Thursday, February 9, 2017

... आणि त्याने हट्ट सोडला

(बालकथा)                   
फार  वर्षांपूर्वी एका गावात एक रामराव नावाचा माणूस राहात होता. असं म्हटलं जातं की, त्याला अजिबात राग येत नव्हता. त्याच्या या स्वभावाचा अनेकांना हेवा वाटायचा. रामरावच्या शेजारी तुकाराम राहात होता. त्यालाही त्याच्याबद्दल फार ईर्षा वाटायची.रामरावला   राग येईल अशा पद्धतीचा अनेकदा दुर्व्यवहार करून पाहिला. परंतु, त्याची काही डाळ शिजली नाही.
रामरावला राग यावा, यासाठी आता त्याने त्याच्या नोकरालाच सामिल करून घेण्याचे ठरवले. एक दिवस त्याला घरी बोलावून घेतले आणि त्याच्या हातात भरपूर पैसे देत म्हणाला, '' रामरावला रागाला आणलंस तर तुला आणखी पैसे देईन.''
पैसे पाहून नोकराच्या तोंडाला पानी सुटले. त्याच्या मालकाला भाजीत मीठ कमी असलेलं चालत नव्हतं, हे त्याला ठाऊक होतं. त्यादिवशी त्याने जाणून बुजून भाजीत मीठ कमी घातलं. रामराव पहिला घास तोंडात टाकताच क्षणभर थांबला. नोकर त्याच्या तोंडाकडे पाहात राहिला. पण रामराव क्षणभरच थांबला आणि काही न बोलता जेवण करू लागला. जेवण झाल्यावर रामराव नोकराला म्हणाला, ''ङ्आज भाजीत मीठ घालायचं विसरला होतास का?''
'' चुकून राहिलं असेल मालक, यापुढं असं होणार नाही.'' नोकर म्हणाला.
पण मीठ कमी घालायचं आणि रागाला आणायचं ठरलं असल्यानं त्यानं दुसर्‍यादिवशीही मीठ कमी घातलं. तरीही मालक काही बोलला नाही. तो रोजच तसं करू लागला. मालक मात्र काहीही कुरकुर न करता मुकाट्याने जेवत असे.
एक दिवस रामराव नोकराला म्हणाला,'' माझ्या आरोग्याची किती रे तुला काळजी. म्हणून तर तू भाजीत मीठ कमी घालत होतास ना? अशीच भाजी करीत जा, मला सवय झाली आहे.''
नोकर त्याच्या तोंडाकडेच पाहात राहिला. आपण मालकाला इतका त्रास दिला तरी मालक काहीच बोलत नाही. आता त्याला त्याचीच शरम वाटू लागली. तो धावतच शेजार्‍याकडे गेला. पैसे परत देत म्हणाला,'' मी इतक्या चांगल्या माणसाशी यापुढे पुन्हा दुर्व्यवहार करणार नाही. आणि हो, तुम्हीदेखील तुमचा हा हट्ट सोडा. त्याचा तुम्हालाच त्रास होईल.''
 त्यापुढे तुकारामानेदेखील आपला हट्ट सोडून दिला.  

No comments:

Post a Comment