Tuesday, March 14, 2017

आजाबाईंची शाळा

     आपण म्हातारे झाले आहोत, आता आपल्याला काम होत नाही. काही करायचं होत नाही. मला ते करून काय करायचं आहे? आता म्हातारपणी शिकून काय करू? असा सवाल म्हातारी माणसं करताना दिसतात. मरण येऊसपर्यंत आरामात जीवन व्यतीत करायचं, असंच काहीतरी त्यांनी मनात योजलेलं असतं. देवाचं नामस्मरण करायचं किंवा सत्संगला जायचं, लय झालं तर या गोष्टी करायच्या. या वयात नवीन काही शिकण्याची त्यांच्या मेलेली असते. कारण आता या वयात शिकून काय करायचं, असाच त्यांचा सवाल असतो. मात्र आपल्या महाराष्ट्रातल्या ठाणे जिल्ह्यातल्या अशा बर्याच आजीबाई असा विचार न करता नित्यनेमाने रोज शाळेला जातात. त्यांना फक्त साक्षर व्हायचं आहे.   आणि विशेष म्हणजे समवयस्क मैत्रिणीही रोज गुलाबी रंगाची नऊवारी नेसून शाळेत जातात. विश्वास बसत नाहीये ना? पण हे खरंय. महाराष्ट्रातील ठाण्यापासून 90 किलोमीटर अंतरावर फनगाणे येथील एका शाळेची सध्या  सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे.

       या शाळेचे वैशिष्ट्य म्हणजे याठिकाणी फक्त आजीबाई शिकायला येतात. गेल्या वर्षभरापासून साधारण 60 ते 90 वयोगटातील 28 महिला या शाळेत न चुकता येतात. गुलाबी नऊवारी हा त्यांचा गणवेश आहे. एवढेच नाही तर सगळ्यांच्या पाठीवर स्कूल बॅग देखील असते. संपूर्ण गावाला साक्षर बनवण्याच्या उद्देशाने वर्षभरापूर्वी आंतरराष्ट्रीय महिला दिनी शिक्षक योगेन्द्र बांगर यांनी ही शाळा सुरू केली होती. या शाळेत साठ वर्षीय कांताबाई मोरेदेखील शिकतात. आणि त्यांना शिकवणारी शिक्षिका ही त्यांची सून आहे. घरात त्या सुनेला कामे सांगत असल्या तरी शाळेत मात्र सुनेचं त्या मुकाट्याने ऐकतात. एक 87 वर्षीय आजीबाई ज्यांना व्यवस्थित ऐकू देखील येत नाही त्या साक्षर व्हायची आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी रोज वेळेवर शाळेत उपस्थित असतात. भविष्यात हे शिक्षण आपल्याला कुठे, किती, कसं कामात येणार आहे...? याचा थोडासाही विचार न करता फक्त साक्षर होण्याची जिद्द घेऊन रोज शाळेत येणार्या या आजींचं कौतुक करावं तितकं थोडच आहे. नाही का? म्हणूनच या सर्वच आजी-बाईंच्या शिकण्याच्या जिद्दीला सलाम करायला हवा.

No comments:

Post a Comment