Friday, April 14, 2017

प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून...

     मी ज्या गावात राहतो,ते तालुक्याचे ठिकाण आहे. चौदा-पंधरा वर्षांपूर्वी या गावात इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू झाली. गावातल्या प्रतिष्ठित लोकांनी आपल्या मुलांना आता इंग्रजी शिक्षण मिळणार म्हणून भराभर आपल्या पाल्यांना त्यांनी त्या शाळेत दाखल केलं. प्रवेश एलकेजीपासून. फीदेखील अव्वाच्या सव्वा होती,पण पालकांनी त्याच्याबद्दल काहीच तक्रार न करता, शाळा मागतेय तेवढी फी देऊ केली. अक्षरश: त्या शाळेला त्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त मुले मिळाली. साहजिकच गावातल्या इतर शाळांवर त्याचा परिणाम झाला. त्यानंतरच्या प्रत्येक वर्षांत त्या शाळेला मुलांचा भरगच्च भरणा मिळत गेला. आणि त्यांना त्यांच्या मर्जीनुसार मन मानेल तशी फीही मिळत गेली. दहावीपर्यंत त्यांच्या फीचा आकडा तब्बल चाळीस हजारावर गेला,तरीही पालक आपल्या मुलांना तिकडेच पाठवू लागले.    इंग्रजीची भूरळ पालकांवर किती पडली आहेयाचा यावरून अंदाज  यायला हरकत नाही. डॉक्टर,इंजिनिअर,शिक्षक,व्यापारी,व्यावसायिक या सार्यांना आपल्या पाल्यासाठी ही इंग्रजी शाळा म्हणजे जणू    स्वर्गच वाटला.

     एकिकडे या शाळेची भरभराट होत होती,तर दुसरीकडे दुसर्या शाळांवर त्यांचा परिणाम होत होता. मात्र या शाळेचे आऊटपूट निघत नव्हते. पण पहिलीला दाखल झालेल्या मुले दहावीला आली आणि त्यांचा पहिला दहावीचा रिझल्ट लागला,तेव्हा मात्र पालक हादरून गेली. मुले साठ-सत्तरच्या येंजवरच थबकली होती. काही बोटावर मोजण्याइतक्या पोरांनी ऐंशी गुणांची टक्केवारी पार केली होती. नंतर बारावीला हीच मुले आणखी गळपाटली.तेव्हा मात्र या शाळेची हवा गेली. आता या शाळेला मुले गोळा करावी लागत आहेत. फीदेखील त्यांना कमी करावी लागली आहे. या शाळेला आता उतरती कळा लागू लागली आहे, असे का झाले?
     घर ही मुलांची पहिली शाळा असते आणि पहिली गुरू त्याची आई असते.मूल घर,परिसर यातून अनौपचारिक शिक्षण घेते. आणि हे शिक्षण तणावमुक्त वातावरणात असते. ओळखीच्या वस्तू,नातेवाईक, आजूबाजूला चाललेली कामे हे सगळे त्याच्या ओळखीच्या भाषेतून होत असते. कशाला,कोणाला काय म्हणायचे हे आपल्या परिचित लोकांकडून त्याला ज्ञान येत जाते. त्यामुळे त्याला त्याची संकल्पना पटकन होते. याचाच अर्थ मुलाला त्याच्या मातृभाषेतून म्हणजे त्याच्या घरच्या भाषेतून बाहेर शिक्षण मिळत गेले तर ओळखीच्या भाषा,शब्दांमुळे त्याला खूपशा संकल्पना पटकन आणि सोप्या पद्धतीने शिकता येतात. आणि जर घरची आणि बाहेरची भाषा वेगवेगळी असल्यास मूल गडबडून जाते,गोंधळून जाते. त्याला खूपशा संकल्पना समजून घ्यायला वेळ लागतो.बर्याच गोष्टी तर व्यक्त न करताच सोडून दिल्या जातात. काही राहूनच जातात.
     या इंग्रजी माध्यमात एलकेजीला दाखल झालेल्या मुलांचे असेच झाले. त्यांना दहावीपर्यंत बर्याच गोष्टींची संकल्पनाच स्पष्ट झाली नाही. त्यांचे धड मराठी राहिले नाही,तर धड इंग्रजी. ज्यांच्या घरातले वातावरण मुद्दामहून इंग्रजी केले तरी त्याचा फटका त्यांना बसलाच. कारण आई-वडील कौतुकाने त्याच्याशी इंग्रजीशी संवाद साधत राहिले तरी आजूबाजूचा परिसर,मुले,नातेवाईक,शेजारी-पाजारी यांच्यातला संवाद मातृभाषेतलाच होता. आता या पोरांची दहावी,बारावीनंतरची परिस्थिती अशी झाली की,त्यांना किंवा त्यांच्या पालकांच्या इच्छेनुसार पाहिजे त्या ठिकाणी प्रवेश घेताना  मोठी समस्या निर्माण झाली. मग एवढे इंग्रजी माध्यमातून शिक्षण देऊन किंवा घेऊन काय फायदा झाला?
मातृभाषा ती मातृभाषा आहे. या भाषेतून घेतलेल्या शिक्षणामुळे मुलांचा शब्दभांडार म्हणजेच शब्दसंपत्ती वाढत जाते.विस्तृत होत जाते. कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देताना आधीच माहित असलेले शब्द त्याच्या मदतीला येतात. आपल्याला आपले मत मांडता आले,याचा आनंददेखील त्याला येतो.तेच जर दुसर्या भाषेतून मांडायचे असेल तर अडचणी निर्माण होतात. शब्द सापडत नाहीत. ओठांतून गेले तरी ते दगा देतात. त्यामुळे साहजिकच त्याच्या स्वत:च्या मत मांडण्यावर मर्यादा येतात.बोलण्यावर येतात. पुढे त्याला सातत्याने अडचणी येत राहतात. कारण लहानपणीचा पाया एकदा पक्का झाला की, तो कधीच कुठे कमी पडत नाही.
     मात्र ज्या वयात शिक्षण प्रक्रिया सहज,सोपी वाटायला हवी,त्या वयात दुसर्या भाषेमुळे फारच किचकट प्रक्रिया होऊन जाते. एकाच वस्तूला घरात एक आणि बाहेर एक असे नाव झाले तर ते मूल गोंधळून जाते. काहींना ही शिक्षण प्रक्रिया फारच मानसिक धक्का देऊन जाते. काही मूलं या गोष्टीबाबत अढी ठेवून राहतात. आधीच मातृभाषेत एका शब्दाला अनेक पर्यायी शब्द आहेत. हेच शिकता शिकता मूलाला नाकीनऊ होऊन जाते. त्यात परकी भाषा,ज्याचा घराशी,परिसराशी संबंधच नाही, अशी भाषा कशी अवगत होणार? मुलगा चार शब्द,चार पढवून घेतलेली वाक्यं इंग्रजीत बोलायला लागला म्हणजे,त्याला इंग्रजी यायला लागले असे होत नाही. ते करत असताना मुलाच्या मनात काय चालले आहे, याचा थांगपत्ताच आई-वडिलांना नसतो. फुकटची फुशारकी पुढे आपोआप फुटून जाते.
     आजच्या घडीला दहावी,बारावी किंवा पदवी मिळवलेल्या मुलांना धड मातृभाषा बोलता येत नाही, लिहिता येत नाही आणि आपले म्हणणे मांडता येत नाही, अशी परिस्थिती असताना इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतलेल्या मुलांची काय अवस्था झालेली असेल, सांगता येणे अवघड आहे. ही मुलं पुढे स्पर्धेत टिकतील का? आपण शिक्षण म्हणजे सर्वांगिण विकास म्हणतो. हा विकास मातृभाषेतूनच साध्य होतो.त्यामुळे किमान प्राथमिक शिक्षण तरी मातृभाषेत्तून व्हायला हरकत नाही.

No comments:

Post a Comment