Thursday, February 9, 2017

(तपास कथा) पोलिसी नजर


     अतुल उदास होता. 23 डिसेंबर हा दिवस म्हणजे  त्याला एक अद्भूत उदासी घेऊन यायचा. दरवर्षी असं व्हायचं. पाच वर्षांपूर्वी अतुलची जीवनसंगिनी रोहिणी त्याला सोडून  गेली होती.  म्हणजे हे जग सोडून. तिच्या स्मृतिप्रीत्यर्थ या दिवशी तो नेत्रहिन मुलांच्या शाळेत जाऊन काही ना काही भेटवस्तू, खाऊ  देऊन यायचा. आणि हे काम तो स्वत: करायचा.
     याहीवेळेला त्याने  काही खाण्याच्या चिजा बाजारातून  दोन पेट्यांमध्ये पॅक करून आणल्या होत्या. त्या दोन पतर्‍याच्या पेट्यांवर लिहिलं, 'प्रिय रोहिणीच्या स्मृतिप्रीत्यर्थ...' मग तो नेत्रहीन मुलांच्या शाळेत पोहचला. त्या दोन्ही पेट्या शाळेच्या मुख्याध्यापकांकडे सुपूर्द केल्या. थोडा वेळ दोघांनी गप्पा मारल्या. अर्थात गप्पांच्या केंद्रस्थानी रोहिणीच होती. नंतर अतुल घरी परत आला. 23 डिसेंबरचा दिवस त्याला घरात एकाकी घालवायला आवडायचं. या दिवशी तो कुठे जात-येत नसे.
     दोन दिवसानंतरची गोष्ट. अतुल काही कामानिमित्ताने बाजारात गेला होता. बाजारात त्याला एक हातगाडी दृष्टीस पडली. त्यावर अनेक प्रकारचे सामान लादलेले होते. पण त्यातल्या एका पेटीवर त्याची दृष्टी खिळली.  मग तो थोडा पुढे सरकला. त्यावर लिहिलेले शब्द न्याहळले.  त्यावर लिहिलं होतं, ' प्रिय रोहिणीच्या स्मृतिप्रीत्यर्थ...'  
खाण्याच्या चिजा भरून दिलेल्या दोन पेट्या आपण नेत्रहीन मुलांच्या शाळेतल्या मुख्याध्यापकांकडे सुपूर्द केल्या होत्या. त्यावेळी तो मुख्याध्यापकांना म्हणालादेखील होता, 'हा खाऊ मुलांना वाटून द्या.' आणि मुख्याध्यापकांनी शिपायाला बोलावून त्या पेट्या त्याच्याकडे सोपवल्या होत्या. मग त्यातली एक पेटी इथे कशी आली आणि  ही  कुठे नेली जात आहे बरं...?
     अतुलला  भयंकर राग आला. तो तडक शाळेत गेला. मुख्याध्यापकांना भेटला. मुख्याध्यापक म्हणाले, '' असं कसं होईल बरं. शिपायाने माझ्यादेखत पेट्या खोलल्या होत्या आणि मुलांना खाऊ वाटायला घेऊन गेला होता. त्या रिकाम्या पेट्या कोठारात नेऊन ठेवल्या होत्या. भंगारवाला महिन्यातून एकदा येतो आणि सगळं साचलेलं भंगार घेऊन जातो.''
     मुख्याध्यापक अतुलला घेऊन कोठारात गेला. त्याने अतुलला रोहिणीचे नाव असलेली एक रिकामी पेटीदेखील दाखवली. पण दुसरी पेटी कुठे दिसत नव्हती. मुख्याध्यापकांना मोठं आश्‍चर्य वाटलं. त्यांनाही  मोठा प्रश्‍न पडला,   दुसरी पेटी गेली कोठे? अतुलने हातगाडीवर जी पेटी पाहिली, ती इथलीच होती तर...!
अतुलला कसला तरी संशय आला. पेटीतला खाऊ मुलांमध्ये वाटला होता, हे  तर त्याला कळलंच  होतं, पण हातगाडीवर जी पेटी दिसली त्याचं रहस्य काय? ती इथून गायब कशी झाली? आणि गेली कुठे?
     दिवसभर त्याचं मन कन्फुज होतं. शेवटी तो त्याचा इन्स्पेक्टर मित्र-रानडेला जाऊन भेटला. त्याला सगळा घडला प्रकार सांगितला. इन्स्पेक्टर रानडे त्याच्यासोबत नेत्रहीन मुलांच्या शाळेत आला. थोडी फार विचारपूस केली. पण त्यातून काही निष्पन्न झालं नाही.  शिपायाला विचारल्यावर जबाब देताना मात्र तो काहीसा अडखळत होता. इन्स्पेक्टर रानडेला तो काही तरी लपवत असावा, असा संशय आला. यानंतर दोघेही भंगारवाल्याकडे गेले, जो शाळेतला भंगार गोळा करून नेत असे. तो म्हणाला, '' साहेब, मी तर महिन्यातून एकदाच तिकडे फेरी मारत असतो आणि जे काही भंगार मिळेल ते आणत असतो. बाकी काही मला माहित नाही. ''
     इन्स्पेक्टरने रोहिणीचे नाव असलेली पेटी दाखवली पण तो त्या दुसर्‍या पेटीबाबत काही सांगू शकला नाही.
आता काय करायचं, अशा नजरेनं रानडेने अतुलकडे पाहिलं.
अतुल म्हणाला, '' मला वाटतं, तो हातगाडीवाला मिळाला तर आपल्याला काही तरी धागादोरा हाती लागेल. ''
'' चल, शोधू त्याला. ''रानडे म्हणाला.
     दोघेही हमालाच्या शोधात निघाले. बाजारपेठेतल्या एका वळणावर हमालांचा ठिय्या होता. तिथे हातगाडीवाले हमाल आराम करायला थांबायचे. दोघेही बाजारात आले. एका चहाच्या गाड्यावर एक हमाल चहा पित होता. त्याला पाहून त्याच्याकडे बोट करून अतुल म्हणाला, '' तो बघ चहाच्या गाड्यावर तोच हमाल आहे... '' दोघेही तिथे पोहचले.
     पोलिस इन्स्पेक्टरला पाहिल्यावर हातगाडीवाला हमाल काहीसा टरकला. रानडे त्याचा खांदा थोपवत म्हणाला, '' घाबरू नकोस. आम्हाला काही विचारायचं आहे. '' असे म्हणत त्याने पोलिस व्हॅनमध्ये असलेली रोहिणीचे नाव असलेली रिकामी पेटी दाखवली. पु़ढे  म्हणाला, '' परवा तू अशाच प्रकारची एक पेटी कोठे पोहचवलीस ते सांग. आणि त्यात काय होतं?''
     हमालाने ती पेटी अगदी लक्षपूर्वक न्याहळली. मग काही तरी विचार करत म्हणाला, '' आठवलं, मी बाजारात माल  घेऊन येत असताना एक माणूस असलीच एक पेटी घेऊन आला आणि मला म्हणाला, '' ही पेटी एके ठिकाणी पोहचवायची आहे. ''
     मी नकार दिला, तर त्याने मला शंभराच्या दोन नोट्या दाखवल्या आणि वर म्हणाला, '' काम झालं की आणखी देईन. '' 
     दोनशे रुपये पाहिल्यावर मला मोह आवरला नाही. कारण माझ्यासाठी फारच जादा होत्या.मी विचारलं, कुठे पोहचवायचं तर म्हणाला, ''मी गाडीसोबत येईन. ठिकाण आलं की सांगेन.'' असे म्हणत तो गाडीसोबत चालू लागला. मग तंबाकूलाईनला गेल्यावर त्यानं गाडी थांबवायला सांगितली. ''
     ''तू पेटी घेऊन दुकानात गेला होतास का? '' रानडेनं विचारलं.  ''नाही, पेटी त्याने स्वत:च उचलली आणि दुकानात घेऊन गेला. जाता जाता त्याने आणखी एक शंभराची नोट माझ्या हातात थांबवली. ''
     अतुल म्हणाला, '' तू आम्हाला ते दुकान दाखवशील. आम्ही तुला बक्षीस देऊ.''
हमालाने अतुल आणि इन्स्पेक्टर रानडे या दोघांना काही अंतरापर्यंत नेलं आणि लांबूनच बोट करून  दुकान दाखवलं. दुकानावर लिहिलं होतं,'' एव्हरीडे स्टोर''. दुकान छोटसंच होतं. रानडे अतुलला म्हणाला, '' आता मलाही काही तरी गंभीर प्रकार असल्याचा संशय येतो आहे. मला एक आयडिया सुचली आहे. मी दुकान मालकाशी बोलतो. तू मधे अजिबात काही बोलू नकोस. ''
     काऊंटरवर चष्मा घातलेला साठीचा एक  गृहस्थ बसला होता. आत कपाटांमध्ये घरगुती वापराच्या वस्तू लावलेल्या होत्या. रानडे रोहिणीचे नाव असलेली पेटी काऊंटरवर ठेवत म्हणाला,  '' दोन दिवसांपूर्वी एक माणूस अशाचप्रकारची एक पेटी घेऊन इथे आला होता.ती पेटी कोठे आहे? ''
     गणवेशधारी इन्स्पेक्टरला पाहिल्यावर दुकानदार चपापला आणि काहीसा चाचपडत म्हणाला,'' कसली पेटी? कोण माणूस ? मला काही माहित नाही. ''
     '' तू असा नाहीस सांगणार... फफ असे म्हणत रानडे काऊंटरच्या बाजूला असलेली फळी उचलून आत गेला. आतल्या बाजूला एक दरवाजा होता. बहुतेक ती  स्टोररुम असावी. तितक्यात अतुल ओरडला, '' ती बघ! ''आतल्या खोलीत एका कोपर्‍यात झाकण उघडलेल्या अवस्थेत एक पेटी ठेवलेली होती. त्यावरचे रोहिणी हे नाव स्पष्टपणे दिसत होते.  
     ''यात काय होतं? ...  तू जरी काही सांगितलं नाहीस तरी त्यानं आम्हाला सारं काही सांगितलं आहे. आम्ही त्याला पकडलं आहे. ''रानडेने अंधारातच तीर मारला.
     दुकानदाराच्या कपाळावर घामाचे थेंब दिसायला लागले. तो म्हणाला, '' पण ते लोक तर रात्री येणार होते., मग तुम्ही कोणाला पकडलंत? ''
     रानडेने मारलेला तीर बरोबर निशाण्यावर बसला होता. तो म्हणाला,'' आम्ही त्या लोकांच्याही अगोदर आलो आहोत. आता मुकाट्याने सांग, या पेटीतून काय काढलंस ते? '' 
     खोलीच्या एका कोपर्‍यात एक लाकडी पेटी होती. दुकानदाराने ती उघडली.  आत पाहताच रानडे पार  चकीत झाला. त्यात सोन्या-चांदीचे दागिने आणि काही किंमती मूर्त्या होत्या. दुकानदाराने सांगितलं, हा चोरीचा माल आहे. तो     नेहमीच अशाप्रकारचा माल खरेदी करतो  आणि सराफांना विकतो. त्याचे संबंध चोरांच्या एका टोळीशी होते. चोरी केलेल्या मालाचा हिसाब-किताब करण्यासाठी ते आज रात्री  इथे येणार असल्याचे त्याने सांगितले.
     रानडेने लागलीच पोलिस ठाण्याला खबर दिली.  तिथून काही पोलिस साध्या वेशात आले. सगळे इकडे-तिकडे लपून बसले. अंधार दाटून आल्यावर तीन माणसे दुकानात शिरली. त्यांना लगेच अटक करण्यात आली.
     त्यांनी आपला गुन्हा कबूल केला. ते चोर होते. किंमती वस्तू एव्हरीडे स्टोरच्या माध्यमातून दुसर्‍या व्यापार्‍यांना, सराफांना विकत. लुटलेल्या संपत्तीत सगळ्यांचा समान वाटा असे. त्यांच्या सांगण्यावरून पोलिसांनी सगळा माल हस्तगत केला. त्यातला एक चोर नेत्रहीन मुलांच्या शाळेजवळच राहत होता. त्यानेच शाळेतल्या शिपायाला शंभर रुपये देऊन पेटी खरेदी केली होती. शाळेतल्या पेटीतून चोरीचा माल सहज पाठवता येईल.  आणि कुणाला कसला संशय येणार नाही, या उद्देशानेच त्याने पेटीची खरेदी केली होती. पण अतुलने रोहिणीच्या नावाची पेटी हातगाडीवर पाहिली आणि तो बैचेन झाला. पेटी बाहेर कशी पडली याचा  अधिक तपास केला आणि ...
   रानडे अतुलला म्हणाला,'' तुझी नजर पोलिसांपेक्षाही  तीक्ष्ण आहे रे. '' अतुल फक्त हसला.

No comments:

Post a Comment