Sunday, June 18, 2017

जंगलमाफियांना सळो की पळो करून सोडणार्‍या 'लेडी टारझन'

     जमुना टुडू यांना लेडी टारझन म्हणून झारखंडमध्ये ओळखले जाते. झाडांची कत्तल करून त्यांची विक्री करणार्या माफियांना त्यांनी वठणीवर आणले आहे. जंगल माफियांविरोधात आवाज उठवणार्या या लेडी टारझन जमुना यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. मात्र इथंपर्यंतचा त्यांचा प्रवास मोठा खडतर आहे. त्यांच्यावर अनेकदा जीवघेणे हल्ले  झाले. तरीही त्यांनी न डगमगता आपले कार्य सुरूच ठेवले आहे. झाडांविषयींचे त्यांचे प्रेम वादातीत आहे.

     अगदी सामान्य कुटुंबात त्यांचा जन्म झाला. आणि लग्नही अवघ्या बाराव्या वर्षी झाले. जमशेदपूरच्या मुटुरखम या छोट्याशा खेड्यात त्यांचा नवा संसार सुरू झाला. सासरच्या त्यांच्या घरापासून काही अंतरावर पहाडी इलाका आहे.या ठिकाणी फारच थोडी सागाची झाडे उरली होती. माफिया लोक ही उरली-सुरली झाडेदेखील तोडून नेत असल्याचे त्या पाहात होत्या. हे पाहून वडिलांमुळे निसर्गावर प्रेम करायला शिकलेल्या जमुनांना फारच दु:ख झाले. अत्यंत दुर्लभ आणि किंमती सागाची झाडे अशी अवैधरित्या तोडताना पाहून त्यांनी निश्चय केला की, ही झाडे वाचवायची. माफियांच्या तावडीतून त्यांची सुटका करायची. महत्त्वाचे म्हणजे वनविभाग या प्रकारणापासून दूर होता. किंवा त्यांनी मुद्दामहूनच दुर्लक्ष केले असावे. त्यामुळे जे काही करायचे,ते त्यांना एकटीलाच करावे लागणार होते. त्या ज्या गावात राहत होत्या,तिथली लोकसंख्या फारच कमी होती. शिवाय ते फारच गरीब होते. बुजल्या बुजल्यासारखे त्यांचे वागणे होते. जमुना यांना पहिल्यांदा या माफियांविषयी जी भीती त्यांच्या मनात बसली होती,ती दूर करणं भाग होतं. आणि ते मोठं आव्हानात्मक होतं. जमुना यांनी सातत्याने गावातल्या लोकांच्या बैठका घेतल्या, माफियांना विरोध करण्याविषयी आवाहन केले,मात्र गावातला एकही पुरुष त्यांच्या सोबतीला आला नाही. मात्र काही महिला त्यांच्या बाजूने झाल्या. आपली वनसंपदा वाचवण्यासाठी अवघ्या चार महिलांची टीम तयार करून त्यांनी जंगलात पेट्रोलिंग (गस्त)करायला सुरुवात केली. कधी कधी वनामाफियांचा आणि त्यांचा आमना-सामना व्हायचा. त्यांच्याशी दोन हात करण्यापेक्षा जमुना या त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करायच्या. पण तरीही ते मानायचे नाहीत. उलट त्यांना शिवीगाळ केली जायची. हल्ले केले जायचे. त्यांच्यापासून स्वत:ला वाचवण्यासाठी महिलादेखील शस्त्रे घेऊन जायच्या. कधी कधी त्यांच्याशी सामना व्हायचा.यात बर्याचदा जमुनासह महिला जखमी व्हायच्या,पण त्या मागे हटल्या नाहीत. उलट त्या माफियांना सळो की पळो करून सोडायच्या.
     हळूहळू मग त्यांच्या टीममधील महिलांची संख्या वाढत गेली. ही संख्या साठपर्यंत पोहचलीमहिलांची संख्या वाढल्याने जमुना यांनी मग महिला वन संरक्षक दलाची स्थापना केलीजंगल वाचवणे एवढेच उदिष्ट राहिले नाही तर वनाचा विकास करण्याचाही त्यांनी निर्णय घेतला. नवीन रोपे लावण्याचे व त्यांचे संवर्धन करण्याचे काम हाती घेण्यात आले. पुढे महिलांच्या या कामावर प्रभावित होऊन पुरुषदेखील या अभियानात सामिल झाले. आता तर संपूर्ण गाव रोज जंगलात गस्तीचे काम करते. पेट्रोलिंगसाठी तीन टीम तयार करण्यात आल्या आहेत. सकाळ,दुपार आणि रात्री ही गस्त घातली जाते. त्यामुळे वनमाफियांना वृक्षतोडीचा कुठला चान्सच मिळत नाही.
     जमुना यांचे अभियान थांबवण्यासाठी तस्करांनी त्यांच्यावर अनेकदा जीवघेणा हल्ला केला. त्यांच्या घरावर दरोडा घालण्याचा,चोरी करण्याचा प्रयत्न झाला. मात्र यामुळे त्या मागे हटल्या नाहीत, उलट त्या नेटाने पुढे जात राहिल्या. नंतर उशिराने का होईना त्यांच्या या अभियानाला सरकारी वन विभागाची साथ मिळाली. जमुना यांच्यामुळे गावापर्यंत डांबरी रस्ता झाला. त्यांच्या जमिनीवर शाळा बांधली गेली. मुलांच्या शिक्षणाची सोय गावात झाली. आता या गावात आणखीही काही उपक्रम राबवले जातात. गावात मुलगी जन्माला आली तर  तिच्या नावाने गावात 18 झाडांचे रोपण केले जाते,तसेच मुलीच्या लग्नात सागाची दहा रोपे कुटुंबाला भेट दिली जातात.
रक्षाबंधनादिवशी गावात मोठा उत्सव साजरा केला जातो. यादिवशी गावातील लोक झाडांना राखी बांधतात आणि त्यांचे संरक्षण आणि संवर्धन करण्याची प्रतिज्ञा करतात. जमुनाबाई रोज भल्या पहाटे आपल्या टीमसोबत हाती शस्त्रे घेऊन जंगलात पेट्रोलिंगसाठी जातात. आज तेच जंगल हिरवेगार बनले आहे. ते पाहिल्यावर सगळ्या महिलांचा ऊर आनंदाने फुलून येतो. आता जमुनाबाईंनी वनरक्षण हेच आपले कर्तव्य मानले आहे. यामुळेच त्यांना मानाचा राष्ट्रपती पुरस्कार मिळाला आहे. या सन्मानामुळेच त्यांचे मनोधैर्य दुणावले आहे. आज त्या प्रदेशात लेडी टारझन म्हणूनच ओळखल्या जातात.

No comments:

Post a Comment