्यासाठी ईश्वराची सेवाच बनली.सालमुरदा सांगतात, मी त्या रोपाचा मुलासारखा सांभाळ करू लागली. यात मला मोठा आनंद मिळायचा.रोपाला मोठे होताना पाहताना इतका आनंद व्हायचा,की तो मला शब्दांत सांगता यायचा नाही.
     आयुष्यातला उणेपणा दूर करण्यासाठी झाडे लावण्याचे सुरू केलेले काम पुढे तसेच अव्याहतपणे सुरू राहिले. या चांगल्या कामाला नवर्याचीही साथ मिळू लागली. रोपांचा सांभाळ करताना त्यांचे पूर्ण सहकार्य मिळायचे.ए काम वाटतं तितकं सोपं नव्हतं.रोपांना पाणी घालण्याबरोबरच त्यांचे जनावरांपासून संरक्षण करणे, ही तितकीच मोठी जबाबदारी होती. यासाठी थिमाक्का सतत जागृत राहायच्या. आता त्यांना कुणाच्या टोमण्याची,बोलण्याची फिकिर नव्हती. पहिल्या वर्षी त्यांनी दहा झाडे लावली. दुसर्या वर्षी वीस. आणि मग झाडे लावण्याचा सपाटाच सुरू झाला. जसजसा रोपांचा विस्तार वाढला.क्षेत्र वाढले,तसतसे कामही कठीण होत गेले.त्यांना कित्येक किलोमीटर अंतर डोक्यावर घागर घेऊन चालत जावे लागे. कळूहळू ही बातमी गावभर पसरली.पंचक्रोशीत पसरली. हा त्यांचा वेडेपणा पाहून लोक अचंबित झाली. एकटी बाई स्वत:च्या हिमतीवर इतकी झाडे लावतेय, म्हटल्यावर तिच्या या अलौकिक कामाचे कौतुक व्हायला लागले. आतापर्यंत त्यांनी 400 च्यावर वडाची झाडे लावली आहेत. ही झाडे रामनगर जिल्ह्यातल्या हुलिकल आणि कुडूर क्षेत्रातल्या राष्ट्रीय राज्यमार्गावर दुतर्फा चार किलोमीटरपर्यंत पसरली आहेत.त्या आजदेखील रोपे लावताहेतच. गेल्या सहा दशकापासून त्या हे काम करताहेत.
     थिमाक्कांचे नाव हो ऊ लागले. लोक, सामाजिक संस्था त्यांचे कौतुक, सन्मान करू लागले. आई न झाल्याचे दु:ख आता निवळलं होतं. या दरम्यान 1991 मध्ये नवर्याचे निधन झाले.त्या एकाकी झाल्या. सालुमरदा सांगतात, आता ही झाडेच माझे सोबती. मी एकटी नाही.ही सगळी झाडं माझी लेकरं आहेत.गंमतीची गोष्ट म्हणजे, कन्नड भाषेत सालुमरदा चा अर्थ होतो, झाडांची रांग.खरोखरीच त्यांनी आपल्या नावाचे सार्थक केले.त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. पर्यावरण क्षेत्रातील त्यांच्या या योगदानाबद्दल 1995 मध्ये त्यांचा नॅशनल सिटिझन्स अॅवार्ड देऊन सन्मान करण्यात आला. याशिवाय त्यांना इंदिरा प्रियदर्शनी वृक्षमित्र, कल्पवल्ली अॅवार्ड आणि गॉडफ्रे फिलिप्स ब्रेबरी अॅवार्डने नवाजले गेले.105 वर्षांच्या सालमुरदा सांगतात,मी माझे दु:ख विसरण्यासाठी झाडे लावली.जोपासली. पण त्यावेळेला मला कल्पनादेखील नव्हती की, आपण पर्यावरणासाठी मोठं काम करतो आहोत. मला इतके सारे पुरस्कार मिळतील, याचा स्वप्नातदेखील विचार केला नव्हता. आज ही विशाल वृक्ष पाहते, तेव्हा विश्वासदेखील बसत नाही की, ही सगळी झाडं आपण लावली आहेत.
     गेल्याच वर्षी 2016 मध्ये बीबीसीने त्यांचा जगातल्या 100 प्रभावशाली महिलांमध्ये समावेश केला आहे.

No comments:

Post a Comment