Monday, April 24, 2017

(बालकथा) ससुल्या ससा आणि जादुगार

     एके दिवशी सकाळी ससुल्या ससा आपल्या लाडक्या फुलांना पाणी घालत होता. पण आज वातावरण फार वेगळेच होते. सगळी फुलं गपगप होती. त्यांच्या डोळ्यांत भिती होती. त्याने मोठ्याने जाईला विचारलं, ‘काय झालं गं? रागावलीस का?’ 
जाई आणखी घाबरली. पण ती गप राहिली. ससुल्याला याचं कारणच कळेना. तो काही बोलणार, तोच त्याची दृष्टी एका झाडामागे लपलेल्या म्हातार्यावर पडली. तो झाडामागून ससुल्याकडे एकटक पाहात उभा होता.त्याचे डोळे मोठ्ठेलाल होते.दाढीचा रंग पिवळा होता.त्याला पाहून ससुल्याच्या नाजूक शरीरात भितीची लहर उठली. ससुल्याला घराकडे धुम ठोकायची होती,पण पाय जागचे हलता हलेनात.
हा...हा...हा...! तू पळूच शकणार नाहीस,’ म्हातारा मोठ्याने हसत म्हणाला.
पुढे येऊन त्याने ससुल्याची मान पकडली.बघितलंस, ‘माझ्या जादूची कमाल!कुणी माझ्या आदेशाशिवाय जागचं हलूसुद्धा शकत नाही.’ त्याला तसेच पकडून म्हातारा चालायला लागला.
ससुल्याने घाबरत घाबरत विचारलं,’मला कुठे घेऊन चालला आहेस?’
जादूनगरीला! तिथे तुझ्यावर प्रयोग करणार. हा...हा...हा...! आता,गप राहा.नाही तर तुझी आणि तुझ्या मित्रांची काही खैर नाही.’ असे म्हणून तो झपाट्याने चालू लागला.
ससुल्याला मागे फिरून आपलं घर आणि आपल्या लाडक्या फुलांना पाहायचं होतं,पण त्याला हालतादेखील आलं नाही.
रात्री जादुगार ससुल्याला घेऊन एका उंच डोंगरावर पोहोचला. त्याला आपल्या अंधार्या कोठडीत नेले. तिथे गेल्यावर त्याने एक छोटासा पिंजरा उघडला. त्याने ससुल्याला काहीही खायला-प्यायला न देता त्यात बंद करून टाकलं.ससुल्याला रात्रभर झोप आली नाही. जादुगार मात्र डाराडूर झोपी गेला.
जादूगार सकाळी उठून कुठे तरी निघून गेला.ससुल्या पिंजर्यात कैदच होता. भुकेने व्याकूळ ससुल्याची अवस्था फारच वाईट झाली होती. अंधारात त्याला ना नीटसं दिसत होतं, ना नीट्स श्वास घेता येत होतं.इतक्यात कुणी तरी हळूच दरवाजा उघडला आणि आत आला.पहिल्यांदा तर ससुल्या काही पाहूच शकला नाही,पण नंतर त्याला कुणीतरी स्त्री असल्याचं जाणवलं. ती काही तरी शोधत होती.ससुल्या बेचैन झाला. त्याला राहावलं नाही. तो म्हणाला, ‘अहो, आपण कोण आहात? आणि मला मदत करता का?’
ती चकित होऊन इकडे-तिकडे पाहू लागली.तिने विचारले, ‘कोण आहेस तू?’
ससुल्या ससा.’
ससा, आणि इथे रे कसा आलास?’
जादुगारानं काल पकडून आणलं. मला मदत करा. इकडे... इकडे... ! हां, आता वर बघा! मेहबानी करून मला बाहेर काढा.मी अकडून गेलोय.’
ती अगदी पिंजर्याजवळ आली. त्याने तिला पहिल्यांदाच पाहिले.ती म्हातारी होती. दिसायला दयाळू होती. तिने पिंजर्याला हात लावला.पण,झटकन हात मागे घेतला. ती म्हणाली,’मला नाही उघडता येणार. जादूनं बंद केलं आहे.’
ससुल्या रडायला लागला. ‘आता... मी इथे असाच मरून जाणार?’
म्हातारी म्हणाली, ‘रडू नकोस. मी आताच आमच्या राणी परीला सांगते. ती तुला बाहेर काढेल.पण, मला पहिल्यांदा माझं काम करू दे!’
कसलं काम?’
जादुगाराच्या भाकर्या हव्यात. राणी परीने मागितल्यात. त्यांमध्ये जादुगाराची शक्ती आहे.’
ससुल्या डोळे फुसू लागला. मग म्हणाला,’भाकर्या? त्या तर त्या कपाटात आहेत.’
म्हातारीने लगेच कपाट उघडले.तिथे भाकर्या पडल्या होत्या. म्हातारीने त्या एका कापडात गोळा केल्या.ससुल्याचे आभार मानले आणि जाता जाता म्हणाली,मी परत येईन. माझी राणी परी तुला नक्की मदत करेल.ती निघून गेली.
ससुल्या दरवाज्याकडे पाहात राहिला.त्याला भिती वाटू लागली. जादूगार येईल आणि आल्या आल्या आपला जीव घेईल. इतक्यात जादूगार आलाच. त्याने दिवा लावला.त्याचा चेहरा ससुल्याने पाहिला,तो फारच रागात होता.जादुगाराचे लक्ष उघड्या कपाटाकडे गेलं.तो किंचाळला,’कोण आलं होतं, कोण आलं होतं?’

तो पटकन ससुल्याजवळ आला. ओरडला,’कोण आलं होतं.तुला माहिताय सांग!’
ससुल्या गप्प राहिला.तो काहीच बोलला नाही.जादुगार पिंजरा गदगदा हलवत म्हणाला, ‘आता बोल!’
ससुल्या रडत म्हणाला, ‘मला माहित नाही.खरंच, मला काही माहिती नाही.’
जादूगार पुन्हा मोठ्याने ओरडला,’खोटं खोटं! कुणी तरी इथं आलं होतं. तुचं सांगितलं असशील, भाकर्या कुठे ठेवल्या होत्या ते!थांब! तू असा सांगणार नाहीस. मी तीनपर्यंत मोजेन. जर तुझ्या नरड्यातून आवाज आला नाही,तर पुन्हा कधीच यातून आवाज निघणार नाही.लक्षात ठेव.’
जादुगाराने गिणती सुरू केली.’एक... दोन...’
ससुल्या जाम घाबरला. तेवढ्यात कुणी तरी हळूच दरवाजा उघडला.’तीन! ... ... आई  ई ई गं!’
जादूगार खाली कोसळला.ससुल्याला कुणी तरी उठवलं.त्याने गोड आवाज ऐकला. ‘तू मोठा बहादूर आहेस. बरं केलंस, तू माझं नाव सांगितलं नाहीस.’
ससुल्याने विचारलं,’तुम्ही! तुम्ही कोण आहात?’
मी राणी परी. खरं तर हा जादुगार मला फारचं त्रास देत होता. मी कित्येक दिवसांपासून याच्या पाळतीवर होते. याच्या भाकर्या शोधत होते. आता आम्ही मजेत राहू शकू.’
आता कुठे ससुल्याच्या जीवात जीव आला.तो म्हणाला, ‘म्हणजे आता जादुगार उठणार नाही?’
तिने पालथा पडलेल्या जादुगाराला पायाने ढकलून सरळ केले. आणि म्हणाली, ‘बघ,तो मेलाय. आता कधीच उठणार नाही. आता तू आरामात तुझ्या घरी जाऊ शकतोस.’
ससुल्या हळूच म्हणाला,’पण माझं घर कोठे आहे? किती लांबाय? आणि मी घरी कसं जाणार?’
राणी परी म्हणाली, ‘काही काळजी करू नकोस. मी सोडीन तुला. अगोदर काही तरी खाऊन घे.’
राणी परीने टाळी वाजवली. तसा एकदम कोठडीत प्रकाश उजळला. ससुल्यासमोर तर्हेतर्हेचे गवत आणि फळं आली. ती ससुल्यानं अगदी मिटक्या मारत खाल्ली.
मग राणी परी म्हणाली, ‘आता डोळे मिट. मी तुला घरी पोहचवते.’
मी तुझा फार फार आभारी आहे, राणी परी.’ असे म्हणून त्याने आपले डोले बंद केले. डोळे उघड्ताच तो जिथून गेला होता, तिथे पोहचला.सगळी फुलं आनंदानं डोलू लागली. ओरडू लागली. ‘ससुल्या ससुल्या!कुठे होतास तू? आणि आता कसा आलास?’
ससुल्या म्हणाला, ‘अरे, थोडे थांबा! मी जरा आराम करतो, मग तुम्हाला सगळी गोष्ट सांगतो.’ आणि तो नेहमीसारखा टुण टुण उड्या मारत घरात पोहचला आणि अंथरुणात जाऊन आडवा झाला.

No comments:

Post a Comment