Monday, March 20, 2017

वूमेन फायटर पायलट छू लिया आसमान

     गेल्या काही दशकांमध्ये महिलांनी विविध क्षेत्रे पादाक्रांत केली आहेत. पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याची सिद्धता त्यांनी करून दाखवली आहे.लष्करातल्या सशस्त्र दलांमध्ये त्यांनी आपली उपस्थिती नोंदवली आहे.पण लडावू विमान उडवण्याची त्यांची आकांशा मात्र पूर्ण होऊ शकली नव्हती. त्याला पारंपारिक विचार,पुरुषवादी सत्ता, शारीरिक सीमा आडव्या येत होत्या.पण महिलांनी यातही बाजी मारली आणि हम भी कुछ कम नाहीं हे सगळ्यांना दाखवून दिले. गेल्यावर्षी 18 जून 2016 हा दिवस महिला सक्षमीकरणाच्यादृष्टीकोनातून इतिहासात महत्त्वाचा ठरला. फ्लाइंग कॅडेट्स भावना कांत,अवनी चतुर्वेदी आणि मोहना सिंह या भारताच्या तीन बहाद्दूर महिलांनी प्रथमच वायुसेनेत वैमानिक लढाऊ विमाने चालवण्याची ऐतिहासिक कामगिरी केली.या तिघींनाही फायटर पायलटचा मान मिळाला.
     जवळपास तीन दशकांपासून महिलांना विविध अडथळ्यांमुळे या क्षेत्रात येण्यांपासून वंचित ठेवण्यात आले होते. मात्र सगळ्या गोष्टीतून अगदी तावून-सुलाखून निघाल्यासारख्या या तीन महिला विविध अडथळे पार करत इथंपर्यंत पोहचल्या. 18 जून 2016 च्या सकाळी हैद्राबादच्या हकिमपेटमध्ये पासिंग आऊट परेदडच्या सोबतीने भारताच्या सैन्य इतिहासात एक सुवर्ण पान जोडले गेले. या तीन भारतीय मुलींचा पासिंग आऊट परेड पाहण्यासाठी स्वत: तत्कालिन संरक्षणमंत्री मनोहर पार्रीकर उपस्थित होते. सोबतीला एयरफोर्सचे प्रमुख म्हणजे एयरचीफ मार्शल अरुप शहादेखील हजर होते. त्यांनी या मुलींची सलामी स्वीकारली. त्यांना भविष्यासाठी शुभाशीर्वाद दिले. आणि सोबतीला अगदी पुरुषांसारख्या लढावू विमानचालक व्हाल, असा त्यांना विश्वास दिला.

     गेल्यावर्षी 8 मार्च 2016 ला म्हणजेच जागतिक महिला दिनादिवशी या तिघींसाठी पायलट ट्रेनिंगची घोषणा केली गेली. हे प्रशिक्षण त्यांनी पूर्ण करताना विविध प्रकारची विमाने उडवली. आणि शेवटी त्यांचा पहिल्या लढावू पायलट म्हणून वायूसेनेत समावेश करण्यात आला.त्यांची प्रत्येक प्रकारच्या लढावू विमान उडवणार्या नभयोद्धांच्या टीममध्ये निवड झाली आहे. या टीममध्ये आतापर्यंत फक्त म्हणजे फक्त पुरुषच होते. मोठ्या संख्येने महिला वायुसेनेत आहेत. त्यांनी विमाने उडवली आहेत,पण ती ट्रान्सपोर्ट विमाने असायची किंवा हेलिकॉप्टर. त्यांनी लढावू विमाने चालवली नाहीत. या तिन्ही मुलींनी आतापर्यंत डिंडीगुल आणि हैद्राबादच्या एयरफोर्स अॅकेडमीमध्ये ट्रेनिंग घेतले आहे.आता शेवटचे प्रशिक्षण त्यांना कर्नाटकातल्या बीदरमध्ये करावे लागणार आहे.भारतीय सैन्यात एक नवा अध्याय रचणार्या या तीन मुलींमधील एक भावना कांत बिहारमधील बेगुसरायची रहवाशी आहे. तर अवनी चतुर्वेदी मध्यप्रदेशातील रीवाहून आलेली आहे. आणि मोहना सिंह वास्तविक राजस्थानच्या झुंझुनूची आहे. पण तिचे वडील बडोद्याला एयरफोर्स वारंट ऑफिसर आहेत. दिल्लीच्या एयरफोर्स स्कूलमधून शिकलेली मोहना सिंहचे आपल्या वडिलांप्रमाणे वायुसेनेत जाण्याचे स्वप्न होते. बिहारच्या बेगुसरायची भावना कांत हिने बेगळुरूमधून बीई इलेक्ट्रिकलचे शिक्षण घेतले आहे. पायलट बनण्याचा तिची नेहमीच  तीव्र इच्छा राहिली आहे. अवनी चतुर्वेदीने राजस्थानच्या टोंक जिल्ह्याच्या वनस्थली विद्यापीठातून कॉम्प्युटर सायन्सची डिग्री मिळवून नंतर तिने एयरफोर्स जॉइन केले.
     गेल्या अडीच-तीन दशकांपासून महिलांना पुरुषांप्रमाणे लाढाऊ विमान उडवण्याची परवानगी द्यावी का नको, असा वाद-विवाद  चालला होता. या वादात सुरुवातीपासूनच आपल्या पारंपारिक पुरुषवादी विचाराचे प्रतिनिधीत्व करणार्या अधिकार्यांनादेखील महिला पायलटनी लाढाऊ विमान चालवू नये, असे वाटत होते. यासाठी ते कसले कसले तर्क मांडत होते. पण वायू सेनेच्या तर्कांना बाजूला करण्याचे काम 25 नोव्हेंबर 2009 रोजीच्या घटनेने केले. तत्कालिन राष्ट्रपती प्रतीभाताई पाटील यांनी,राष्ट्रपती होण्याच्या नात्याने त्या भारतीय सेनेच्या सर्वोच्च कमांडरदेखील होत्या, त्यांनी  सुखोई-30 हे अत्याधुनिक लढाऊ विमान अर्धातास उडवले.त्याचवेळेला निश्चित झाले की, आज ना उद्या सेनेच्या सगळ्यात प्रेस्टीजियस विंगमध्ये महिलांचा समावेश करावा लागणार. माजी राष्ट्रपती प्रतीभाताई पाटील यांनी पुण्यातल्या लोहगाव वायूसेनेच्या विमानतळावरून उड्डान केले होते. असे करणार्या त्या पहिल्या महिला होत्या, शिवाय त्या देशाच्या सर्वोच्च पदावर होत्या. राष्ट्रपती पाटील यांनी निव्वळ छंद किंवा आपला शौक पूर्ण करावा,म्हणून त्यांनी सुखोई-30 उडवले नव्हते. तर यामागे त्यांचा महिला सक्षमीकरणाचा आपला संदेश होता.शिवाय महिलांना लढाऊ विमान उडविण्यास  देण्याविषयी जी चर्चा चालली होती, त्यावर प्रतीभाताई पाटील यांनी टाकलेल्या पावलामुळे सकारात्मक प्रभाव पडला. अशाप्रकारे अनेक अडचणींवर मात करत देशातल्या बहाद्दूर मुलींनी शेवटी फायटर पायलट बनण्याचे आपले स्वप्न साकार केले.

No comments:

Post a Comment