Saturday, February 18, 2017

भारतीय मिडियाने संगीत,कला, संस्कृतीकडे लक्ष पुरवायला हवे: संदीप दास


     प्रसिद्ध तबलावदक संदीप दास यांचा नुकतेच 59 वा ग्रॅमी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला आहे. त्यांना सिल्क रोड एन्संबल गटासोबत बेस्ट ग्लोबल संगीतासाठी ग्रॅमी पुरस्कार दिला गेला आहे. त्यांचा जन्म 1971 साली पाटण्यात झाला. संदीप दास यांच्यातला गुण सगळ्यात अगोदर त्यांच्या वडिलांनी हेरला. त्यांच्या शिक्षकांनी त्यांची तक्रार वडिलांकडे केली होती. त्यांनी सांगितले होते की, संदीप सगळ्या वर्गाला डिस्टर्ब करतो आहे. डेस्क हाताने वाजवायला मनाई केली तरी तो फरशी पायाने आपटत राहतो. त्याला डॉक्टरांकडे घेऊन जा. आणखी कोणी असतं तर त्यांना घरी नेऊन अगदी बदडून काढलं असतं.पण वडिलांनी त्यांच्या हाती तबला सोपवला.त्यावेळेला त्यांचे वय अवघे आठ वर्षांचे होते.वडिलांनी त्यांना पीएंडटी क्लबमध्ये तबलावादक शिवकुमारसिंह यांच्याकडून तबला वादनाचे सुरवातीचे धडे दिले आणि नंतर पंडित किशन महाराज यांच्याकडे बनारसला घेऊन गेले.

     दर शनिवारी वडिल एका सुटकेसमध्ये आपले आणि त्यांचे कपडे घेऊन त्यांच्या शाळेकडे जायचे,तेथून त्यांना सोबत घेऊन थेट बनारसला घेऊन जायचे. आणि पुन्हा सोमवारी सकाळी तेथून परतताना संदीप यांना शाळेचा गणवेश घालून सरळ शाळेत यावे लागायचे. सुट्टीचा कुठलाच दिवस त्यांचा घरी जायचा नाही. वडिलांनी नंतर बदलीसाठी अर्ज केला आणि ते सगळेच बनारसला पोहचले. शाळेचे शिक्षण पूर्ण झाल्यावर संदीप दास बनारस हिंदू विद्यापीठात दाखल झाले, मात्र त्यांची तबल्याशी संगत सुरूच राहिली. किशन महाराज यांच्याकडे तबला वादनाचा सराव करताना त्यांच्या बोटांना भेगा पडायच्या.पण त्यांनी सराव सोडला नाही. रात्री उशिरापर्यंत त्यांचा सराव चालत असायचा.
     संदीप यांचे बालपण पाटण्यात गेले. 1986 साली ते दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाले. घरातले सगळे त्यांना मिठ्ठू म्हणून हाक मारायचे.शाळा सुटल्यावर संध्याकाळी ते घरी तबला वादनाचा सराव करायचे तेव्हा, त्यांचा मोठा भाऊ तबल्याच्या धूनसोबत गायचा. खेळण्याच्या जागी ते नेहमी तबल्याची मागणी करायचे. पंडित किशन महाराज यांच्यासोबत पहिल्यांदा मंचवर आले तेव्हा त्यांचे वय अवघे पंधरा वर्षांचे होते.त्या मंचावर पंडित रविशंकरदेखील होते. बनारस घराण्यात आकरा वर्षे तबला वाजवल्यानंतर ते दिल्लीला आले. इथे आल्यावर त्यांचा ऑल इंडिया रेडिओशी करार झाला. रेडिओशी जोडलेला  सगळ्यात कमी वयाचा तबला वादक कलाकार म्हणून त्यांचा नावलौकिक झाला. त्यावेळी त्यांना फार आनंद झाला.
     चिनी निवासी अमेरिकी संगीतकार यो यो मा यांच्याशी संदीप यांची भेट झाल्यावर त्यांचे संपूर्ण आयुष्यच बदलून गेले.यो यो मा हे जागतिक कीर्तीचे सर्वश्रेष्ठ चेलोवादक आहेत. त्यांनी 18 ग्रॅमी पुरस्कार पटकावले आहेत.18 वर्षांपूर्वी त्यांची यो यो माशी ओळख झाली होती. त्यांनी मग संदीप यांना परफॉर्म करण्यासाठी अमेरिकेला बोलावलं.

     संदीप दास यांनी नुकतीच बीबीसीला मुलाखत दिली आहे. भारतात आर्टस,खेळ,म्युजिक या गोष्टी फार गांभिर्याने घेतल्या जात नाहीत. फक्त अभ्यासाकडेच अधिक लक्ष दिले जाते. अंगच्या कलेची भरभराटच होऊ दिली जात नाही, असे संदीप दास यांनी मुलाखत देताना म्हटले आहे. संदीप मध्यमवर्गीय कुटुंबातले आहेत. पण त्यांनी बंदिशांना त्यांच्या छंदाआड येऊ दिले नाही. ते म्हणतात,आता जेव्हा मला ग्रॅमी पुरस्कार मिळाला आहे, तेव्हा सारखा फोन वाजतो आहे. मात्र याआधी त्यांना दखल घ्यावीशीही वाटली नाही. भारतीय मिडियाने आपली जबाबदारी ओळखायला हवी. त्यांनी लोकांचे लक्ष संगीत,कला आणि संस्कृतीकडे वेधण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.मला कित्येक वर्षांच्या कष्टानंतर ग्रॅमी मिळाला आहे. शेवटी या अगोदर कुठे होता भारताचा मिडिया? असा सवालदेखील ते करतात. भारतीय मिडियाला चित्रपट आणि क्रिकेटशिवाय वेळच नाही. भारताबाहेरच्या देशातील वृत्तपत्रे दोन दोन पाने आर्ट आणि संस्कृतीसाठी उपलब्ध करून देतात.इथे भारतात काहीच नाही. संदीप दास सध्या आपल्या कुटुंबासह अमेरिकेतल्या बोस्टन शहरात राहतात.

No comments:

Post a Comment