Thursday, February 9, 2017

(बालकथा) दयाळू सुवर्णमृग


     चंदनवनात एक मृग होते. नाव धिरू.  त्याचा रंग सोन्यासारखा आणि केस रेशमासारखे मऊ, मुलायम होते. धिरू मनुष्याची बोली बोलू शकत होता. सगळ्या प्राणीमात्रांविषयी त्याच्या मनात अपार करुणा भरलेली होती.एके दिवशी कुणातरी माणसाचे ओरडणे, त्याच्या कानावर पडले.  तो आवाजाच्या दिशेने निघाला. तिथे गेल्यावर पाहतो तर काय! एक मनुष्य नदीत गटांगळ्या खात होता. कदाचित त्याला पोहता येत नसावे. तो जीव वाचवण्यासाठी जीवाच्या आकांताने ओरडत होता. धिरूने लगेच पाण्यात उडी घेतली. मनुष्याला त्याचे पाय पकडायला सांगितले. पण तो सुवर्णमृगावर स्वार झाला. नाजूक असलेल्या धिरूने तरीही त्याला काठावर आणले. 
     माणसाने सुवर्णमृगाचे आभार मानले. तेव्हा सुवर्णमृग म्हणाले,  ''माझे आभार मानलेस हे ठीक आहे, पण मी तुझा जीव वाचवला म्हणून कुणाला सांगू नकोस , नाही तर लोक  माझी शिकार करायला धावतील.''
     काही दिवसांनी वनाला लागून असलेल्या राज्यातल्या राणीच्या स्वप्नात सुवर्णमृग  दिसले. राणीने त्याला पकडण्यासाठी राजापुढे हट्ट धरला. त्याने दवंडी पिटवली आणि जो कोणी सुवर्णमृग शोधून आणेल त्याला पुष्कळ धन आणि  एक गाव पुरस्काराच्या रुपाने दिले जाईल.दवंडी ऐकून त्या माणसाला सुवर्णमृगाची आठवण झाली. आता त्याच्या मनात लोभ उत्पन्न झाला. लोभाने आंधळा झालेला माणूस सुवर्णमृगाने सांगितलेली गोष्ट विसरला. तो तडक दरबारात पोहचला. आणि त्याने राजाला  सुवर्णमृगाचा ठावठिकाणा सांगितला. 
     राजा आणि सैन्यांनी  सुवर्णमृग राहत असलेल्या ठिकाणाला चोहोबाजूने घेरले. मृगाला पाहताच राजाला अत्यानंद झाला, कारण तो राणीला पडलेल्या स्वप्नातल्या सुवर्ण मृगासारखाच होता. राजाने  धिरूच्या दिशेने  निशाना धरला. तोच सुवर्णमृग मनुष्याच्या बोलीत म्हणाला, '' महाराज, तुम्ही मला मारून टाका, पण पहिल्यांदा मला हे सांगा की, माझा पत्ता तुम्हाला कोणी सांगितला?''  ज्याने सुवर्णमृगाचा ठावठिकाणा सांगितला होता, त्या माणसाकडे राजाने अंगुलीनिर्देश केला. धिरूच्या तोंडातून शब्द बाहेर पडले, '' राजन, माझी एक गोष्ट लक्षात ठेव. एका लाकडाचा तुकडा पाण्यातून बाहेर काढायला हरकत नाही, पण एखाद्या कृतघ्न माणसाला मात्र कधी पाण्याबाहेर काढण्याचा विचारदेखील करू नकोस. '' राजाने सविस्तर  विचारले, तेव्हा सुवर्णमृगाने घडलेला  सगळा प्रकार राजाला  सांगितला.
     धिरूची गोष्ट ऐकून राजाचे मन करुणेने भरून आले. त्या मनुष्याचा राजाला मोठा संताप आला. त्याने त्या मनुष्याला मारण्यासाठी धनुष्याचा प्रत्यंचा खेचणार, तोच  सुवर्णमृग मध्ये पडला. त्याने  त्याला न मारण्याविषयी  विनंती केली. राजाने धिरूला राज्यात येण्याचे निमंत्रण दिले. त्याचा त्याने स्वीकार केला. काही दिवस राजाचे आदरातिथ्य स्वीकारून सुवर्णमृग पुन्हा चंदनवनात परतला.   

No comments:

Post a Comment