Monday, March 27, 2017

चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा

हिंदुंच्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेली चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा. संपूर्ण देशभर हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. हिंदू संस्कृती नुसार नवीन वर्षाचा प्रारंभही याच दिवशी होत असल्याचे मानले जाते. नवीन संवत्सराचा व वसंत ऋतुचा आरंभ याच दिवशी होत असल्याने कुठल्याही नवीन शुभकार्यासाठी गुढीपाडव्याचा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. आपण आपल्या दारात उभारलेली गुढी आपल्यात असलेली महत्त्वाकांक्षा ही गगना एवढी विशाल व मोठी असावी असा जणू संदेशच आपल्याला देत असते. चैत्र पाडव्याच्या दिनी उभारलेली गुढी ही आपण मिळविलेल्या विजयाचे, अपार कष्ट, मेहनत घेत केलेल्या श्रम साफल्याचे जणू प्रतीकच आहे. कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात याच शुभदिनी करण्याची प्रथा आपल्याकडे प्रचलित आहे.
      प्रभू श्री रामचंद्राने 14 वर्षांच्या वनवासानंतर व रावणावर विजय मिळविला व याच शुभदिनी त्यांचे अयोध्येत आगमन झाल्याची ऐतिहासिक कथा रूढ आहे. प्रभु श्री राम चंद्रांनी अयोध्येत प्रवेश केल्यानंतर अयोध्यावासियांनी त्यांचे गुढी उभारून व मंगल तोरणे बांधून भव्य स्वागत केल्याचे इतिहास सांगतो. देशभरातील हिंदुंचा हा सण अतिशय शुभदायक असल्याने सकाळी मंगलस्नान करून घराघरातून गुढ्या व तोरणे उभारली जातात. उभारलेल्या गुढीची पूजा करुन कडूनिंबाची पाने, मिरी, हिंग, ओवा, जिरे, लवण एकत्र करून खाल्ली जातात. त्यामुळे आरोग्य, तेजस्विता, बुद्धी व बल प्राप्त होत असल्याची समजूत प्रचलित आहे. याच शुभ दिनी ब्रम्हदेवाने हे विश्‍व निर्माण केले म्हणून ब्रम्हपूजा करणे हा विधी गुढी पाडव्याच्या दिवशी करणे महत्त्वाचे मानले जाते. पाण्याने स्वच्छ केलेल्या एका बांबुस रेशमी वस्र गुंडाळून तांब्याचे, पितळेचे अथवा चांदीचे भांडे पालथे घालून त्याला कडू निंबाचे डहाळे, साखरेपासुन तयार केलेली गाठीमाळ व रंगीबेरंगी फुलांची माळ बांधली जाते. घरातील सर्व सदस्यांच्या उपस्थितीत या गुढीची विधीवत पूजा करुन सजवलेली गुढी दारात उभारली जाते. गुढी उभारताना वापरलेले कडूनिंबाचे डहाळे, साखरेच्या गाठीची माळ, विविध रंगछटा असलेली रेशीम वस्त्रे ही मानवाच्या गरजांची प्रतीके आहेत. चैत्र महिन्याच्या पहिल्याच दिवशी प्रसन्न वातावरणात उगवत्या सूर्याच्या साक्षीने दारासमोर गुढी उभारण्याची हिंदूंची ही प्राचीन काळापासून चालत आलेली परंपरा निश्‍चितच अभिमानास्पद आहे.  दारासमोर विविध रंगछटांयुक्त रांगोळ्या घातल्या जातात. घरोघरी गुढी उभारण्याच्या परंपरेमुळे या सणास गुढी पाडवा संबोधले जाते. साडे तीन मुहूर्तांपैकी एक असल्याने नवनवीन व्यवसाय व नवीन कार्यांची सुरुवातही अनेकजण याच दिवशी करतात. ग्रामीण भागातील गावोगावी पुढील काळात होणार्‍या यात्रा व विविध विषयांनुरूप ग्रामस्थांच्या बैठकीचे आयोजन गुढी पाडव्याच्या दिवशी केले जाते. 
     सध्याच्या यांत्रिक व धावत्या जीवनात आपले आचार, विचार व आचरण कसे असावे याबाबत अनेकांना प्रश्‍न निर्माण होत आहेत. नेमक्या अशाच वेळी गुढीपाडव्या सारखे इतरही महत्त्वाचे सण आपली संस़्कृती व धर्माचा अर्थ आपल्यापर्यंत पोहचविण्याचे काम करताना दिसून येतात. हिंदु संस्कृतीचा इतिहास व परंपरा यांची जपणूक करीत त्यांचे आचरण करणे आजच्या धावत्या जीवनातही तितकेच महत्वाचे आहे. आजच्या काळाचा विचार केला तर सर्वसामान्यांत मोठ्या प्रमाणावर वैचारिक मतभेद वाढले असल्याचे निदर्शनास येते. आपापसातील मतभेद व वाईट विचार यांना दूर करून सर्वांगीण प्रगतीसाठी सर्वांनी एकत्रित येण्याची गरज आहे. गुढीपाडवा हा सण एकात्मता व आपापसात स्नेह, प्रेम, जिव्हाळा व जवळीक वाढविण्याला उत्तेजन देणारा सण आहे. याच गुढीपाडवा सणाच्या निमित्ताने आपण सर्वांनी एकत्र येत सर्व प्रकारचे मतभेद व भेदभाव विसरत सर्वांगाने सामाजिक विकास साधण्याचा संकल्प करण्याची गरज आहे.

No comments:

Post a Comment