Thursday, March 9, 2017

मनसेचा राजकीय प्रवास अधोगतीकडे?

      आजच्या घडीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अस्तित्व धोक्यात आले आहे. 9 मार्च 2006 ला मनसे या राजकीय पक्षाची स्थापना झाली. ठाकरे घराण्यातील राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले आणि त्यांनी स्वतंत्र पक्ष स्थापन केला. त्या घटनेला आता 11 वर्षे पूर्ण झाली आहेत. महाराष्ट्राच्या युवापिढीने मोठ्या आशेने एका नव्या नेतृत्वाची अशा धरली. राज ठाकरेंनीही ही आशा जागृत ठेवून संपूर्ण महाराष्ट्रात निरनिराळ्या टीम फिरवून एक पर्यायी पक्ष कसा असावा, याचे फार चांगले आकलन केले. तसे पाहता 11 वर्षे हा एखाद्या पक्षाला उभारी धरण्यासाठी व त्यापेक्षा स्थिरावण्यासाठी योग्य काळ आहे; पण दुर्दैवानेमनसेच्याबाबतीत उलटे वारे वाहत असल्याचे दिसत आहे. आतापर्यंतच्या मनसेच्या राजकीय प्रवासात प्रारंभीचा काळ चांगलाच उभारीचा होता, मात्र गेल्या दोन वर्षात मनसेची वाटचाल अधपतनाकडे होत आहे. एखाद्या राजकीय पक्षाचा अल्पावतीतच र्हासाकडचा प्रवास चिंताजनक म्हटला पाहिजे. मनसे नेतृत्वाने यासाठी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. आता नाही तर कधीच नाही, या उक्तीचा नेतृत्वाला विसर पडता कामा नये.
     तरुणाई मोठ्या आशेने या पक्षाकडे आकर्षित झाली होती. यालामनसेआणि राज ठाकरे यांच्या जमेच्या बाजूमध्ये सुरुवातीला राजच्या तडफदार व्यक्तिमत्त्व आणि उत्तम वक्तृत्व कारणीभूत होत्या. पक्ष उभारणीच्या काळामध्ये युवकांसाठी मनविद्यार्थी सेना, कामगार सेना आणि महिलांसाठीच्या शाखांची स्थापना करण्यात आली. मनसे सिनेकलाकार संघटनाही दखलपात्र होती. विविध उद्योगपतींशी असलेली मैत्री आणि सर्वपक्षीय नेते मंडळींशीही राज ठाकरेंची मैत्री सुरुवातीला संघटना सभांना होणारी अलोट गर्दी, त्यांच्या वक्तृत्वाला मिळणारी दाद यामुळे पक्ष म्हणून बरेचजण आशेनेमनसेकडे पाहत होते. अल्पावधीत बरेच कार्यकर्तेही मनसेच्या झेंड्याखाली जमले आणि अनेक युवकांच्या राजकीय स्वप्नांना खतपाणी मिळाले.
     मनसेला स्थापनेच्या प्रारंभालाच यश मिळाले होते. केवळ चार महिन्यांत पक्षाचा पहिला नगरसेवक अमरावतीमधून निवडून आला होता. नंतर तर माणगाव, जि. रायगड येथे पंचायत समितीमध्ये पक्षाला यश मिळाले. मार्च 2007 मध्ये पक्षाने पहिल्यांदा महानगरपालिका निवडणुका लढविल्या. यामध्ये खूप यश आले नाही, परंतु मुंबईत सात, नाशिकमध्ये पाच आणि पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये तीन-चार नगरसेवक निवडून आले आणि पक्षाचे स्वत:चे अस्तित्व निर्माण झाले. हळूहळू पक्षाने पाय पसरण्यास सुरुवात केली. नंतर आलेल्या2009 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये मुंबईत स्वत:ची एकही जागा जरी जिंकता आली नाही तरी भाजपा-सेनेचे सहाही उमेदवार पाडण्यात मनसे यशस्वी झाली. त्यामुळे एक दखलपात्र पक्ष म्हणून लोकांच्या नजरेत मनसेला यश मिळाले. त्यानंतर सहा महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षाने 99 जागा लढविल्या आणि चक्क मुंबईत नऊ, नाशिकमध्ये तीन, पुणे एक, कल्याण दोन आणि मराठवाड्यात एक असे 13 आमदार निवडून आले आणि राज ठाकरेंच्या शिलेदारांनी विधानसभेत प्रवेश मिळविला.
      विधानसभेच्या पहिल्याच दिवशी स्व. रमेश वांजळे व आ. राम कदम यांनी अबु आझमींच्या श्रीमुखात भडकावून सनसनाटी निर्माण केली. फक्त 13 आमदार असूनही पूर्ण विधानसभा त्यांनी डोक्यावर घेतली आणि सभागृह दणाणून सोडले. नेमकी येथेच पक्षाच्या र्हासाची नांदी झाली, असे दुर्दैवाने म्हणावे लागेल. कारण या सवंग लोकप्रियतेचा अनुनय हाच मनसेचा मुख्य कार्यक्रम त्यानंतरच्या काळातही चालूच राहिला. नंतरच्या काळात आ. हर्षवर्धन जाधव यांना पोलिसांनी मारहाण केल्यानंतर मनसे नेतृत्वाने चक्क आपल्याच आमदाराकडे पाठ फिरविली. त्याचवेळेस औरंगाबाद जिल्हा परिषदेमध्ये मनसेचे आठ उमेदवार निवडून आले व पक्षाने काँग्रेसला पाठिंबा दिला. यामुळे आ. जाधव नाराज झाले आणि फुटीच्या उंबरठ्यावर गेले.
      पक्षाला दुसरा झटका बसला तो आ. रमेश वांजळे यांचा दुर्दैवी मृत्यू आणि त्यानंतर त्यांच्या पत्नीने राष्ट्रवादीकडून लढण्याचा घेतलेला निर्णय, हा होय. त्यामुळे पक्षाची काही प्रमाणात का होईना, मानहानी झाली. परंतु, त्यानंतर 2012 च्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा राज ठाकरेंची जादू चालली आणि मुंबईत 29 नगरसेवक निवडून आले आणि पुणे, कल्याण, डोंबिवलीत प्रमुख विरोधी पक्षनेतेपद मनसेला मिळाले. या यशाच्या शिरपेचाचा तुरा म्हणजे नाशिकमध्ये मनसेची सत्ता आली आणि अॅड. यतिन वाघ यांच्या रुपात मनसेचा पहिला महापौर झाला.
      परंतु, देशभर याचवेळी भ्रष्टाचारविरोधी आंदोलनांमुळे काँग्रेस विरोधाची प्रचंड लाट तयार होत होती. या लाटेवर मोदींसारख्या स्वच्छ नेतृत्वाची साथ घेऊन भाजपा स्वार झाली. परंतु, नेमकी हीच वेळ राज यांच्या हातून निसटून गेली. जनमानसाची ही बदलाची भावना मनसेने लक्षातच घेतली नाही. त्यामुळे 2014 च्या लोकसभेसाठी एकीकडे राज ठाकरे मोदींचे समर्थन करत होते आणि दुसरीकडे युतीच्या उमेदवारांविरुद्ध लढतही होते. परिणामी मनसेच्या 11 उमेदवारांपैकी 10 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली. त्यानंतर मोदींचे समर्थन करायचे की विरोध हा गोंधळ राज ठाकरेंनाही समजला नाही. शेवटी आपला पक्ष यापुढे लोकसभा निवडणूक लढविणार नाही, असे राज ठाकरे यांनी जाहीर केले.
      पक्षाला खरी घरघर येथूनच लागली. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सुरुवातीचीशिवसेना-विरोधाची धार बोथट झाली होती. पक्षाकडे कोणताही ठोस, सकारात्मक कार्यक्रमाचा मसुदा नव्हता. निष्ठावान कार्यकर्त्यांचे आणि दुसर्या फळीतल्या नेत्यांचे पक्षात स्थानच नव्हते. ‘एकखांबी तंबूप्रमाणे पक्ष केवळ एकाच नेत्याच्या भोवती फिरत होता. राजसाहेबांनी सुरू केलेल्या टोलमुक्ती आंदोलनाला पाहिजे. तसा प्रतिसाद मिळाला नाही. ‘खळ्ळ खट्याक्संस्कृतीही पुरोगामी, सुसंस्कृत महाराष्ट्राला मानवली नाही. . राम कदम व आ. भोईर यासारख्या खंद्या शिलेदारांनी भाजपामध्ये प्रवेश केला.
 2014 च्या विधानसभेसाठी पक्ष पुन्हा कंबर कसून उभा राहण्याच्या तयारीत होता. राज ठाकरेंनी त्यांच्या विकासाच्याब्लूप्रिंटची बरीच हवा केली होती. परंतु, ऐनवेळी माशी शिंकली आणि संपूर्ण महाराष्ट्राचे, प्रसारमाध्यमांचे लक्ष वेधून घेणारी अनपेक्षित बातमी आली, ती म्हणजे भाजपा-शिवसेना युती तुटल्याची त्यामुळे सगळा प्रसिद्धी झोत याच चर्चेकडे केंद्रित झाला आणि बहुचर्चितब्लूप्रिंटची हवाच गूल झाली. आता भाजपा-शिवसेना युती तुटल्यावर त्याचा फायदा मनसेला मोठ्या प्रमाणात होईल असे वाटत होते.
      परंतु, पक्ष पुन्हा फुटला आणि भाजपा-शिवसेनेच्या गळाला आयते उमेदवार लागले. 2014 विधानसभेसाठी मनसेचे 130 उमेदवार लढले. यामध्ये बाळा नांदगावकर, प्रवीण दरेकर, शिशिर शिंदे, नितीन सरदेसाई, वसंत गिते हे मनसेचे पहिल्या फळीचे नेते सपशेल पडले आणि पुणे जिल्ह्यातून केवळ एक उमेदवार निवडून आलात्यानंतर मात्र माजी आ. वसंत गिते आणि प्रवीण दरेकर हे भाजपावासी झाले आणि पक्ष अजून क्षीण झाला. लोकसभेनंतर मी विधानसभा निवडणूक लढविणार नाही असे सांगून राजसाहेबांनी हवा निर्माण केली होती. परंतु, नंतर त्यांनी त्याबद्दल घूमजाव केले. या सगळ्यामुळे कार्यकर्ते आणि जनमानस या दोहोंतही पक्षाची विश्वासार्हता संपुष्टात आली. जो युवकवर्ग बाळासाहेबांची प्रतिमा म्हणून राज यांच्याकडे पहात होता. त्यांच्या पदरी तर घोर निराशा आली. केवळ नकला करण्याने बाळासाहेबांची जागा कुणीही घेऊ शकत नाहीत, हे सर्वांनाच कळले. आताच्या नगरपालिका, महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमधील मनसेच्या कामगिरीकडे पाहता पक्षाच्या अस्तित्वाद्दलच शंका वाटू लागली आहे. केवळ एका व्यक्तिभोवती केंद्रित असलेला पक्ष अशी प्रतिमा असणारा, कोणतीही निश्चित ध्ययधोरणे नसलेला आणि तळातील कार्यकर्ते आाणि नेते नसलेला भरकटलेला मनसे पक्ष असेच चित्र दुर्दैवाने 12 व्या वर्धापनदिनी दिसत आहे.

      भारताच्या राजकीय इतिहासात केवळ दोन जागा मिळालेला भाजपा नंतर सत्तेपर्यंत पोहोचला. 1980 साली 15 ते 60 आमदार सोडून गेल्यानंतर शरद पवारांनी देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वोच्च पदापर्यंत मजल मारली. परंतु, त्याकरिता कठोर ध्यास,आत्मपरीक्षण, प्रचंड मेहनत आणि कार्यकर्त्यांचा विश्वास मिळवणे या गोष्टी आवश्यक असतात. या गोष्टी राज ठाकरे आणि मनसेकडे आहेत. मात्र त्याचा सही वापर झाला नाही. त्यामुळे मनसे सध्या अधोगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. पक्षनेतृत्वाने आपल्या होत असलेल्या र्हासाची कारणमीमांसा शोधायला हवी. आणि पुन्हा नव्याने नेटाने उभारी घ्यायला हवी. राज ठाकरे यांनी राज्याचा झंझावात दौरा करून पक्षाची विस्कटलेली घडी बसवायला हवी. मनसे या राजकीय पक्षाची शोकांतिका होऊ नये, अशीच सगळ्यांची भावना असणार आहे.

No comments:

Post a Comment