Wednesday, June 21, 2017

मुलींवरील अत्याचाराच्या घटना कशा थांबणार?

     न्यायलयाने मुलीला रंग आणि कागद दिले. काळ्या आणि उदास रंगांनी काढलेल्या तिच्या चित्रात झाड होते,डोंगर होता आणि सूर्य होता. मुलीच्या हातात फुग्याची दोरी होती.आकाशात उडणारे फुगेदेखील होते. पण मुलीचा फ्रॉक खाली जमिनीवर पडला होता. आठ वर्षाच्या मुलीने आपल्या आयुष्यात घडलेली भयंकर अशी अत्याचाराची घटना अशाप्रकारे चित्राच्या माध्यमातून व्यक्त केले. आईच्या मृत्यूनंतर वडिलाने तिला वार्यावर सोडले.ती कोलकात्यातून दिल्लीला आली.इथे ती आपल्या नातेवाईंकाकडे राहू लागली. अंकलने तिच्या अनाथ होण्याचा फायदा उठवला.वारंवार तिच्यावर अत्याचार केले. न्यायालयाने मुलीच्या चित्राला तिच्याशी घडलेल्या घटनेचा पुरावा मानून दोषी नातेवाईकाला पाच वर्षाची शिक्षा ठोठावली. तो नातेवाईक वारंवार सांगत राहिला की मी काहीही केलं नाही. मला फसवलं जात आहे,पण न्यायालयाने त्याचे काहीही ऐकले नाही.

     दुसर्या एका घटनेतली मुलगी फक्त पाच वर्षांची होती. ही मुलगी तिच्या भावासोबत शाळेला निघाली होती. तेवढ्यात तिथे मुलगा आला आणि त्याने दहा रुपये देऊन तिच्या भावाला काही तरी आणायला सांगितले. त्या मुलाने तिच्या बहिणीला एकांतात घेऊन गेला. नंतर ती मुलगी रडत बसलेली एका महिलेला आढळून आली. तिच्या अंगावर स्कर्ट नव्हता. त्या महिलेने तिच्या घरचा पत्ता विचारत विचारत तिला तिच्या घरी घेऊन गेली. घरचेदेखील ती अचानक गायब झाल्याने मोठ्या काळजीत होते. मुलीसोबत घडलेल्या भयंकर घटनेची न्यायालयात चर्चा चालू होती. मुलीला कशात तरी गुंतवायचे म्हणून न्यायालयात तिला खेळायला एक बार्बी बाहुली दिली गेली. मुलगी त्या बाहुलीशी खेळू लागली. नंतर तिने बाहुलीच्या काही खासगी अंगांना ज्या प्रकारे स्पर्श केला,त्यामुळे न्यायालयातले लोक चकित झाले. मुलीने बाहुलीच्या अंगाना ज्याप्रकारे स्पर्श केला,ते पाहून न्यायालयाने तिला विचारले,तुझ्याबाबतीतही असेच घटले का? तर ती हो म्हणाली. दिल्ली न्यायालयाने मुलीच्या होकारावर पूर्णपणे विश्वास ठेवला. या अगोदर या लहान मुलीला बचाव पक्षाच्या वकिलाने काही असे प्रश्न विचारले की, त्यांचा तिला अर्थदेखील माहित नव्हता. कमीत कमी वकिलांनी तरी मुलींसोबत अशा प्रकारचा अमानवीय व्यवहार करण्यापासून दूर राहायला हवं.
     चांगली गोष्ट अशी की, न्यायालयाने या मुलींनी आपल्यासोबत घडलेल्या घटना,ज्या प्रकारे व्यक्त केल्या त्या मान्य केल्या.आणि दोषींना शिक्षा सुनावली. दुसर्या घटनेतील मुलगी आज आपल्या वडिलांसोबत एकटी राहायला तयार नाही.इतका मोठा मानसिक आघात तिच्यावर झाला आहे.सगळे पुरुष तिला गुन्हेगार वाटत असावेत.
     या दोन्ही मुलींची अवस्था पाहिल्यावर दुर्दैव वाटतं ते आपल्या संस्कृतीचं. ज्या संस्कृतीचे आपण गुणगाण गातो,त्या संस्कृतीत लहान मुली सहज अत्याचाराच्या बळी ठरत आहेत. दया,माया आणि करुणा या भावना लोप पावल्या आहेत, असं म्हाणायचं का? निर्भयाकांडच्यावेळेला वारंवार कठोर कायदा करण्याची भाषा केली जात होती. पण ज्याप्रकारे मुलींवरील अत्याचाराच्या घटना घडत आहेत, त्यावरून असले कायदे करून काहीही फरक पडत नाही, असे दिसते. अशा प्रकारच्या घटना मोठ्या प्रमाणात घडताना दिसत आहेत, ही बाब मोठी चिंताजनक आहे. मुली  कधी घरात, कधी शाळेत,कधी बागेत,कधी स्कूल बसमध्ये तर  कधी कुठल्या कार्यक्रमांमध्ये अशा अत्याचाराच्या घटनांच्या बळी ठरत आहेत. एका बाजूला बेटी पढाओ,बेटी बचाओ सारखे अभियान चालवले जात आहेत. मुलींना देवी मानण्याची परंपरा पुढे रेटली जात आहे आणि दुसरीकडे त्यांच्यावर भयंकर असे अत्याचार केले जात आहेत. अशा घटनांपासून मुलींची सुटका कधी होणार, हाच मोठा प्रश्न आहे. या देशातल्या दोषींना कोणतं जालीम औषध द्यावं, म्हणजे अशा घटना थांबतील.

No comments:

Post a Comment