Wednesday, April 5, 2017

क्षमाशीलता आपले वेगळेपण सिद्ध करते

     आजकाल माणसांनी आपली जीभ सैल सोडली असल्याचेच दिसते. मागचा पुढचा काहीही विचार न करता शाब्दिक बाण सोडले जातात. या शब्दास्त्रांचा पुढच्यावर काय परिणाम होतो,याचा अजिबात विचार केला जात नाही. त्यामुळे आपल्या मनाला दुखापत तर होतेच पण त्याचा आपल्याला भयंकर संताप येतो. आपल्याही याच संतापात काही ना काही अद्वातद्वा बोलावसं वाटतं. काही माणसं सतत दुसर्यावर अन्याय करीत असतात. काही माणसं हा अन्याय सहन करतात. काही माणसं अन्यायाचा प्रतिकार करतात. त्याचा सूड उगवतात. काही माणसे अन्याय झाल्याने काही करता येत नाही, म्हणून चडपडत असतात. स्वत:चा राग राग करतात.दुसर्याविषयी मनात अढी ठेवून एक प्रकारचे प्रचंड ओझे माणसे आपल्या डोक्यावर घेऊन वावरत असतात. या सगळ्याला एक पर्याय आहे. क्षमा करणे. साधुसंतांनी आपल्याला क्षमाशील होण्याचा सल्ला दिला आहे. क्षमाशील असल्याने माणूस सुखी आणि आनंदी राहतो. आणि ते खरे आहे. आपल्यावर अन्याय केला किंवा आपला अपमान केला अथवा आपली काही चुकी नसताना कोणी बोलला म्हणून त्याचा राग मनात धरणे,उचित नव्हे. किंवा त्याचा बदला घेणे,हेही बरोबर नाही. दुसरा तसा वागला म्हणून आपणही तसेच वागावे का? अशा वागण्यानेच सध्याचे वातावरण कलुषित झाले आहे. आधीच माणसाची सहनशीलता कमी होत चालली आहे. त्याच्याने समाजात प्रचंड उल्कापात होत आहे. मनात दुसर्याविषयीची पेटती आग ठेऊन जगणं फार कठीण आहे. याच्याने आपल्यालाच त्याचा त्रास होतो.
     असे प्रसंग माझ्यावरही अनेकदा आले. माझाच एक  सहकारी माझ्याविषयी वरिष्ठांचे मन कलुषित करण्यात यशस्वी झाला.याला कारण म्हणजे ते अधिकारी हलक्या कानाचे होते. आपण किती कामसू आहोत,हे सांगण्याच्या प्रयत्नात माणसे दुसर्याला बदनाम करतात. तसे त्याने सांगितल्यानुसार वरिष्ठांनी माझ्याविषयी आपल्या मनात वेगळाच ग्रह करून घेतला. त्याचा त्रास मला झाला. मात्र मी हे प्रकरण संयमाने हाताळले. अशी प्रकरणे मी अशीच हाताळली. दुसरे सहकारी म्हणू लागले. तुम्ही तर पत्रकार! तुम्ही कसे काय गप्प बसलात? मी म्हणालो, तीच तर एक गंमत आहे. त्याच्यात आणि माझ्यात हाच तर फरक आहे. मीही त्याच्यासारखाच वागलो तर मग त्याच्यात आणि माझ्यात काय फरक राहिला. त्याला माफ केलं म्हणून तर मी आनंदी आणि सुखी आहे.
     आंतरराष्ट्रीय कीर्तीचे लेखक रॉबीन शर्मा यांचे हू वुईल क्राय व्हेन यू डाय? अर्थात तुमच्या मृत्यूनंतर कोण रडणार आहे? हे पुस्तक अलिकडेच वाचनात आले. त्यांनी क्षमाशील होण्याचे फायदे सांगितले आहेत. एखाद्याने तुमच्यावर अन्याय केला असेल तर त्याला क्षमा करण्याची कृती त्यागाची नसून स्वार्थाची आहे. द्वेष आणि शत्रुत्व तुमच्यात ठासून भरण्यापेक्षा ते जाऊ देणे हे खरेतर दुसर्या माणसाच्या फायद्याचे असण्यापेक्षा ते तुमच्या फायद्यासाठीच आहे. एखाद्याविषयी असूया किंवा आकस तुमच्या मनात धरता म्हणजे त्या माणसाला तुम्ही अगदी तुमच्या पाठीवर घेऊन फिरण्यासारखे आहे. तो माणूस तुमची ऊर्जा,उत्साह,मनाची शांतता सर्व काही हिरावून घेतो. पण ज्याक्षणी तुम्ही त्याला क्षमा करता त्या क्षणी तुमच्या पाठीवरून त्याला उतरवता आणि तेव्हाच तुम्ही तुमच्या जीवनात पुढे सरकता. यासाठी रॉबीन शर्मा यांनी क्षमाशील होण्याचा सल्ला दिला आहे.
     मार्क ट्वेन यांनी लिहिले आहे की, रान वाटेतून चालताना एखादे रानफूल आपण पायदळी तुडवून पुढे जातो, मात्र ते रानफूल तुम्हाला क्षमा करून सुगंधच देते. क्षमा करण्याची कृती ही वैयक्तिक धाडस आणि चैतन्याची कृती आहे. ती तुमच्या जीवनाचा दर्जा सुधारण्यासाठीचा उत्तम मार्गदेखील आहे. एखाद्याने तुमच्यावर अन्याय केला,त्याबद्दल विचार करण्यात तुम्ही घालवलेले प्रत्येक मिनिट,तुमच्यासाठी त्रासदायक ठरतात. मन उदात्त ठेवा. त्यात तुमचा फायदाच आहे. उगाचच साधू-संतांनी सांगितलेले नाही.दया,क्षमा,शांती-तेथे देवाची वस्ती. इथे देवाची वस्ती याचा अर्थ सुखा-समाधानाची, आनंदाची वस्ती. जो सुखी, समाधानी असतो, त्याचासारखा दुसरा कोणी नसतो. इथे मला हेच सांगायचेम्हणायचे आहे, या क्षमाशील वृत्तीने आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत, हेदेखील आपोआप सिद्ध होते. अन्याय करण्यार्यात आणि आपल्यात हाच तर तो फरक आहे.

No comments:

Post a Comment