Friday, April 28, 2017

महात्मा बसवेश्‍वर (भाग चौथा)

वचनांमधून समाजप्रबोधन
महात्मा बसवेश्वरांची वीरशैव धर्मशिकवण आणि शिकवण्याची पद्धत अत्यंत सोपी, साधी आणि आकर्षक होती. ते नेहमी सांगत की, कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता आपल्या धर्माचा स्वीकार कोणालाही करता येईल. आपल्या अनेक वचनांमधून त्यांनी समाजप्रबोधनाचे कार्य केले. एका वचनात ते परमेश्वर प्राप्तीबद्दल म्हणतात, तू चोरी करू नकोस, हत्याही करू नकोस आणि खोटेही बोलू नकोस. कोणावरही रागावू नकोस.कोणाचा तिरस्कार करू नको. स्वत: विषयी अभिमानही बाळगू नको. कोणालाही दूषणे देऊ नकोस. हेच तुझे आंतरिक आणि बाह्यशुचित्व होय, याच मार्गाने आपला कुडल संगमेश्वर प्राप्त होईल.
त्याचप्रमाणे धर्माबद्दल सांगतात की, प्रेम आणि करुणेविनाधर्म तो कसला,सगळ्या जीवांविषयी करुणा हवी. सगळ्या धार्मिक श्रद्धेचे मूळ करुणा होय. या गुणांच्या अभावाषियी कुडल संगमेश्वराला आस्था नाही. तुम्ही जीवन म्हणता तो वार्याने विझणारा दिवा होय. ज्याला तुम्ही संपत्ती म्हणता ती तर बाजार गर्दी. अशा क्षणभंगुर गोष्टीवर विसंबून आपल्या आयुष्याचा नाश करून घेऊ नका. स्वत; जवळ्चे सर्व काही बसव यांनी उदारपणे धर्मकार्यासाठी देऊन टाकले होते. ते ईश्वराला प्रार्थना करीत की, माझ्या घरी नको ठेऊ फुटके भांडेसुद्धा, ईश्वरा माझ्या घरी राहू दे गवताची काडी, मी जर मागेन भिक्षा देवाच्या नावाने तर लोकांनी देवाच्याच नावाने मला हाकलून द्यावे- हे कुडल संगमेश्वरा! आपल्या शिष्यांना वचनातून बसव शिकवण देतात की,यावे यावे ठिक आहात ना? असे म्हटल्याने तुम्ही कुरुप होत नाही. कृपया बसा, असे म्हटल्याने तुमच्या घरात खड्डे पडत नाहीत. चांगले बोलल्यामुळे तुमचे डोके किंवा पोट फुटत नाही. तुम्ही काही देऊ शकत नसाल तर एखादा गोडशब्दही तुमचे आणि अतिथींचे कल्याण करतो. त्यामुळे म्हणा ईश्वर, म्हणा संत, म्हणा तुमचे भले होवो,यातच कैलास प्राप्ती असते. बसवांचे समकालिन मारुल शंकर म्हणतात, बसवांचे विचार म्हणजे स्वर्गाप्रत पोहोचण्याची शिडी आहे. महात्मा बसवचे सहकारी त्यांना आपला गुरु व तत्त्वज्ञानी म्हणून आदर करीत.

बसवेश्वरांनंतर पंथाची स्थिती
महात्मा बसवेश्वर यांच्या काळात वीरशैव पंथाचा मोठ्या प्रमाणात प्रचार आणि प्रसार झाला. कालौघात सामाजिका आणि धार्मिक चळवळ ही एका संघटित धर्म-पंथामध्ये रुपांतरित झाली. संत,मुत्सद्दी,तत्त्वज्ञ,कवी आणि विद्वान यांनी या पंथाला लोकप्रियता मिळावी म्हणून खूप प्रयत्न केले. कर्नाटक राज्यात सुमारे 25 टक्के लोक वीरशैव पंथाचे म्हणजे लिंगायत समाजाचे आहेत. तसेच महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या राज्यांतही या पंथाचे मोठ्या प्रमाणावर अनुयायी आहेत. कन्नड साहित्यावर बसवेश्वरांच्या चळवलीचा मोठा प्रभाव जाणवतो. सोळाव्या शतकातील सर्वज्ञ नावाचा कवी हा बसवांच्या सामाजिक आणि धार्मिक क्रांतीचा पुरस्कर्ता होता. विजयनगर साम्राज्याच्या राजाश्रयामुले धर्मसुधारक , अभ्यासक आणि साहित्यिकांनी बसवेश्वर आणि त्यांच्या अनुयायांनी रचलेली वचने जमा करण्यासाठी प्रयत्न केले. वचनांची जमवाजमव करून टीकाटिपणी तयार केली. आधुनिक कवी- लेखकदेखील बसववचनांचा अभ्यास करताना दिसतात.
स्त्री स्वातंत्र्याचा पुरस्कर्ता
अकराव्या आणि बाराव्या शतकात पारंपारिक विचारसरणीनुसार स्त्री ही पापाचे मूळ समजले जाई. शिक्षण, मतस्वातंत्र्य, सभा-संमेलन सहभाग आदी गोष्टींची स्त्रियांना बंदी होती. इतकेच नव्हे तर धार्मिक आणि आध्यात्मिक उपासनेत सहभागालाही स्त्रियांना परवानगी नव्हती. या सर्व अनिष्ट रुढीला महात्मा बसव यांनी कडाडून विरोध केला. अकराव्या शतकात देवर दासीमय्या या शैवसंताने स्त्रियांविषयी आदरभाव राखला पाहिजे. या मताचा हिरीरीने पुरस्कार केला. दासीमय्यांकडून स्त्रीमुक्तीचा विचार घेऊन बसव आणि त्यांचे सहकारी स्त्रीमुक्तीच्या कार्यात मग्न झाले. सिद्धरामय्या हा बसवचा सहकारी म्हणतो की, स्त्री ही माया नसून प्रत्यक्ष ईश्वर आहे. अल्लम याने स्त्री-पुरुष यांना दोन डोळ्यांची उपमा दिली आहे. स्त्रियांना विविध व्यवसाय करण्यास आणि कुटुंबासाठी कमाई करण्यास बसव यांनी प्रोत्साहन दिले. तसेच गीत आणि काव्य रचनेलाही मुभा दिली. बसव यांच्या दोन्ही पत्नी गंगादेवी आणि निलोचना यांनी धर्मवचने लिहिली आहेत. बसव यांची थोरली बहीण अक्कनगम्मा यांनीही वचनांची रचना केली आहे. त्याचप्रमाणे कापड विणणारी अम्मावेना ,वडे विकणारी पित्ताय्वेना,दळणकांडण करणारी सोम्माव्वेना यांनी उत्तम कवने रचली आहेत.त्याचप्रमाणे अक्कमहादेवी,राणीमहादेवी,मुक्तायाक्का आणि लख्खम्मा या वीरशैव योगिनींनी अनेक दर्जेदार कवने रचली आहेत. त्यांनी आपल्या उपासनेतून अध्यात्मिक उन्नती साधलेली दिसते. बसवाच्या अनुयायांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य होते. सर्वजण भजन, शिवस्तुती आणि धार्मिक चर्चेत सहभागी होत. महिला शिष्य आनि साधक भल्या पहाटे घरोघरी जाऊन लोकांना ध्यानासाठी गोळा करीत. तसेच सभा आणि भजनांमधून वचनांचे गायन करीत असत. स्त्री स्वातंत्र्याचा पुरस्कर्ता असलेल्या महात्मा बसवेश्वरांचा आजच्या काळातील अभ्यासकही आदराने उल्लेख करतात. केवळ कर्नाटकच्या इतिहासात नव्हे,तर भारताच्या इतिहासात धार्मिक आणि सामाजिक चळवळीत महात्मा बसवेश्वर आणि वीरशैव पंथाचे योगदान मोलाचे मानले जाते.

No comments:

Post a Comment