Tuesday, June 13, 2017

रक्तदान चळवळ वाढावी

     अलिकडच्या काळात रक्तदात्यांची संख्या वाढत आहे,ही बाब उल्लेखनिय असली तरी रक्ताची गरजही दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. त्यामुळे मागणी तसा रक्ताचा पुरवठा होताना दिसत नाही. वाढती लोकसंख्या, आजारांचा प्रसार व अपघातांचे वाढते प्रमाण यामुळे रक्ताची मागणी वाढू लागली आहे. रक्ताची गरज वाढत असतानाच रक्तदानाबाबत असलेली अपुरी माहिती व गैरसमजुतीमुळे रक्तदान करण्यासाठी लोकांचा प्रतिसाद म्हणावा होताना दिसत नाही. त्यामुळे मागणीच्या तुलनेत रक्त संक्रमण कमी होत असल्याने रक्ताची टंचाई निर्माण झाली आहे. महाराष्ट्रात दरवर्षी 24 लाख रक्त पिशव्यांची गरज असताना रक्ताच्या 17 ते 18 लाख पिशव्या जमा होतात. वेळेवर रक्त न मिळाल्याने अनेक रुग्णांना जीव गमवावा लागतो. महाराष्ट्राची लोकसंख्या 12 कोटी 13 लाख आहे,यातल्या  अर्ध्या लोकांनी तरी रक्तदान केले तरी रक्ताची गरज भागून अनेक जीव वाचण्यास मदत होणार आहे. यासाठी रक्तदान चळवळ सर्वदूर वाढण्याची गरज आहे.

     दरवर्षी प्रसिद्ध होणार्याराज्य राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषदेच्या अहवालानुसार, संपूर्ण महाराष्ट्रात 2001 मध्ये 7,395 रक्तदान शिबिरातून 7.01 युनिट रक्त संकलन करण्यात आले होते. त्यानंतर ही संख्या वाढत जाऊन 2014 मध्ये 24,647 रक्तदान शिबिरातून केवळ 15 लाख 63 हजार युनिट रक्ताची साठवण करण्यात आली होती. तर 2015 मध्ये 15 लाखांहून अधिक रक्ताच्या बाटल्या जमा केल्या होत्या. रक्तदात्यांची ही संख्या जरी वाढताना दिसत असली तरी अद्याप रक्तदानासंदर्भात लोकांमध्ये आवश्यक तेवढी जागरूकता निर्माण झालेली नाही.रक्तदान जागृती ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात होण्याची गरज असून आणि त्यांना ज्या शंका-कुशंका येतात,त्या निराकरण करण्यासाठी शासनासह समाजसेवी संस्थांनी प्रयत्न करण्याची गरज आहे.
     महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत खूपच कमी लोक रक्तदान करताना दिसतात. त्यामुळे, रक्तदानाची टक्केवारी घसरलेली दिसून येते. दरवर्षी 24 लाख रक्त पिशव्यांची गरज भासते मागील वर्षी रक्तदान शिबिरातून 17 ते 18 लाख रक्तपिशव्या संकलित करण्यात आल्या होत्या. ही संख्या खूपच कमी आहे. मध्य-महाराष्ट्रात तर रक्ताचा तुटवडा मोठया प्रमाणात जाणवत आहे. याशिवाय, शस्त्रक्रिया, बाळंतपणातील अतिरक्तस्त्राव, रक्ताचा कर्करोग व अपघातात रक्तस्त्राव झाल्यास रुग्णाला तातडीने रक्त चढवावे लागते. हिमोफिलिया व थॅलेसेमिया रुग्णांना तर वेळोवेळी रक्ताची गरज भासते. वेळेवर रक्त उपलब्ध न झाल्याने मृत्यूचा आकडाही वाढत आहे. यामुळे, नागरिकांनी स्वत: पुढाकार घेऊन रक्तदान करण्याची गरज आहे. रक्तदान करणे हे आपले कर्तव्य समजून प्रत्येकाने वर्षातून एकदा तरी रक्तदान केले, तरी महाराष्ट्रात रक्ताअभावी एकाही रुग्णाचा मृत्यू होणार नाही.
     सुशिक्षित लोकांनी तर स्वत: रक्तदानासाठी पुढे येण्याची गरज आहे. तज्ज्ञ डॉक्टरांशी सल्लामसलत करून शंकांचे निरसन करून घ्यायला हवे. वास्तविक रक्तदान 18 ते 60 वर्ष वयोगटातील लोकांना  करता येऊ शकते. यासाठी रक्तदात्याचे वजन किमान 45 किलो असणे आवश्यक आहे. निरोगी व्यक्तीच्या शरीरात 4.5 ते 5 लिटर रक्त असते. रक्तदान करताना त्यातील फक्त 350 किंवा 450 मि. ली. रक्त काढले जाते. सरकारतर्फे रक्तदानासंदर्भात विविध स्तरावर जनजागृती निर्माण करण्यात येत असूनही रक्तदान करण्यास कोणी पुढे येत नाही. रक्तदान केल्यानंतर तीच व्यक्ती तीन महिन्यांनंतर पुन्हा रक्तदान करू शकते. मधुमेह, कावीळ, एचआयव्ही असलेल्यांनी रक्तदान करणे टाळावे. रक्तदान करणा-या व्यक्तीच्या शरीरात हिमोग्लोबीनचे प्रमाण 12.5 ग्रॅमपेक्षा जास्त असावे.
     राज्यात सध्या 269 रक्तपेढया असून यातील सरकारच्या 73 रक्तपेढया आहेत. रेडक्रॉस, धर्मादाय तसेच खासगी रक्तपेढया मोठया प्रमाणात आहेत. महाराष्ट्राची गरज अंदाजित 24 लाख रक्ताच्या पिशव्यांची आहे. दरम्यान महाराष्ट्रात दरवर्षी 17-18 लाख रक्ताच्या पिशव्या जमा होतात; परंतु जे लोक रक्तदानासाठी पुढे येत नाहीत, अशा लोकांसाठी विविध स्तरावर जनजागृतीचे कार्यक्रम राबविण्यात येत आहेत, मात्र ही जागृती कमी पडत असावी. शासनाने शासकीय लोकांना रक्तदान करण्यासाठी प्रवृत्त करायला हवे, त्याने रक्त तुटवड्याचा मोठा प्रश्न मिटेल.

No comments:

Post a Comment