Wednesday, March 22, 2017

सेलिब्रिटींचे व्यसन आणि त्यांचे अनुकरण

     सिनेमातल्या नट-नट्यांवर त्याचे चाहते आपला जीव ओवाळून टाकत असतो. त्यांना आदर्श मानतात. तो काय खातो,काय पितो,काय नेसतो, या सगळ्या गोष्टींचा शोध काढून त्याचे आपल्या आयुष्यातही अनुकरण करतो. त्याला पाहायला आपला जीव धोक्यात घालतो. मात्र अशा नट-नट्यांचे रिअल आणि रील आयुष्यात जमीन अस्मानाचा फरक असतो. तरीही त्याला आपला देव मानून त्याचे चाहते,त्याची पूजा करतात. सिनेमा जगतात वावरणारी मंडळी सतत पार्ट्यांमध्ये वावरत असतात. त्यांच्यासाठी दारू-सिगरेट या सगळ्या गोष्टी आम बात आहेत. अशा माणसांना खरे तर युवकांनी आपला आदर्श वगैरे मानणे,चुकीचे आहे. हां, मात्र तोही आपल्या आयुष्यात अशा वाईट गोष्टी करत नसेल तर त्याचा आदर्श घ्यायला काहीच हरकत नाही. अलिकडेच बॉलीवूडचा किंग खान समजला जाणारा शाहरुख खानने आपल्या एका मुलाखतीत आपण दारू-सिगरेट या सवयींना पूर्णपणे सोडचिठ्ठी दिल्याचे सांगितले. अर्थात त्याने आपल्या मुलांसाठी केले असल्याचे सांगितले. ही गोष्ट त्यांच्या चाहत्यांसाठी चांगली आहे. कारण त्यांचा आवडता हिरो आता निर्व्यसनी आहे. खरे तर त्याने या गोष्टी आपल्या चाहत्यांच्या खातर सोडल्या असत्या तर त्याला खरेच मानले असते, पण तसे त्याच्या चाहत्यांचे भाग्य कुठले? पण तरीही त्याने व्यसन सोडले हे बरेच झाले. आता त्याच्या चाहत्यांनी त्याचा पेहराव, नक्कल यांची कॉपी करतानाच त्याची मेहनत, त्याची कामाप्रती निष्ठा याचाही आदर्श घ्यायला काहीच हरकत नाही.
     माणसं ही चांगलीच असतात. मात्र आयुष्याच्या एकाद्या वळणावर त्यांचा पाय घसरतो.कदाचित शाहरुखच्याबाबतीत तसंच काहीसं झालं असावं. शाहरूख 15 वर्षांचा असतानाच त्याचे वडील गेले आणि कदाचित म्हणून की काय त्या नाजूक वयात भरकटला. त्याला दारू आणि सिगारेटचे व्यसन लागले. सिनेसृष्टीत आल्यापासून तो आरोग्याची बाकी सर्व काळजी घेतोय पण, तरीही दारू, सिगारेट सुटत नव्हती. आता मात्र त्याने नशापाणी पूर्णत: बंद केल्याचे सांगितले.चाहत्यांची नाही तरी त्याला आपल्या मुलांची काळजी आहे.आणि ते खरेच आहे. मुलांचे भविष्य त्याच्यासारखेच भरकटत जाऊ नये, याची कल्पना आल्यानेच त्याने हा एक चांगला निर्नय घेतला आहे. त्यामुळे तो अभिनंदनास पात्र आहे. आई-वडील झाल्यानंतर आपले स्वत:चे अस्तित्वदेखील अपत्यांभोवती फिरत असते. पालकांनी प्रत्येक कृती, बोलणे हे मुलांचा विचार करूनच करावे. आजकाल तर नवी पिढी फारच संवेदनशील आणि तितकीच आततायी आहे. त्यामुळे पालकांचे चुकीचे वागणे चटकन हेरून त्याचे भांडवल करण्यासही ते मागेपुढे पाहणार नाहीत. त्यामुळे या काळात पालकत्व जरा कठीणच झालेय. शाहरूखने कदाचित काळाची ही पावलं ओळखली असावीत आणि त्यातूनच मद्यपान आणि धूम्रपान सोडले असावे. अर्थातच त्याने व्यसन सोडण्याचे कारण हेही असेल की, त्याचा एक मुलगा तारुण्याच्या उंबरठयावर आहे तर दुसरा अगदीच लहान म्हणजे चार वर्षांचा आहे. शाहरूखचा निर्णय या दोघांच्याही वयाकडे पाहता अत्यंत विचारशील आहे, असे म्हणावे लागेल.

     या सेलिब्रिटींचे आयुष्य तसे फारच वेगळे असते. त्यांच्यासाठी ड्रिंक्स, सिगारेट आणि इतर शौकही फार क्षुल्लक, अगदी सहजपणे दिनक्रमात असतात. विषय निघालाच आहे तर या बाबतीत जे सेलिब्रिटी आधीपासूनच पुरेसे नियमबद्घ जीवन जगताहेत त्यांचेही कौतुक करायलाच हवे.अशांचा आदर्श घ्यायला काहीच हरकत नाही. अमिताभ बच्चन यांनी बर्याच वर्षांपासून व्यसनांना बाय बाय केलाय. बॉलिवूडमधील खिलाडी म्हणवला जाणारा अक्षय कुमार तर या बाबतीत आदर्शच म्हटला पाहिजे. कारण तो दारू पित नाही आणि त्याला इतर कोणतेही व्यसन नाही. रात्रीच्या पाटर्यांना तो कधीही जात नाही. रात्री दहा वाजता झोपी जातो आणि पहाटे चार वाजता त्याचा दिवस सुरू होतो. व्यायाम, पोहणे, नियमबद्घ खाणे, कामाचे तास ठरवून असणे हे सारे काही तो काटेकोरपणे पाळतो. त्यामुळेच तो पन्नाशीच्या घरातही फिट अँण्ड फाईन आहे. त्याचा आणखी एक गुण आदर्शवत आहे. त्याच्याकडे दानतवृत्ती आहे. दुष्काळामुळे ज्या शेतकर्यांनी आत्महत्या केल्या, त्यांच्या कुटुंबांच्या मदतीसाठी तो धावून गेला. धावून जातो आहे. सिनेमात वावरणार्या अन्य सेलिब्रिटींनीही आपल्या आयुष्यात काही सकारात्मक बदल करायला हवेत. निदान आपल्या चाहत्यांसाठी तरी त्यांनी या गोष्टी करायला हव्यात. कारण चाहते आहेत, तर ते आहेत. त्यामुळे आपले आयुष्य त्यांच्या नावावर करून त्यांनी आपले आयुष्य एक आदर्शवत करायला हवे. सामान्य लोकांनीही यातून काहीतरी बोध घ्यायला हवा.(धूम्रपान आरोग्यासाठी घातक आहे.)

No comments:

Post a Comment