Thursday, February 9, 2017

(बालकथा) ठकास महाठक


     हरिपूर गावात सोकाजीराव नावाचा एक ठकबाज  राहत होता. ठकाठकी करण्यात त्याचा हातखंडा होता. कोणीही त्याचा  हात धरू शकत नव्हता. एक दिवस घराबाहेर सावजाच्या प्रतिक्षेत असताना सोकाजीरावला समोरून येताना एक व्यक्ती दिसली. त्याला पाहताच त्याच्या डोळ्यांत वेगळी चमक आली. ती व्यक्ती जशी त्याच्या पुढ्यात येऊन टेपली, तशी त्याने  विचारणा करायला सुरूवात केली. कोण? कुठला? वेगैरे. त्या व्यक्त्तीने आपले नाव जग्गू असल्याचे सांगितले. बोलता बोलता त्याने खिशातला हिरा काढला आणि सोकाजीरावासमोर धरत म्हणाला, '' शहरात हा हिरा विकायला  चाललोय.''
     हिरा पाहताच सोकाजीरावच्या तोंडाला पाणी सुटलं. त्याच्यातल्या ठकबाजाला गुदगुल्या व्हायला लागल्या. तो पटकन म्हणाला, '' तू एकटाच कसा जाणार? मीदेखील तुझ्यासोबत येतो. अरे, शहरात एकापेक्षा एक ठकबाज जवाहिर आहेत. त्यांच्या लाघवी बोलण्याला भुलशील आणि हिरा गमावून बसशील. माझ्या परिचयाचे जवाहिर शहरात आहेत. त्यांना दाखवून योग्य ती किंमत मिळवता येईल. ''
     जग्गू म्हणाला, '' बरे झाले, तुमच्या रुपाने देवच पावला. हिर्‍याला चांगली किंमत मिळाली  तर तुम्हालादेखील थोडेफार कमिशन देऊ.''
     '' कमिशन-बिमिशन काही नको, समाजसेवा  हेच आमचे कर्म'' असे म्हणत त्याने जग्गूला आपल्या घरात नेले. चांगले खाऊ-पिऊ घातले. त्याचा पाहुणचार पाहून खूश झालेला जग्गू म्हणाला, '' सोकाजीराव, आपली हरकत नसेल तर मी आणखी दोन दिवस आपल्याकडे राहू का? ''
     सोकाजीरावला तर आनंदाची उकळीच फुटली. आपली योजना विनासायास फत्ते होणार याची त्याला खात्री वाटू लागल्याने त्याच्या आनंदाला पारावर राहिला नाही. त्याने  पटकन जग्गूचा हात धरले आणि  म्हटले, '' माझ्या मनातले बोललात. इथे आरामात  हवे तेवढे दिवस राहा. ''
     रात्री जग्गू झोपला, तेव्हा सोकाजीराव त्याच्या सामानाजवळ गेला.त्याने सर्व सामान तपासले. परंतु, हिरा काही मिळाला नाही. आता रोज असे घडू लागले. रात्री खाऊन-पिऊन झाल्यावर जग्गू झोपला की, सोकाजीराव त्याचे कपडेलत्ते, पिशवी, त्यातले सामान  वेगैरे तपासत असे. हिरा शोधायचा, पण सापडत नव्हता. दिवसभर जग्गूच्या हातात हिरा असायचा, पण रात्री मात्र अदृश्य व्हायचा. त्याला फार मोठे आश्‍चर्य वाटायचे. 
     शहरात जायचा दिवस उजाडला. तसे जग्गूने सोकाजीरावला सांगितले. इकडे सोकाजीरावचा जीव कासावीस होऊ लागला. शेवटी त्याने विचारले, ''मित्रा, रात्री तू हिरा कोठे ठेवत होतास? ''
     जग्गू म्हणाला, '' मित्रा, मी तुला पहिल्यादिवशीच ओळखलं होतं. म्हणून मी रात्री झोपण्यापूर्वी हा हिरा तुझ्या ऊशीखाली ठेवून बिनधास्त झोप असे.'' सोकाजीरावने जग्गूचे पाय धरले. आणि म्हणाला, '' आता मीदेखील तुम्हाला ओळखले.मी एक ठक आहे तर तुम्ही महाठक. आज मी धन्य पावलो.'' म्हणतात ना, शेरास सव्वाशेर भेटतोच.  

No comments:

Post a Comment