Monday, June 12, 2017

काँग्रेस फिनिक्स भरारी कधी घेणार?

     लोकसभा निवडणूक दोन वर्षांवर येऊन टेपली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपण आणखी एक संधी घेणार, असे अगोदरच सांगितले आहे. तशी त्यांची वाटचालच सुरू आहे. सध्याचे वातावरण पाहता आणि देशात विविध राज्यात आणि स्थानिक पातळीवर भाजपला मिळत असलेले यश पाहता मोदींचे स्वप्न काही लांब नाही, अशीच चिन्हे सध्यातरी दिसत आहेत. अन्य पक्षातील पुढार्यांना भाजप आपल्या पक्षात घेऊन पावन करीत आहे आणि आपला खुट्टा मजबूत करत आहे. हे सगळे होत असताना दीडशे वर्षांचा काँगेस मात्र आगामी निवडणुकीच्यादृष्टीने काहीच करायला तयार नाही. अगदी वरपासून खालपर्यंत काँगेस पार सुस्तावून गेली आहे. लोकसभेत काँग्रेसची झालेली वाताहत पाहता खरे तर काँग्रेस पेटून उठायला हवी होती, मात्र तशी अजिबात उठलेली नाही. उलट नरेंद्र मोदी यांचा काँग्रेसमुक्त भारत अभियानाला खतपाणी घालण्याचे काम करतेय की काय, असे वाटण्यासारखी परिस्थिती जाणवत आहे. त्यामुळे या पक्षाचे काय होणार, अशी सामान्य कार्यकर्त्याला चिंता लागून राहिली आहे.
     इकडे 2014 मधील लोकसभेपासून दिल्ली आणि बिहारची निवडणूक सोडली तर भाजपच्या पदरात घवघवीत यश पडलं आहे. यूपीसह पाच राज्ये आणि मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक निकालाने भाजपच्या लोकप्रियतेवर शिक्का मारला. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या डोक्यात हवा गेली नाही. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या कार्यशैलीविषयी लोकांची वेगवेगळी मते असू शकतात. परंतु नरेंद्र मोदी देशासाठी आणि अमित शहा पक्षासाठी या यशानंतरही जेवढे श्रम घेत आहेत ते कौतुकास्पद आहे. यशाची मालिका अखंडित सुरू असूनही नरेंद्र मोदी कार्यालयात शांत बसल्याचे दिसून येत नाही. सतत दौर्यावर असतात. दौर्याबाबत आक्षेप असू शकतो. परंतु ते टाईमपास करायला जात नाहीत हे मान्य करायला पाहिजे. अमित शहा सध्या 90 दिवसांच्या दौर्यावर आहेत. या 90 दिवसांत संपूर्ण देश पिंजून काढणार आहेत. असे मतदारसंघ जेथे भाजपचे उमेदवार पराभूत झालेले आहेत, ज्या ठिकाणी भाजप किंवा रालोआ सोडून अन्य पक्षाचे लोकप्रतिनिधी आहेत अशा मतदारसंघात शहा दौरा करीत आहेत. म्हणजे अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांनी जे मनात ठाणले आहे,ते करून दाखवण्यासाठी धडपड चालू आहे. मात्र हे सगळे ज्या पक्षाला करण्याची आवश्यकता होती,तो काँग्रेस पक्ष शांत आहे. खरे तर काँग्रेस पक्षात मोठे फेरबदल आवश्यक आहेत
     काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य आणण्याचे काम आता पर्यंत आणण्याची आवश्यकता आहे. खालून ते वरपर्यंत काँग्रेसची पूनर्रचना करण्याची गरज आहे. राहूल गांधी यांना काँग्रेस अध्यक्ष करण्याच्या हालचाली वारंवार लांबणीवर पडत आहेत. एकदाचा निर्णय व्हायला हवा आहे. प्रियंका गांधी यांनाही पक्षात घेऊन त्यांना मोठी जबाबदारी देण्यात यावी, अशी कधीपासूनची कार्यकर्त्यांची मागणी आहे. राजकीय तज्ञांदेखील प्रियांका गांधी पक्षात सक्रिय झाल्यास पक्षात जाण येईल, असे वाटते. त्यामुळे हा निर्णयही लवकरात लवकर व्हायला हवा आहे. काँग्रेसची सध्या जी वाईट आवस्था झाली आहे,तेवढी कधीच नव्हती. 2014 नंतर पंजाबखेरीज एकाही राज्यातून काँग्रेससाठी चांगली बातमी आली नाही. गोवा आणि मणिपूरमध्ये सर्वांत मोठा पक्ष असूनही सरकार बनविता आले नाही. काँग्रेस पक्ष एवढा लाचार झाला आहे. दिवसेंदिवस वाईट परिस्थिती होत असतानाही काँग्रेस पक्ष असा हातावर हात ठेवून गप्प बसला आहे, याचे सगळ्यानाच आश्चर्य वाटत आहे. आता काँग्रेसने जागण्याची आवश्यकता आहे.
     काँग्रेसकडे अनुभव आहे. मोठी फळी आहे. भल्याभल्यांना दिवसा तारे दाखविण्याची क्षमता असलेली नेतेमंडळी काँग्रेसजवळ आहेत. मात्र या लोकांचं गणितच सापडत नाही आहे. कारण ही मंडळी स्वत:चा स्वार्थ प्रथम पाहतात,मग पक्षाचे हित पाहतात. सध्या काँग्रेस सत्तेवर नसला तरी त्यांचे काही अडलेले नाही. त्यांची कामे विरोधात असूनही होताहेत. त्यामुळेच पक्ष पार रसातळाला चालला आहे. काँग्रेसने अशा मंडळींना जागे करायला हवे नाही तर त्यांना त्यांची जागा दाखवून द्यायला पाहिजे. त्यामुळे काँग्रेस पक्षात मोठे फेरबदल करण्याची आवश्यकता आहे. इतकेच नव्हे तर पक्षात मोठ्या प्रमाणात तरुणांना संधी दिली गेली पाहिजे. तरच काँग्रेसमध्ये जान येणार आहे.
      ऑक्टोबरपर्यंत काँग्रेस अध्यक्षाची निवड करायची आहे. राहूल गांधी यांची निवड होण्याची शक्यता पुन्हा एकदा व्यक्त केली जात आहे.ती यंदा तरी साकार होण्याची गरज आहे. काँग्रेसने राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांना महासचिव बनवून गुजरातचे प्रभारी बनविले आणि राजस्थानची धुरा सचिन पायलट यांच्यासारख्या तरुणाच्या हाती दिली. आता मध्य प्रदेशात दिग्विजय सिंग यांच्याऐवजी ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या हाती राज्याची धुरा सोपविली जाणार असल्याची चर्चा आहे. गोव्यात सर्वांत मोठा पक्ष असूनही काँग्रेसला सरकार का बनविता आले नाही. याचा शोध घेऊन पुन्हा असे घडणार नाही, अशा पद्धतीचे प्रयत्न झाले पाहिजेत. राज्यसभा निवडणुकीच्यावेळी हरयाणा काँग्रेसमध्ये फूट पडली असताना प्रभारी शकील अहमद कॅनडाला रवाना कसे काय झाले होते? यासारखे अनेक प्रश्न आहेत. ते शोधण्यासाठी आणि संघटना मजबुतीसाठी काँग्रेसने जिव तोडून कामाला लागण्याची गरज आहे. नाही तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा काँग्रेसमुक्त भारतच्या अभियानाला लागलेच आहेत. त्यांचे अभियान सक्सेस व्हायला वेळ लागणार नाही. काँग्रेसने फिनिक्स भरारी घेतली पाहिजे.

No comments:

Post a Comment