Saturday, February 18, 2017

आक्रमक हॉकीपटू: धनराज पिल्ले


     2002 मध्ये झालेल्या आशियाई हॉकी स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून देणार्या भारतीय संघाचा कर्णाधार असणारे धनराज पिल्ले यांचे बालपण अत्यंत हलाखीचे आणि अडचणीचे गेले.त्यांचा जीवनपट प्रेरणादायी आहे. सामान्य कुटुंबात जन्मलेल्या पिल्ले यांनी  आपल्या जिद्दीच्या आणि कौशल्याच्या जोरावर भारतीय संघाच्या कर्णधार पदापर्यंत मजल मारली. वास्तविक त्यांच्या दोन्ही भावांना हॉकीची आवड होती. त्यांच्यामुळेच त्यांनाही हॉकीची आवड निर्माण झाली.परंतु, हॉकीची स्टीक घ्यायलाही त्यांच्याकडे पैसे नव्हते. त्यांना खेळासाठी मित्रांकडून स्टीक उधार घ्यावी लागायची.पण तीही त्यांना ते खेळून झाल्यावर मिळायची.त्यासाठी त्यांना मोठा संयम बाळगावा लागायचा. त्यांना पहिली स्टीक मिळाली ती त्यांच्या भावाला भारतीय संघात स्थान मिळाले तेव्हा.त्याने त्याची जुनी स्टीक त्यांना दिली. नवीन नव्हती,पण ती त्यांच्यासाठी मोठी मौल्यवान होती. कारण ती त्यांची स्वत:ची होती.

     पिल्ले यांनी पहिली ज्युनिअर हॉकी 1985 साली मणिपूरमध्ये खेळली. तेव्हा ते फक्त सोळा वर्षांचे होते.दिसायला फारच हडकुळे, अगदी लहान मुलासारखे दिसायचे. मात्र त्यांची हडकुळी देहयष्टी असली तरी त्यांचा संघात असा दबदबा होता की, त्यांच्याशी भिडण्याचा कोणी प्रयत्नदेखील  करीत नसे.
     ते अभ्यासात फारच सुमार होते.कशी तरी त्यांनी दहावीपर्यंत मजल मारली होती. त्यांनी एका मुलाखतीत अगदी प्रामाणिक गोष्ट कथन केली आहे.ते म्हणाले,जर मी हॉकीपटू नसतो तर मला शिपायाची नोकरीसुद्धा कोणी दिली नसती. आज मी बॅचलर ऑफ सायन्स किंवा आर्टस नसलो तरी मी अभिमानाने सांगू शकतो की मी बॅचलर ऑफ हॉकी आहेधनराज आज इंडियन एअरलाईन्समध्ये सहाय्यक व्यवस्थापक आहेत. त्यांना त्यांच्या आयुष्यात अगदी छोट्या-मोठ्या गोष्टींसाठी संघर्ष करावा लागला आहे.त्यामुळे त्यांच्या अंगी चिडचिडेपण चिकटले. ते लहानपणीच स्वत:ला असुरक्षित समजायचे. त्यांनी पाहिलं आहे की, त्यांच्या आईला त्यांचा सांभाळ करताना किती कष्ट उपसावे लागले आहेत.त्यामुळे त्यांची चिडखोरवृत्ती व्हायला या गोष्टी कारणीभूत आहेत. शिवाय ते फारच भावूक आहेत. ते दुसर्या कुणाला अडचणीत पाहू शकत नाहीत. ते सांगतात की, त्यांना आपल्या चुकांबद्दल क्षमा मागायला लाज वाटत नाही.
     पुण्याजवळील खडकी हे त्यांचे जन्मठिकाण. आघाडीचा खेळाडू म्हणून त्यांनी आजवर 400 हून अधिक सामने खेळले आहेत. तर 200 हून अधिक गोल केले आहेत. भारताकडून सर्वाधिक गोल करणारा खेळाडू म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. त्यांनी 4 ऑलिम्पिक,4 जागतिक हॉकी करंडक, 4 चॅम्पियन आणि चार आशियाई स्पर्धेत सहभाग घेतला. धनराज कायम आक्रमक खेळाडू म्हणून ओळखले गेले. हॉकी संघटनेच्या विरोधात नाराजी व्यक्त केल्याने त्यांना भारतीय संघातून बाहेर बसावे लागले. बँकॉक आशियाई क्रीडा स्पर्धेनंतर ते बाहेरच राहिले. 16 जुलै हा त्यांचा वाढदिवस आहे.

     धनराज पिल्ले यांना सर्वाधिक प्रेरणा त्यांच्या आईकडून मिळाली. त्यांनी त्यांच्यासह सगळ्या भावंडांना चांगले संस्कार देण्याचा प्रयत्न केला. ते आईचे लाडके आहेत.ते कुठेही असले तरी आई त्यांना रोज रात्री बोलल्याशिवाय राहत नाही.त्यांच्या आईने त्यांना प्रसिद्धीला अगदी विनम्रतेने सामोरे जाण्याची शिकवण दिली आहे. साहजिकच ते प्रसिद्धी मिळाली तरी  कित्येक दिवस लोकल ट्रेन किंवा बसने प्रवास करायचे.

No comments:

Post a Comment