Thursday, February 9, 2017

व्यायाम व खेळाची आवड वाढीस लावावी


सध्याचा काळ स्पर्धेचा असल्या कारणाने अभ्यासात मुले मागे पडू नयेत, म्हणून शिक्षक-पालक सतत मुलांच्यामागे अभ्यासाचे टुमणे लावत असतात. दिवसभरातला अधिक काळ हा अभ्यासात जातो. शाळेतला गृहपाठ असतोच शिवाय जोडीला क्लासचा अभ्यास असतो.म्हणजे हा सगळा खटाटोप जादा गुण मिळविण्यासाठी असतो. आणि हे केले तरच आपल्या मुलाला चांगल्या ठिकानी प्रवेश मिळेल, असा पालकांचा समज असतो. मात्र या सार्‍या ओढाताणीत मुलांचे छंद, आवड-निवड, शारीरिक क्षमता या गोष्टींकडे कोणी पालक बारकाईने पाहात नाहीत. या मुलांवर लादल्या गेलेल्या लढाईमुळे मुलांमध्ये  शारीरिक क्षमता, तंदुरुस्ती, खिलाडूवृती, यश-अपयश पचविण्याची  ताकदच राहात नाही. आजच्या पिढीत अनेकांची हीच मुख्य समस्या आहे. तरीही गुणवत्तापूर्ण नव्हे तर कागदावरील गुणांची लढाई मात्र आपण पालक जाणीवपूर्वक विद्यार्थ्यांवर लादत असतो. अभ्यास हा हवाच; त्यात गुणवत्ता, शोधक वृत्तीचा व आकलनाचा वेग हवा. त्या जोडीला मुलांच्या व मुलींच्या शारीरिक वाढीच्या प्रारंभापासूनच शारीरिक तंदुरुस्तीही हवी. शरीरातील कारक क्षमतांचा विकास करण्याचा प्रयत्न केल्यास मुले भविष्यातील विविध आजारांपासून दूर राहतात. सुदृढ व निरोगी असाल तरच जीवनाची लढाई लढता ये ईल ना! शाळेत आठवड्यातून एखादा-दुसराच शारीरिक शिक्षणाचा तास असतो. तो विद्यार्थ्यांना धडधाकट करण्यास पुरेसा नाही. त्यासाठी क्रीडा विकासावर आधारित शारीरिक क्षमता वाढीचे, क्रीडा कौशल्यप्राप्तीसाठी अभ्यास होणे गरजे आहे. त्यावर खरे तर पालक, शिक्षक, समाज व शासनाने जाणीवपूर्वक भर द्यावा; अन्यथा व्हिजन 2020 मध्ये भारतात सर्वाधिक तरुण असतील;पण तंदुरुस्त नसतील. या तारुण्याला मग काहीच अर्थ राहणार नाही. मुलांना-मुलींना किमान रोज एक तास मैदानावर पाठविलेच पाहिजे. व्यायाम,खेळाची आवड निर्माण झाली पाहिजे. एखाद्या विशिष्ठ खेळात आपल्या मुलास तरबेज करण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. 

No comments:

Post a Comment