Thursday, February 9, 2017

(बालकथा) साहसी चंद्रलेखा


     चंद्रपूर राज्याचा राजा होता, चंद्रसेन. त्याला एक राज्यकन्या होती, तिचे नाव होते चंद्रलेखा. राजा चंद्रसेन आणि राणी भानुमतीला राजपुत्र नव्हता. त्यामुळे काही जण त्याला दुसरा विवाह करण्याचा सल्ला देऊ लागले. पण राजा त्यांना म्हणायचा, माझी मुलगी नाही तर राजपुत्र आहे. ही  एखाद्या राजपुत्रालाही भारी पडेल. त्याने चंद्रलेखाला घोडस्वारी, धनुर्विद्या, दांडपट्टा, तलवारबाजी असे सर्व प्रकारचे मैदानी शिक्षण दिले.चंद्रलेखासुद्धा हळूहळू या सर्व कलांमध्ये पारंगत झाली. चंद्रलेखाला आणखी एक छंद होता, कशिदाकामाचा. ती ते शिकण्यासाठी कधी कधी लतिका मावशीच्या  घरी जायची. लतिका राणी भानुमतीची बालमैत्रीण होती.  लोक नेहमी चंद्रलेखाला विचारायचे की, कशिदा काम शिकून तू काय करणार? त्याचा तुला काय उपयोग? ती म्हणायची, कोणतीही  कला आयुष्यात कधी ना कधी उपयोगी पडते. भविष्यात काय घडेल कोण सांगाव?

   चंद्रसेन दयाळू होता आणि तो प्रजेच्या हिताला प्राधान्य द्यायचा. तो स्वत: खूप चांगला होता आणि समोरच्यालाही तशाच दृष्टिकोनातून पाहायचा. त्याला सगळे लोक चांगले वाटायचे. त्यामुळे राजाला ठाऊक नव्हतं की, तो आपल्या मंत्रिमंडळातील सेनापती भुपेंद्रच्या रुपाने अस्तनीतला निखारा पोसतो आहे ते! भुपेंद्र अगोदर एक सामान्य सैनिक होता, परंतु आपल्या बुद्धिमत्तेच्या आणि धाडसाच्या जोरावर तो इथवर पोहचला होता. त्यामुळे चंद्रसेन  त्याचा मोठा आदर करी. पण संधी मिळताच त्याने एक दिवस राजमहालावर कब्जा मिळवला. आणि राजा-राणीला बंदी बनवून अंधारकोठडीत टाकले.सुदैवाने राजकन्या चंद्रलेखा त्यावेळेला लतिकाच्या घरी गेल्याने बचावली. 
     लतिकाचा पती एक मोठा व्यापारी होता. त्याच्या अकस्मात मृत्यमुळे   लतिकावर मोठा दु:खाचा डोंगर कोसळला होता. पण मुलांकडे पाहून तिने स्वत:ला सावरले होते. ती शिलाई-कशिदा कामात  निपुण होती. तिने त्यालाच आपल्या रोजी-रोटीचे साधन बनवले होते. आता काळ बदलला होता. तिचे दोन्हीही मुलगे देश-विदेशात चांगला व्यापार करत होते. लतिकाने केलेल्या कशिदा वस्त्रांना  मोठी मागणी होती. ज्यावेळेला भुपेंद्रने राजमहालावर अतिक्रमण केले, तेव्हा चंद्रलेखा याच लतिकामावशीच्या घरात होती. राजमहालातल्या एका विश्‍वासू सेवकाने चंद्रलेखाला राजा-राणीला भुपेंद्रने  बंदी केल्याचे सांगितले होते. ऐकून चंद्रलेखाच्या पायाखालची वाळूच सरकली. पण लतिकाने तिला धीर दिला. भुपेंद्रचे सैनिक जागोजागी पहारा देत होते, त्यामुळे तिला बाहेर काढणे मोठे  धोकादायक  होते. लतिकाने तिला आपल्या तळघरात लपवले.
     भुपेंद्रच्या सैनिकांची पक्की खात्री होती की, चंद्रलेखा लतिकाच्या घरातच आहे. त्यामुळे त्यांनी वारंवार  लतिकाच्या घराची झडती घेतली. परंतु, त्यांना प्रत्येक वेळेला अपयश आले. जवळ जवळ सात महिने चंद्रलेखा लतिकाच्या तळघरात लपून राहिली. रात्रीच्या अंधारातच लतिका तिला खायला-प्यायला  द्यायची. दिवसभर चंद्रलेखा शाल आणि चादरींवर कशिदाकाम करायची. लतिकाही  तिला नेहमी विचारायची, हे काम  का करतेस?  पण चंद्रलेखाचे उत्तर असायचे, वेळ घालवायला यापेक्षा आणखी दुसरा चांगला मार्ग कुठला आहे?  आणि वेळ आल्यावर हेच काम उपयोगाला येईल.
     हळूहळू भुपेंद्रला विश्‍वास पटला की,  चंद्रलेखा राज्य सोडून पळून गेली.  त्याने लतिकाच्या घरी आपले सैन्य पाठवायचे बंद केले. ज्यावेळेला वातावरण निवल्याची  खात्री झाली, त्यावेळेला लतिकाने आपल्या विश्‍वासू दासाकरवी चंद्रलेखाची रवानगी शेजारील देशाचा राजा मदनसेनकडे केली. मदनसेन राजा चंद्रसेनचा मित्र होता. राजकन्या तिथे सुरक्षित राहील, याची लतिकाला खात्री होती. आपल्या मित्राची मुलगी सुखरुप असल्याचे पाहून राजा मदनसेनलाही मोठा आनंद झाला. आपल्या मित्रावर ओढवलेल्या प्रसंगाची त्याला कल्पना  होती. पण त्याचे सैन्य भुपेंद्रच्या सैन्याशी टक्कर देऊ शकत नव्हते. सैन्य भुपेंद्रच्या सैन्यापुढे खूपच तोकडे पडत होते. 
     चंद्रलेखा सुंदर होती. मदनसेनचा राजपुत्र छत्रसेनला ती पसंद होती. त्याने हा विचार आपल्या पित्याकडे व्यक्त केला. राजा मदनसेनलाही ती पसंद होती. त्याने चंद्रलेखापुढे विवाहाचा प्रस्ताव ठेवला. तेव्हा चंद्रलेखा म्हणाली, छत्रसेन मलाही पसंद आहे, पण माझ्या माता-पित्याची सुटका झाल्याखेरीज मी विवाह करणार नाही.
     मदनसेनने विचारले, पण हे कसे शक्य आहे? तेव्हा ती म्हणाली, तुम्ही तुमचे सैन्य आणखी बळकट करत रहा. वेळ आली की, मी आपल्याकडे मदत मागीन. मदनसेन म्हणाला, पण आमचे सैन्य तर भुपेंद्रच्या सैन्यापेक्षा निम्मेही नाही. निभाव कसा लागणार?  चंद्रलेखा म्हणाली, काही दिवसांतच तुमच्या सैन्यात वाढ झालेली दिसेल. मदनसेन आणि छत्रसेन तिच्या विश्‍वासापुढे नतमस्तक झाले. दोघांनीही तिला पूर्णपणे मदत करण्याचे आश्‍वासन दिले.
     जवळपास  पाच-सहा महिने चंद्रलेखा वस्त्रांवर वेलबुट्ट्यांचे काम करत राहिली. इकडे चंद्रपुरात भुपेंद्रच्या अन्याय, अत्याचाराने जनता बेजार झाली होती. वैतागली होती. त्यांना चंद्रसेनचे राज्य पुन्हा यावे, असे वारंवार वाटत होते. काही काळ गेल्यावर चंद्रलेखाने कशिदाकाम केलेली  सर्व वस्त्रे घेतली व एका सामान्य मुलीचा वेश धारण करून ती ते विकायला चंद्रपूर राज्यात गेली.   तिला या वेशात कोणीच ओळखले नाही. ती घरोघरी जाऊन शाल आणि चादरी विकायची. ज्या घरात चंद्रसेनला पसंद करणारी माणसे होती, त्यांना ती हळूच मदनसेनच्या सैन्यात सामिल व्हायला सांगायची. जे लोक चंद्रसेनला मदत करू इच्छित होते, पण दुसर्‍या देशात जाऊ शकत नव्हते, त्यांना  राज्यावरील आक्रमणावेळी भुपेंद्रला मदत न करण्याची विनंती करी.  
     सहा महिन्यातच राजा मदनसेनच्या सैन्याची संख्या तिप्पट झाली. तेव्हा चंद्रलेखा  मदनसेनच्या राज्यात परत आली. तिने सैनिकांच्या प्रशिक्षणाची कमान सांभाळली. राजकन्येचा उत्साह पाहून सैन्यात एक नवा जोश आला. एक नवी चेतना मिळाली. आणि एक दिवस राजा मदनसेन, राजपुत्र छत्रसेन आणि राजकन्या चंद्रलेखा यांनी चंद्रपूरवर स्वारी केली.  सैन्यांतील हिंमत, जोश पाहून भुपेंद्रचे सैन्य भिऊन पळू लागले. काहींनी  स्वत: हून हत्यारे खाली टाकली. तर काहींनी मदनसेनला साथ दिली. चंद्रलेखाने स्वत: भुपेंद्रला बंदी बनवले. आपल्या माता-पित्यांची सुटका केली.  ती आपल्या माता-पित्यांना तब्बल दोन वर्षांनी भेटत होती. त्यांची तब्येत उतरली होती. चंद्रलेखाच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत चंद्रसेन म्हणाला, मी म्हणालो होतो ना की, ही माझी मुलगी एखाद्या राजपुत्रापेक्षा कमी नाही.    
 चंद्रसेनने पुढे अनेक वर्षे राज्य केले. चंद्रलेखाचा विवाह छत्रसेनशी झाला. चंद्रसेनच्या मृत्यूनंतर राजा छत्रसेन आणि राणी चंद्रलेखा यांनी चंद्रपूरचा राज्य कारभार सांभाळला. त्यांची कीर्ती दूरवर पसरली.                      


No comments:

Post a Comment