Thursday, March 2, 2017

शाब्दिक कुस्तीमध्ये मोदींची आगेकूच


     उत्तर प्रदेशातील निवडणूक प्रचार शिगेला पोहचला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसत आहे. मोदी यांनी काँग्रेसची आणि त्यांच्या नेत्यांची विशेषत: राहूल गांधी यांची खिल्ली उडवणे,हा एककलमी कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यांचा हल्ला प्रखरपणे उलटवून टाकण्यात काँग्रेस अपयशी ठरत आहे. शिवाय देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष असलेल्या काँग्रेसकडे सध्या अनुभवी आणि आक्रमक प्रचार करणार्या नेत्यांची उणीव भासत आहे, हे उत्तर प्रदेशातील निवडणुकीत प्रकर्षाने जाणवते. एकीकडे अखिलेश यादव मोदी यांच्या तसेच भाजप नेत्यांच्या वक्तव्याला तोडीस तोड प्रत्युत्तर देत असताना काँग्रेस नेते मात्र प्रचारातील आक्रमकपणा हरवून बसले आहेत. जनतेला आवाहन करताना मोदी पंधरा वर्षे ज्यांनी आपल्यास लुटले त्यांना खड्यासारखे बाजूला करण्याची वेळ आता आल्याचे सांगत आहेत. उत्तर प्रदेश राज्यातील शेतकर्यांच्या त्याचबरोबर सर्वसामान्य जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांबाबत सर्वच नेत्यांकडून तोंडभरून आश्वासने दिली जात आहेत. निवडणुकीच्या निमित्ताने राज्यातील जनतेला राजकीय नेत्यांनी आपल्याकडे खेचण्याची स्पर्धाच चालवली आहे. येत्या अकरा मार्च रोजी विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. तत्पूर्वी प्रचाराची रणधुमाळी टिपेला पोहोचेल, असे दिसते. काँग्रेसकडून रायबरेलीचा अपवाद वगळता प्रियांका गांधी प्रचारात सक्रिय झाल्या नाहीत. परिणामी एकट्या राहुल गांधींवरच काँग्रेस प्रचाराचा भार पडला आहे. मोदी यांच्या आक्रमक शैलीसमोर राहुल टिकताना दिसत नाहीत. फर्ड्या हिंदीत जनतेशी संवाद साधत पंतप्रधान मोदी आपल्या विरोधकांना शाब्दिक कुस्तीमध्ये चारीमुंड्या चीत करताना सध्या तरी दिसत आहेत. उत्तरप्रदेशचे निवडणूक रणांगण जोरदार धडाडत आहे. यात कोण बाजी मारणार हे येत्या काही दिवसांतच कळणार आहे.



No comments:

Post a Comment