Sunday, March 5, 2017

स्वच्छ भारत अभियान जगणारे गाव


     रंगसापारा (गोवालपारा, आसाम).स्वच्छ रस्ते म्हणजे काय असतात? कशाप्रकारे घरं आणि अंगण स्वच्छ ठेवली जातात, नशामुक्त गाव कसं बनतं आणि बंधुभाव कसा राखला जातो,हे सगळं पाहायचं आणि जाणून घ्यायचं असेल तर पूर्व गुवाहटीपासून 150 किलोमीटर अंतरावर असलेल्या गोवालपारा जिल्ह्यातील रंगसापारार्याला एकदा आवश्य भेट द्यायला हवी. इथल्या गाववाल्यांच्या नसानसांत स्वच्छता आणि बंधुभाव वास करतो आहे.

     अर्थात हे सगळे एका दिवसात झालेलं नाही. स्वच्छतेला देवाचे दुसरे रुप मानणार्या या गाववाल्यांनी 1990 पासून यासाठी मेहनत घेतली आहे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्यावेळेला स्वच्छता अभियानाला सुरुवात केली, त्यावेळेला  तर गाववाले अगदी जीव तोडून कामाला लागले. काही दिवसांपूर्वीच या गावाचा आसामचे  मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी 2016 सालातील सगळ्यात स्वच्छ आणि सुंदर गाव म्हणून गौरव केला आहे. एकूण 80 कुटुंब संख्या असलेल्या आणि 475 लोकसंख्या असलेल्या या लहानशा गावात सगळे गाववाले अगदी मिळून-मिसळून गुण्यागोविंदाने राहत असल्याचे आपल्याला पाहायला मिळतात. जवळपास 147 वर्षांपूर्वीच्या या गावात कधीही आणि कसल्याही प्रकारचे जातीय अथवा धर्मीय तेढ निर्माण झालेलं नाही.भाईचार्याला गालबोट लागेल अशा प्रकारची कसलीही घटना इथे घडलेली नाही. ख्रिश्चन धर्म मानणारे हे लोक गारो समाजाचे आहेत.
     गावाचे सरपंच अलर्ट जॉन मोमिन सांगतात की, आमच्या गावातल्या लोकांना सुरुवातीपासूनच स्वच्छतेची आवड आहे.1990 मध्ये काही लोकांनी मिळून या दिशेने काम करायला सुरुवात केली. लोकांमध्ये स्वच्छतेविषयी जागृती निर्माण करायला प्रारंभ झाला. यानंतर 2000 मध्ये व्हिलेज मॅनेजमेंट कमिटी (गाव व्यवस्थापन समिती) ची स्थापना करण्यात आली. यात दहा सदस्य असतात. यांचा कार्यकाल एक वर्षांचा असतो. समितीच्या सदस्यांची निवड गाववाले एका ग्रामसभेत करतात. समितीने उघड्यावरील शौचमुक्त, स्वच्छता आणि बंधुभाव राखण्यासाठीच्या दिशेने काम करायला सुरुवात केली. नियम फारच कडक बनवण्यात आले. उघड्यावर शौचास बसणार्यास आणि दारु,सिगरेट ओढणार्यास पाच हजाराचा दंड आकारला जातो. परंतु, आश्चर्याची गोष्ट अशी की, आजपर्यंत एकानेही या नियमांचे उल्लंघन केलेले नाही आणि दंडही भरला नाही. सोबत बंधुभाव इतका दृढ आहे की, काही वर्षांपूर्वी ज्यावेळेला गोवालपारा जिल्ह्यात आसपासच्या गावांमध्ये काही हिंसक घटना घडल्या मात्र या गावाला त्याची कसल्याही प्रकारची झळ बसली नाही
     मोमिन सांगतात की, आता फक्त आमची एकच इच्छा राहिली आहे आणि ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात प्रसारणात  त्यांच्या स्वप्नांना मूर्त रुप देणार्या आमच्या या गावाचा उल्लेख करावा. मोदी यांनी स्वच्छता अभियानाचा प्रारंभ केला, त्यामुळे आम्हाला मनोबल प्राप्त झाले.
गाववाले  जिल्हास्तरावर असणार्या बैठकांनाही उपस्थिती दाखवू लागले.गावातले प्रत्येक घर या स्वच्छता अभियानशी जोडले गेले आहे. जिल्ह्यातल्या बैठकांमधून मिळणार्या कल्पनांचा वापर गावात होऊ लागला. उघड्यावर शौचास बसायचे नाही. घरोघरी शौचालय उभारायचे, त्याचा नियमित वापर करायचा, या सगळ्या गोष्टींमध्ये लोक अगदी मनापासून आणि आनंदाने सहभागी झाले. आणि बघता बघता गाव या अभियानमध्ये यशस्वी झाले. गाव आता शौचालययुक्त आहे. शिवाय इथले लोक शेजारील गावांमध्ये अभियान राबवण्यास मदत करायला जातात. त्यांच्या सांगण्याने या गावांमध्ये मोठा फरक पडू लागला आहे. स्वच्छ भारत अभियान जगणारे गाव, अशी या गावाची ओळख निर्माण झाली आहे.
     प्रत्येक घरात शौचालय आहे,त्याचा नियमित वापर होतोयच, शिवाय घर,अंगण आणि रस्ते अगदी चकाचक दिसतात. इथे तुम्हाला कुठे रस्त्यावर एकादे झाडाचे पानदेखील पडलेले दिसणार नाही. जनावराचा गोटादेखील लकलकीत पाहायला मिळतो. मूत्राची दुर्गंधीसुद्धा येत नाही. स्वच्छ रस्ते,गल्लीबोळ पाहिल्यावर आपल्याला विश्वासच बसणार नाही की, एकादे गावदेखील इतके स्वच्छ असू शकते. त्यासाठी आपल्याला एकदा का होईना रंगसापार्याला जाऊनच यावं लागेल.



No comments:

Post a Comment