Tuesday, March 7, 2017

पुन्हा एकदा स्त्री जन्माची नकोशी कहाणी


     सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ या गावी एका नराधम डॉक्टरने स्त्रीभ्रूण हत्येचे केंद्र चालवल्याची घटना पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी आहे. पाच-सहा वर्षांपूर्वी राज्यातल्याच बीड जिल्ह्यात असे एक मोठे रॅकेट उघडकीस आले होते, त्यानंतर आता शैक्षणिक क्षेत्रात आघाडीवर असलेल्या सांगली जिल्ह्यात असेच भयंकर प्रकरण उघडकीस आले आहे. एका महिलेच्या मृत्यू प्रकरणामुळे हा प्रकार सर्वांसमोर आला. स्वाती जमदाडे नावाच्या एका महिलेचा गर्भपात करताना तिचा मृत्यू झाला. त्याचा ब्रभा होऊ नये म्हणून तिच्यावर अंत्यसंस्कार करण्याची घाई तिचा पती करू लागला. माहेरच्या कुटुंबियांना यात संशय आल्याने त्यांनी पोलिसांत तक्रार नोंदवली आणि या नराधम डॉक्टराची कृष्णकृत्ये चव्हाट्यावर आली. संबंधित महिलेचे मृत्यू प्रकरण दडपले गेले असते तर हा नराधम डॉ़क्टर आणखी किती कळ्या जन्माआधीच खोडल्या असत्या देव जाणे!

     पोलिसांची तपासाची चक्रे फिरू लागली तशी,त्याच्या कारनाम्याने पोलिसांची डोकीदेखील गरगरू लागली. बाबासाहेब खिद्रापुरे नावाच्या या डॉक्टरकडे आवश्यक असणारे शिक्षणही नव्हते.तो होमिओपॅथीमधील पदवीधर होता. या शिक्षणात गंभीर आजाराबाबत अथवा शस्त्रक्रियेबाबत कोणतेही शिक्षण दिले जात नाही. तरीही त्याने आपल्या रुग्णालयात अनेक शस्त्रक्रिया केल्याचे उघड झाले आहे. त्याच्याकडे क्ष-किरण यंत्रासह अनेक यंत्रे आढळून आली आहेत. पोलिसांनी अधिक तपास केला तेव्हा, म्हैसाळ येथील ओढापात्राजवळ डॉ. बाबासाहेब खिद्रापुरे याने गर्भपात केलेल्या 19 भ्रुणांच्या पिशव्या आढळून आल्या आहेतम्हैसाळचे कांड हिमनगाचे टोक असून वास्तव यापेक्षाही भयानक आहे. पोलिसांच्या तपासणीमध्ये अनेक घटना उघडकीस येत असून डॉ. खिद्रापुरे यांचे कारनामे यमदुताला लाजवणारेच आहेत.याप्रकरणात त्याची डॉक्टर पत्नीही त्याच्या मदतीला होतीच शिवाय अन्य काही डॉक्टरही यात गुंतल्याचे स्पष्ट झाले आहे,त्यामुळे यात मोठे रॅकेट असल्याचे सकृतदर्शनी दिसत आहे. , महाराष्ट्र-कर्नाटक सिमेवरील महत्वाचे गाव असलेल्या म्हैसाळमध्ये डॉ. खिद्रापुरे यांचा सुरू असलेल्या बिनदिक्कत व्यवसायाबाबत ग्रामस्थ अनभिज्ञ होते. पोलिसांनी स्वाती जमदाडे हिच्या मृत्यूनंतर डॉ. खिद्रापुरे यांचे हॉस्पिटल सिल केल्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली. गावातील एका हॉस्पिटलमध्ये आंतरराज्य रॅकेट सक्रीय होते, याबाबत ग्रामस्थांमधूनच आश्चर्य व्यक्त केले जात आहे. याची जोरदार चर्चा गावात आहे.
      'भारती हॉस्पीटल' या नावाने खिद्रापुरेने म्हैसाळमध्ये आलिशान व सर्वसोयींनी सुसज्ज असे रुग्णालय थाटले होते. बीएचएमएस ही पदवी असताना त्याने गर्भपात करण्याचा उद्योग सुरु केला होता,जो अवैध होता. हा मूळचा कनवाड (ता. शिरोळ) इथला आहे. गेल्या दहा वर्षापासून तो म्हैसाळ येथे प्रॅक्टीस करीत होता. त्याच्या या राक्षसी कृत्याचा पर्दाफाश केला असला तरी हे हिमनगाचे टोकच आहे. तपासामध्ये यापेक्षाही भयानक वास्तव निश्चितच उघडकीस येणार आहे. या घटनेचे पडसाद राज्यभर उमटत असून यात महाराष्ट्राची नाचक्की होत आहेत्याच्या रुग्णालयात सापडलेल्या एका रजिस्टरमध्ये शस्त्रक्रियांच्या नोंदीही आढळून आल्या आहेत. त्यात भूलतज्ज्ञाला दिलेल्या रकमांचे तपशील आढळले आहेत. या सार्या घटना या प्रकरणाचे गांभिर्य वाढवणार्या आहेत. एखादा डॉक्टर ग्रामीण भागात कसा धुमाकूळ घालू शकतो आणि त्याचा सरकारी यंत्रणेला मागमूस लागत नाही,याचे हे ढळढळीत उदाहरण आहे.
     एका बाजूला महिला अंतराळात जात असताना दुसर्या बाजूला मुलगी झाली हो म्हणत टाहो फोडणारा एक समाज आहे. मुलगी नको,मुलगाच हवा हा अनाठाई अट्टाहास वेदनादायी आहे. सामाजिक मागासलेपणाचे ते लक्षण आहे. मुलगी नको म्हणून पत्नीच्या जीवाशी खेळणे हे नुसते अक्षेपार्ह नसून गुन्हेगारी स्वरुपाचे आहे. समाजामध्ये वेदनामुक्त करणार्या डॉक्टरला देवदूत समजले जाते. परंतु डॉ. खिद्रापुरे यांचे प्रताप यमदुतालाही लाजवणारा असाच आहे. आजही मुलगी नको, यासाठी गर्भपात केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शासकीय यंत्रणेचे यावर कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नसल्याचे या हत्याकांडाने सिद्ध झाले आहे. शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी प्रसुतीची रुग्णालये आहेत. या रुग्णालयात दर्शनी बाजूलाचयेथे गर्भलिंग तपासणी केली जात नाही; तसे करणे कायद्याने गुन्हा आहेअसे फलक झळकतात. मात्र, या फलकामागे काय चाललेले असते हे आता उघडपणे बोलले जात आहे. देवाची उपमा असलेले डॉक्टर पैशाच्या हव्यासापोटी कसायासारखे कळयांचे जीव घेत आहेत. समाजामध्ये उजळ माथ्याने फिरणारे हे डॉक्टर केवळ पैसे मिळतात म्हणूनच हा उद्योग बिनदिक्तपणे करीत आहेत. अशा डॉक्टरांना वेळीच कायद्याने कठोर शिक्षा देणे अत्यावश्यक आहे
 हक्क नाकारला जातो
गर्भपात करण्याच्या प्रकरणाला काही कायदे आहेत. अपत्याला जन्माला घालण्याचा आणि तो वाढविण्याचा अधिकार हा दांम्पत्यांचा असला आणि  गर्भ वाढवण्याची जबाबदारी ही मातेची असली तरीही  काही गुंतागुंती अथवा व्यंगामुळे गर्भ सांभाळणे मातेला शक्य नसेल तर त्याचे पतन करण्याचा अधिकार दांपत्याला आहे. त्यातही कायद्याची बंधने आहेत. गर्भ आठ आठवड्यापासून 20 आठवड्याचा होईपर्यंत तो अधिकार माता पित्याला आहे. असे असले तरी सर्वस्वी अधिकार हा मातेलाच दिला जातो. मात्र, गर्भाला 20 आठवडे झाल्यानंतर एक दिवस जरी उलटून गेला असेल तर तो अधिकार मातेला दिला जात नाही. तिचा तो हक्क नाकारला जातो. कायद्याने तिला बंधन आहे.
 मुलींचे प्रमाण वाढत असूनही...
बेटी बचाओ, बेटी पढाओहा शासनाचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम आहे.राज्यासह सांगली जिल्ह्यातही त्याला प्रतिसाद मिळत आहे. जनजागृती होत आहे. मुलींचे प्रमाण वाढू लागले आहे. सहा वर्षात मुलींचे प्रमाण दर हजारी मुलांमागे 837 वरून 905 पर्यंत पोहोचले आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागाचे हे प्रमाण 925 पर्यंत गेले आहे. मात्र तरीही अजून चोरी-छुपे गर्भलिंगनिदान होत आहे. यापूर्वी जिल्ह्यातल्या 4 डॉक्टरांना शिक्षा झालेली आहे. 10 डॉक्टरांवर कारवाई झाली आहे. तरिही बेकायदा गर्भलिंगनिदान आणि गर्भपाताचे प्रकार चव्हाट्यावर येत आहेत
 10 जिल्ह्यात सांगलीचा समावेश
मुलींची घटती संख्या चिंताजनक बनल्याने केंद्र शासनाने सन 2014 मध्ये लिंग गुणोत्तराबाबत सर्वेक्षण केले होते. महाराष्ट्रात मुलींचे प्रमाण कमी असलेल्या 10 जिल्ह्यात सांगलीचा समावेश होता. राज्य शासनाने या 10 जिल्ह्यांवर विशेष फोकस करण्याचा निर्धार केला. जिल्हा प्रशासनही हलले. बेकायदा गर्भलिंगनिदान आणि बेकायदा गर्भपात याविरोधात पावले टाकली जाऊ लागली. लोकजागृती, शासन, प्रशासनाच्या प्रयत्नांमुळे जिल्ह्यात मुलींचे प्रमाण वाढू लागले. सांगली जिल्ह्यात सन 2010 मध्ये जन्मावेळचे लिंग गुणोत्तर 837 होते. म्हणजे एक हजार मुलांच्या जन्मामागे मुलींचे जन्म 837  होते. सन 2011 मध्ये ते 852, सन 2012 मध्ये 873, सन 2013 मध्ये 900 झाले. सन 2014 मध्ये जन्मावेळच्या लिंगगुणोत्तराचा आलेख किंचितसा खाली आला. लिंगगुणोत्तर 899 झाले. सन 2015 मध्ये ते 905 झाले.
ऑक्टोबर 2016 च्या माहितीनुसार जिल्ह्याच्या ग्रामीण भागात (महापालिका, नगरपालिका क्षेत्र सोडून) शून्य ते पाच वर्षे वयोगटात दर हजारी मुलांमागे मुलींचे प्रमाण 925 आहे. नागरिकरण जास्त असलेल्या भागात बेकायदा गर्भलिंगनिदान व बेकायदा गर्भपाताचे प्रमाण अधिक असल्याचे दिसते. ग्रामीण भागातही हे प्रमाण दिसून येते. ‘म्हैसाळप्रकरणाने ते उघड केले आहे.
गर्भाचे वर्गीकरण
वैद्यकीय पद्धतीने गर्भाच्या वयाच्या आधारे वर्गीकरण करण्यात आले आहे. गर्भ 1 ते 3 महिन्याचा असेल तर त्याला गर्भपात म्हणतात. जर गर्भ 4 ते 7 महिन्यांचा असेल तर त्याला मिसकॅरेज म्हणतात. आणि 7 ते 9 महिन्यात गर्भपात झाला तर त्याला प्रीमॅच्युअर लेबर म्हणजे अपूर्ण दिवसांचे बाळ असे समजले जाते. गर्भवती महिलेची मानसिकता अथवा शारीरिक स्वास्थास धोका निर्माण झाल्यामुळे जर गर्भपात करावयाचा असल्यास एक किंवा दोघा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार 12 ते 20 आठवड्यांचा गर्भ काढता येऊ शकतो
बॉम्बे नर्सिंगहोम अॅक्ट धाब्यावर
बॉम्बे नर्सिंगहोम अॅक्ट 1949 मधील कलम 3 नुसार नोंदणीशिवाय नर्सिंगहोम चालवता येत नाही. तरिही खिद्रापुरेंच्या दवाखान्यात आयपीडी सुरू होती. ‘आयपीडीस मान्यतेसाठी प्रस्ताव सादर केल्याचे अहवालात म्हटलेले आहे. मात्र मान्यता नसतानाआयपीडीसुरू कशी ठेवली, याचा त्याला जाब विचारणे आवश्यक होते. जाब विचारूनहीआयपीडीसुरूच ठेवली तर कारवाई होणे आवश्यक होते. मात्र जिल्हा आरोग्य यंत्रणेने तेवढी तसदी घेतली नसल्याची चर्चा आहे.
महापालिका क्षेत्रातआयपीडीसुरू करण्यासाठी वैद्यकीय आरोग्य अधिकारी, नगरपालिका क्षेत्रांमध्ये जिल्हा शल्यचिकित्सक आणि ग्रामीण भागात जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे परवानगी घ्यावी लागते. शैक्षणिक पात्रता आणि दवाखान्यातील सुविधा यानुसार मान्यता दिली जाते. गर्भपातसंदर्भातीलएमटीपीकेंद्र, ‘एमटीपीकरणारे डॉक्टर यांना मान्यता देण्याचे अधिकार जिल्हा शल्यचिकित्सकांचे आहेत. मात्र या मान्यता नसताना बेकायदेशीरपणे गर्भपात होत होतेमिरज तालुक्यातील म्हैसाळमध्ये गर्भपात केंद्र सुरू आहे हे  अन्य तालुक्यात कळते, पण जिल्हा यंत्रणांना ते का कळू नये, असा प्रश्न उपस्थित होतो. ग्रामस्थांनी, गावच्या कारभार्यांनीही अशा बाबतींमध्ये सजग असणे आवश्यक आहे. पण त्यांचेही दुर्लक्ष झाले. मात्र या सर्व दुर्लक्षपणात स्त्री भू्रण हत्या होत राहिल्या. हा प्रकार समोर येण्यासाठी एका मातेचा बळी जावा लागला. त्यानंतर आता शासकीय यंत्रणा, आरोग्य यंत्रणांना जाग आली आहे. मात्र आता या शासकीय यंत्रणेने आणि पोलिसांनी या नराधमाला आणि त्यात सहभागी असलेल्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करायला हवेत. त्याचबरोबर स्त्री सन्मानासाठी पुन्हा एकदा जोरदार प्रयत्न करण्याची गरज या म्हैसाळच्या घटनेतून अधोरेखित झाली आहे आणि ते करायलाच हवे.

No comments:

Post a Comment