Monday, March 6, 2017

शेट्टी-खोत यांचा जाहीर विसंवाद संघटनेला धोकादायक

     शेतकर्यांची संघटना विशेषत: ऊस उत्पादक शेतकर्यांची आक्रमक संघटना म्हणून अलिकडच्या काळात स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ओळख आहे. संस्थापक खासदार राजू शेट्टी यांनी ती आपल्या स्वत:च्या हिकमतीवर मोठी केली. ऊस उत्पादक शेतकर्यांना या माध्यमातून ऊसाला चांगला दर मिळवून दिला. हे करत असताना त्यांनी साखर कारखानदार आणि राज्य सरकारशी मोठा संघर्ष केला आहे. या चळवळीला शेतकर्यांचेही बळ मिळत गेले आहे. अलिकडच्या दोन वर्षात संघटनेचे कार्य काही प्रमाणात धिम्या गतीने सुरू असले तरी या संघटनेचा शेतकर्यांना चांगला आधार आहे. मात्र अलिकडच्या काही दिवसांत खास.राजू शेट्टी आणि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यात काही तरी बिनसले असल्याचे प्रसारमाध्यमाद्वारा लोकांपर्यंत पोहचले आहे. खोत यांच्याविषयी राजू शेट्टी यांचा काहीसा नाराजीचा सूर याच माध्यमांद्वारा ऐकायला मिळत आहे. त्यामुळे शेतकर्यांमध्ये आणि लोकांमध्ये याची मोठी चर्चा दिसून येत आहे.

     स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खा. राजू शेट्टी आणि राज्यमंत्री सदाभाऊ खोत या दोन महत्वाच्या नेत्यांमध्ये दरी निर्माण झाल्याची चर्चा लक्ष वेधून घेत आहे. सदाभाऊ खोत यांच्या भाजप प्रवेशाचीही चर्चा सुरू आहे.त्यामुळे स्वाभिमानी संघटनेत नेमके काय चालले आहे अथवा संघटनेचे काय होणार, अशी चिंतादेखील काही लोकांमधून व्यक्त होताना दिसत आहे. काही लोकांच्या मते  संघटनेत फूट पडेल, असे वातावरण सत्ताधारी मंडळींकडून तयार केले जात असल्याचा आरोपही केला जात आहे. सध्या संघटनेची चळवळ थंडावली आहे,ही वस्तुस्थिती असली तरी या संघटनेत नेमके काय चालले आहे, हे जाणून घेण्याचा अधिकार ज्यांच्या जीवावर ही संघटना मोठी झाली, त्या शेतकर्यांना आहे. मात्र इथे त्यांची कुठेच भूमिका दिसत नाही. त्यामुळे  प्रश्न असा आहे की, ज्यांच्यासाठी संघटना, चळवळ उभी करण्यात आली ते शेतकरी आणि ज्यांना संघटनेमुळे राजकीय प्रतिष्ठा प्राप्त झाली. त्या नेत्यांना तरी शेतकरी संघटना वाढविण्यात रस राहिला आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे.
     सध्या जे काही संघटनेत चालले आहे,ते शेतकरी चळवळीला मारक आहे. पुण्यात शेतकरी संघटनेचे हे दोन्ही नेते एकत्र असताना त्यांनी एकमेकांची भेट घेतली नाही, ही गोष्ट बरेच काही सांगून जाते. स्थानिक स्वराज्य संस्थेतील सदाभाऊ खोत यांच्या चिरंजिवांची-सागर यांची उमेदवारी याबाबतही काही उलट-सुलट चर्चा प्रसारमाध्यमातून बाहेर आली आहे. वास्तविक अशा गोष्टी संघटना पातळीवर घडत असतात. मात्र त्याला फारसे महत्त्व न देता या दोन्ही नेत्यांनी एकत्र येऊन चळवळीचा विचार करून काही तरी तोडगा काढण्याची आवश्यकता आहे. सदाभाऊंना संघटनेत रस नसेल तर शेट्टी यांनी एकला चलो रे चा नारा देत अगोदरच्या प्रमाणे चळवळ पुढे नेण्याचे काम करायला हवे. सदाभाऊ यांनीही आपली नेमकी भूमिका स्पष्ट करावी अन्यथा त्यांनी राजू शेट्टींसोबत एका व्यासपीठावर येऊन आपल्या दोघांत काही नाही, हे जाहीर करायला हवे. प्रत्येकाने सोयीची भूमिका घेतल्याने शेतकरी चळवळीचेच नुकसान होणार आहे.आणि तसे होता कामा नये.
   
 फार मोठ्या संघर्षातून ही चळवळ उभी राहिली आहे. राज्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना वाढविणो, रूजविण्यासाठी खा. राजू शेट्टी यांनी गेल्या आठ- दहा वर्षात अपार कष्ट उपसले आहेत. ऊस पट्ट्यात आंदोलने करून ऊस उत्पादन शेतकर्यांना अधिकचा दर मिळवून देण्यात त्यांना  यश आले. राजकीय पातळीवर काम करीत असताना खा. राजू शेट्टी यांनी महायुतीच्या माध्यमातून पुढे जाण्याची भूमिका घेतली. सत्तेत सहभागी झाल्यानंतर ज्याप्रमाणे खा. राजू शेट्टी यांनी शेतकरी प्रश्न शासन दरबारी मांडत संघटनेची ओळख कायम ठेवण्याचा प्रयत्न केला. तसे काम सदाभाऊ खोत यांना राज्यमंत्री झाल्यापासून जमलेले नाही, असे शेतकर्यांच्या ओठांमध्ये आहे. भाजपतील नेत्यांशी सलगी ठेवत असताना स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना बळ देण्यात खोत कुठेतरी कमी पडत आहेत, अशी भावना सामान्य कार्यकर्त्यांमध्ये निर्माण होत आहे. खा. राजू शेट्टी यांनाही त्याची जाणीव आहे
     महायुतीचा घटकपक्ष म्हणून शासनाच्या ध्येय धोरणाविरोधात भूमिका घेता येत नसली तरी, खोत यांना संघटनात्मक कार्यकर्त्यांना बळ देता येऊ शकते. शेट्टी आणि खोत यांच्यातला संवाद संपला असल्याने संघटनेची सध्या ही अवस्था दिसत आहे. प्रत्येकाला आपापली राजकीय महत्त्वांकाक्षा असते. त्यातूनच हा संवाद संपला असावा, असे सध्या तरी दिसत आहे. सदाभाऊ खोत यांनीही आपली नेमकी भूमिका स्पष्ट न केल्याने त्यांच्याकडे चुकांचे अंगुलीनिर्देश जात आहे. शासनात काम करत असताना ज्यांच्यामुळे आपण राज्यमंत्री झालो, लाल दिव्याच्या गाडीत फिरत आहोत, त्या शेतकरी संघटनेला बळकटी देण्याची जबाबदारी एकट्या खा. राजू शेट्टी यांनी पेलायची आणि आपण शासकीय दौरे आणि कार्यक्रम करीत फिरायचे, असे प्रकार वाढल्याने दोन्ही नेत्यांमध्ये विसंवाद निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.प्रसारमाध्यमांना दिल्या जाणार्या एकमेकांविषयीच्या प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मारक ठरत आहेत.ती तशी ठरू नये यासाठी यापैकी कोणीतरी एकाने माघार घ्यायला हवी आहे,हा जाहीर विसंवाद त्यांनी थांबवायला हवा.

No comments:

Post a Comment