Saturday, March 4, 2017

अवास्तव अपेक्षा आणि ताणतणाव


     सध्याचा काळ हा स्पर्धेचा आहे. अवास्तव अपेक्षा आणि सततची धावपळ यामुळे ताणतणाव वाढला आहे. यामुळे सर्वच वयोगटातील स्त्री-पुरुष या समस्येने ग्रासले आहेत. शरीर आणि मन या विकाराला बळी पडत आहे. या ताणतणातून मुक्ती मिळवण्यासाठी रोजची दिनचर्या निश्‍चित केली पाहिजे. जीवनाला एक योग्य दिशा असली पाहिजे. याला आध्यात्म आणि योगा याची जोड दिली पाहिजे. वैद्यकीय क्षेत्रातील जाणकार,सल्लागारही याला पुष्टी देत आहेत.
     ताणतणावाचा फटका मानसिक, शारीरिक आणि भावनिकदृष्ट्या बसतो. मानसिक दुष्परिणामामध्ये निराश होणे, निर्णयक्षमता नाहिसे होणे, कुठलीही गोष्ट लवकर न सुचणे,गोंधळून जाणे यांचा समावेश होतो. शारीरिक दुष्परिणामध्ये छातीत धडधडणे,अनावश्यक डोके दुखणे,छातीत जळजळ निर्माण होणे,पोटाचे विकार जडणे,ओठ कोरडे पडणे,हात थरथर कापणे अशा गोष्टी व्हायला होतात.भावनिक समस्यांमध्ये मन निराश होणे,खिन्न होणे,आवडी गोष्टीही करू न वाटणे,उगाचच चिंता वाटू लागणे,काल्पनिक विचार येणे यासारख्या व्याधी ताणतणावाने निर्माण होतात.

     या समस्येला आयुर्वेदाबरोबरच प्राणायाम,योग याद्वारा दूर सारता येते. वास्तविक सर्वच दु:खाचे मूळ एकच आहे, ते म्हणजे अपेक्षा पूर्ण न होणे.त्यामुळे आपल्या अपेक्षा या मर्यादित ठेवल्या पाहिजेत. अवास्तव अपेक्षा ताणतणावाला कारणीभूत आहे. प्रत्येकजण स्वत:कडून किंवा आपल्या पाल्याकडून अथवा आपल्या कार्यालयातील लोकांकडून अपेक्षा ठेवतात. यातल्या अवास्तव अपेक्षेने गोंधळण्याचा प्रकार होतो. ताणतणाव निवारण करण्यासाठी स्वत:च्या दिनचर्येत बदल करणे महत्त्वाचे आहे. आहार-विहार आणि नियमित व्यायामामुळे तणाव दूर करता येऊ शकते.कोणतीही समस्या नसतानाही तणाव निर्माण होत असल्यास दिनचर्येतील बदल हाच त्यावरील एकमेव उपाय आहे. वाचन,फिरणे,चांगले चित्रपट पाहणे,गप्पा मारणे याप्रकारचे काही विरंगळा मिळवून देणार्‍या गोष्टींमुळे ताण कमी कराता येऊ शकतो. हल्ली तणाव कमी करण्यासाठी व्यसनाचा आधार घेतला जातो, मात्र तेवढ्यापुरते जरी बरे वाटत असले तरी त्याच्याने ही समस्या आणखी वाढते. शिवाय व्यसन जडल्याने आणखी समस्या वाढून तणावात आणखी भर पडत जाते. आणखी एक महत्त्वाचे म्हणजे ताणतणावापासून दूर राहायचे असेल तर आवाक्याबाहेरच्या बाबी न करणे.थोडक्यात काय तर अंथरुण पाहून पाय पसरावे, या म्हणीचा अंगिकार केला पाहिजे.
लहान मुलांमध्येही ताणतणाव वाढत आहेत. खरे तर ही आपल्या देशातील मोठी समस्या म्हटली पाहिजे. इतक्या लहान वयात अशा समस्या निर्माण झाल्याने पुढे अनेक व्याधी आयुष्यभर चिटकतात. अभ्यास, आवडी-निवडीच्या वस्तू न मिळणे, पालक,शिक्षकांनी मारहाण करणे व रागावणे, घरातील भांडणे,मित्रांनी खेळात सहभागी करून न घेणे यामुळे लहान मुलांना चिडचिडेपणा,फिट्स,बालदमा,कमजोरपणा येणे यासारख्या काही दुष्परिणामांना सामोरे जावे लागते.
     कुमारगटातल्या मुलांमध्ये परीक्षेत अपेक्षित इतके यश न मिळणे तसेच मनातील इच्छा पूर्ण होत नाही, शिक्षणासाठी आर्थिक परिस्थिती नसणे यामुळे या वयोगटातील मुलांमध्ये नैराश्य निर्माण होऊन आत्महत्येसारखे प्रकार पाहावयास मिळतात. युवावर्गात शिक्षण घेऊनही नोकरी न मिळणे,नोकरी आणि कामाचा योग्य मोबदला न मिळणे, शिक्षणाप्रमाणे हवी तशी नोकरी न मिळणे,प्रेमभंग यासारख्या कारणांमुळे युवक आणि युवतींमध्ये वैफल्याची अवस्था निर्माण होऊन ते आत्महत्येला सामोरे जातात.
     प्रौढवयातील गटात पुरुषांमध्ये नोकरीच्या ठिकाणी होणारा त्रास शरीराची हालचाल कमी होणे यामुळे रक्तदाब,मधुमेह यासारखे विकार जडू शकतात.त्याचबरोबर मन खच्ची होणे, मुलाम्च्या भविष्याची चिंता,त्यांचे विवाह , शिक्षण,नोकरी यासारख्या बाबींमुळे मनस्ताप निर्माण होऊन ताणतणाव निर्माण ओऊ शकतात. या ताणतणावामुळे हल्ली पुरुष आणि महिलांमध्ये हृदयविकाराचे प्रमाणही वाढू लागले आहे. या आजाराने कमी वयोगटालाही ग्रासले असून पुरुषांमध्ये चाळीशीनंतर असलेले हृदयविकाराचे प्रमाण हल्ली 30 ते 40 वयोगटातही दिसून येऊ लागले आहे. महिलांमध्ये 50 वयानंतर हृदयविकाराचे प्रमाण अलिकडे चाळीशीनंतर आढळून येत असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातले जाणकार सांगतात.
     आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे महिलांमध्ये ताणतणावाचे प्रमाण अधिक आहे. घरी,नोकरीच्या ठिकाणी छख होणे,दुजाभाव, वरिष्ठ तसेच घरी पती-सासू यांच्याकडून वारंवार रागावणे यामुळे महिलांमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो.गर्भवती स्त्रियांमध्ये ताणतणाव निर्माण झाल्यास त्याचा परिणाम गर्भावर होऊ शकतो. गर्भवती स्य्रियांमध्ये ताणतणाव निर्माण झाल्यास त्याचा परिणाम गर्भावर होऊ शकतो. गर्भावी व्यवस्थित वाढ न होणे, वेळेआधीच प्रसृती होणे यासारखे दुष्परिणाम गर्भावर होऊ शकतो. याला गर्भसंस्कार महत्त्वाचे आहेत. यासाठी गर्भसंस्कार वर्ग घेतले जातात.याचा लाभ घेणे महत्त्वाचे आहे.


No comments:

Post a Comment