Sunday, February 5, 2017

सात नावं धारण केलेली मुलगी


     ली हियोन सियोचं बालपण उत्तर कोरियाच्या येसन शहरात गेलं.यालू नदीच्या काठी वसलेले हे सुंदर शहर एके काळी आर्थिक सुबत्तेने भरभराट पावलेलं होतं. शहरवासियांजवळ रोजगाराची कमतरता नव्हती. पण 1990 मध्ये कापड आणि पेपर मिलच्या बंदींमुळे त्यांच्यावर अडचणींचा डोंगर उभा राहिला.प्रकरण फक्त आर्थिक संकटाचं नव्हतं तर राजकीय वादंगानेही शहराच्या रहिवाशांचे जिणं अशक्य करून टाकलं होतं. वास्तविक, शेजारील प्रदेश दक्षिण कोरियाने येसनच्या उत्तरी भागावर आपला दावा सांगितला होता.त्यामुळे या प्रदेशात सैन्य आणि राजकीय दखल सामान्य गोष्ट बनली होती. ली हियोन सियो या तणावपूर्ण वातावरणात वाढत होती.
     उत्तर कोरियामध्ये गुन्हेगारच्या शिक्षेबाबतचा  निर्णय न्यायालयाच्या प्रक्रियेने न होता,हुकूमशहा शासकांच्या दरबारात निश्चित होत होता.ली सात वर्षाची असताना पहिल्यांदा सार्वजनिकरित्या क्रूरपणे फाशीची शिक्षा देतानाचे दृश्य पाहिले होते. ते क्रूर दृश्य पाहून तिच्या छोट्या जीवाचा थरकाप उडाला होता.यानंतर अशी-तशीच ती मोठी होत होती. पुढे हुकुमशाहीच्या क्ररतेची दृश्ये सामान्य होत गेली.ज्यावेळेला ती घरच्यांना विचारायची की, हे काय चालले आहे,त्यावेळेला घरचे तिला रागावून गप बसवायचे.पण आता तिला समजत होतं की, जे काही चाललं आहे,ते अन्यायी आहे. मात्र तिथे कुणाला अन्यायाविरोधात ब्र काढण्याचेदेखील  स्वतंत्र्य नव्हते.हुकमतीविरोधात मतप्रदर्शन जाहीर करणे, गंभीर गुन्हा होता.नातेवाईक, शेजारी सगळे दहशतीखाली जगत होते. त्यामुळे मनात हुकूमशाही हुकुमतीविरुद्ध संताप खदखदत होता.एक दिवस निश्चय केला की, अशा प्रदेशात अजिबात राहणार नाही,जिथे अन्याय सहन करणेच नशिबी आहे. घरच्यांनी खूप रोखण्याचा प्रयत्न केला, पण तिने नाही मानलं.
     तेव्हा ती 17 वर्षांची होती.ही गोष्ट 1997 ची आहे. लीने यालू नदी ओलांडून चीनच्या सीमेवर पाऊल ठेवले.त्यावेळेला कडाक्याची थंडी पडली होती.यालू नदीच्या पाण्याचा बर्फ बनला होता.नशिबाने तिला साथ दिली. सीमेवर तैनात असलेल्या एका सुरक्षा रक्षकाने दया दाखवून तिला चीनमध्ये प्रवेश करायला मदत केली.तिने विचार केला,दोन-तीन वर्षे चीनमधल्या कुठल्या तरी एखाद्या कॉलेजात शिक्षण घ्यावे आणि पुन्हा स्वदेशात जाऊन घरच्यांनाही याच वाटेने चीनमध्ये आणावेचीनच्या भूमीवर पाऊल ठेवले,तेव्हा तिच्या हृदयाचा दहशतीच्या भितीने थरकाप उडाला. कुठे पोलिस पकडतील का?याची तिला कमालीची धास्ती वाटत होती. पण कसे तरी लपत-छपत तिथे अगोदरच राहात असलेल्या आपल्या एका नातेवाईकांच्या घरी पोहचली. तिच्याजवळ कुठला कायदेशीर दस्ताऐवज नव्हता,त्यामुळे बेकायदा निर्वासित म्हणून राहावं लागलं.जवळजवळ दहा वर्षे ती तिथे राहिली.नेहमी भीतीच्या छायेत वावरावं लागायचं. कधी कुणाला तिच्याविषयी कळणार तर नाही ना?जर पोलिसांना कळलं तर जबरदस्तीने तिला परत उत्तर कोरियाला पाठवलं जाईल. याचा विचार करून तिच्या मनाचा थरकाप उडायचा.जर असं झालं असतं तर लीचे जीवन मृत्यूपेक्षाही भयंकर बनले असते. त्यांच्या देशात अशा लोकांवर देशद्रोहाचा आरोप लावून उघडपणे फाशीची शिक्षा दिली जाते. ली नाव बदलून राहू लागली.तिने चिनी भाषा शिकून घेतली,त्यामुळे तिथल्या लोकांमध्ये मिळून मिसळून राहता येईल.ली सांगते की, तिने चीनमध्ये आपले नाव सात वेळा बदलले.एकाच ठिकाणी अधिक काळ राहणे, धोक्यापेक्षा कमी नव्हते.एकदा पोलिस शिपायाला  संशय आला, पण तोपर्यंत ती चिनी भाषा इतकी सराईतपणे बोलायला शिकली होती, की त्यामुळे पोलिसांना विश्वास ठेवावा लागला की,ती चिनी नागरिक आहे. त्यावेळेला ती 17 वर्षांची होती.एका कंपनीत तिला काम मिळाले होते, पण  नंतर कळले की तिला सेक्स वर्कर बनवले आहे. कशी तरी सुटका करून घेऊन पळून जाण्यात ती यशस्वी झाली.

     दहा वर्षे चीनमध्ये राहिल्यानंतर तिने दक्षिण कोरियाला जाण्याचा निर्णय घेतला.ली सांगते की, चीनमध्ये राहणं सोपं राहिलं नव्हतं.माझी स्वत: ची अशी काही ओळख नव्हती. सन 2008 मध्ये सुंदर आयुष्यासाच्या शोधात ती दक्षिण कोरियात पोहचली. तिने पोलिसांना आपल्याबाबतीत सत्य सांगून कायदेशीर शरण जाण्याचा निर्णय घेतला, पण लवकरच एक वाईट बातमी आली. ली सांगते, मी आपल्या आई आणि भावा-बहिणींना नेमाने  मदतीसाठी पैसे पाठवत असे. उत्तर कोरियातल्या पोलिसांना याचा सुगावा लागला. आता घरच्यांचे जीवन धोक्यात सापडले, तेव्हा तिने निश्चय केला की, मी घरच्यांना चीनच्या मार्गाने दक्षिण कोरियात घेऊन येऊ. मात्र हे काम सोपे नव्हते. कित्येकदा मार्गात विचारणा झाली,पण तिने हार मानली नाही. दक्षिण कोरियात आल्यावर त्यांचे जीवन बदलले.तिने पुन्हा शिक्षण सुरू केले.2013 मध्ये तिला अमेरिकेला जाण्याची संधी मिळाली. तिथे एका कॉन्फ्रेंसमध्ये तिने आपल्या खडतर आयुष्याची कथा ऐकवली. ऐकणारे दंग झाले. एका मुलीने जगण्यासाठी इतका संघर्ष केला, यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता. एका प्रकाशकाने तिला पुस्तक लिहिण्याचा आग्रह केला.ली सांगते, मला भीती होती की, मी पुस्तक लिहिले तर माझे नातेवाईक संकटात सापडतील.म्हणून मग तिने त्यांची नावे सार्वजनिक न करण्याचा निर्णय घेतला. तिच्या जीवनावर आधारित असलेले द गर्ल विद सेवन नेम नावाचे पुस्तक संपूर्ण जगात गाजले. पुस्तकाद्वारे पहिल्यांदाच उत्तर कोरियातील महिलांवर होणारे अत्याचार आणि  संघर्ष जगासमोर आले. ली म्हणते, मी टांगिल नावाची एक सामाजिक संस्था स्थापन केली आहे, ज्याद्वारे उत्तर कोरियातून पळून आलेल्या स्त्रियांचे होणारे शोषण आणि अत्याचार यापासून सुटका करण्याचा प्रयत्न करते आहे. तिला आशा आहे की, परिस्थिती बदलेल,निवळेल आणि आम्हा महिलांना स्वातंत्र्य वाट्याला येईल. 

No comments:

Post a Comment