Monday, February 13, 2017

देवतांमधल्या शक्ती जागवायला हव्यात


     पावसाळा संपताना देशभरात देवी-देवतांच्या उत्सवांना प्रारंभ होतो. महाराष्ट्रात श्रीगणेशाच्या आगमनापाठोपाठ सगळीकडे उत्सवांचा धडाका सुरू होतो. बंगाल आणि उत्तर प्रदेशात दुर्गा पूजा, दक्षिणेत कार्तिकेय किंवा अन्य स्थानिक देवतांचा उत्सव सुरु व्हायला लागतो.गणेशोत्सव किंवा दुर्गा पूजा आता एका कुठल्या प्रांताचे राहिले नाहीत. हे उत्सव देशभरातच नव्हे तर साता समुद्रापार मोठ्या उत्साहात साजरे केले जात आहेत. याद्वारे भारतातल्या धार्मिक संस्कृतीचा प्रसार जगभरात होत असला तरी आपण मात्र त्याचा मूळ गाभा विसरून गेलो आहोत. या उत्सवांना ओंगळवाणे स्वरुप आणले आहे. आपण उत्सवांच्या उद्देशालाच हद्दपार करून टाकले आहे.

    आपल्या देवतांच्या मूर्ती अद्भूत आहेत. आकलनापलिकडच्या आहेत. आपण हा विचार कधी केलाय का पहा, की या मूर्ती अशा अद्भूत आणि विचित्र का आहेत? अलिकडची मुलं आता आपल्या आई-वडिलांना विचारताहेत, की या देवता आपल्यासारख्या का नाहीत. त्यांना तसे का दाखवलं जात नाही? माणूस पुजण्यासारखा नाही का, त्याचाही उत्सव केला जाऊ शकत नाही का, असाही सवाल उपस्थित होतो. विज्ञान आणि टेक्नॉलॉजीच्या आधारावर जगणार्या आजच्या पिढीला या कथा कशाप्रकारे सांगितल्या जाव्यात, याचा विचार करायला नको का? माणसाच्या शरीरावर हत्तीचे शीर कसे राहू शकते, असे मुलांनी विचारलं तर आपल्याकडे काय उत्तर असणार आहे? विज्ञानाच्या कसोटीवर माणसाच्या धडावर हत्तीचे शीर राहूच शकत नाही. मग आपण त्यांच्यात  तसाच अंध विश्वास  ठेवायचा का वैज्ञानिक दृष्टीकोनाची बिजे पेरायची? वास्तविक ही सगळी प्रतीकं आहेत. या द्वारे त्या मागचा  मतितार्थ सांगण्याची ही  पद्धत आपल्या जुन्या लोकांकडे होती. हे आपण मुलांना नको का सांगायला!
    गणपती विद्येचा देवता आहे. त्याचं वाहन उंदीर आहे. उंदीर आपल्या मनाचं  कुरतडलेपण किंवा पोखरलेपण त्याच्या प्रतिकातून व्यक्त करतं.बुद्धिजीवी माणसाचे मन अनेक शंका-कुशंकांनी, तर्क-कुतर्कांनी सतत कुरतडलं जातं. बुद्धी तर्कावर तपासली केली नाही तर त्या बुद्धीचा उपयोगच काय? त्यातून प्रज्ञावंत कसा निर्माण होणार? त्याला शांतता कशी मिळणार? प्रसिद्ध  मानसशास्त्रज्ञ कार्ल गुस्ताफ जुंग यांनी या देवतांच्या प्रतिकांचा मतितार्थ उलगडला आहे. समजावला आहे. मनातल्या अंतरंगात अनेक कप्पे असतात, त्यांना ते सामुहिक अवचेतन म्हणतात. या सामुहिक अवचेतन शद्बांमध्ये विचार करत नाही. यांची भाषा चित्रमय असते.मनात विचार किंवा भाव प्रकट होण्यापूर्वी त्याचे पहिल्यांदा चित्र उभे राहते. प्राचीन मानवाने जेव्हा एकाद्या नैसर्गिक शक्तींचा अनुभव घेतला तेव्हा त्याने त्याची एक प्रतिमा बनवली. पुढे तिच देवी-देवतांची रुपं रुढ झाली.
   अशा प्रकारे आपल्या देशाच्या इतिहासात भिन्नभिन्न मूर्ती आहेत. जर या मानसशास्त्राज्ञाचा  विचार लोकांना समजावून सांगितला तर एक चांगला परिणाम आपल्यापुढे ये ईल. देवी-देवतांना पुजण्यापेक्षा ते त्यांची शक्ती आपल्यात जागवतील. तेव्हाच या देवता मानवासाठी सार्थक ठरतील.
                                                                                      



No comments:

Post a Comment