Friday, June 9, 2017

पोलिस खेळाडू: अनिल ऐनापुरे

     पोलिस दलात राहून खेळाकडे लक्ष देणं तसं अवघड आहे. कारण पोलिसांचे शेड्युल तसे सतत व्यस्त असते. मात्र हवालदार अनिल ऐनापुरे यांनी अॅथलेटिक्समध्ये जिद्दी आणि मेहनतीच्या जोरावर अनेक विक्रम प्रस्थापित करत आंतरराष्ट्रीय खेळाडू म्हणून नाव कमावले आहे. राज्य पोलिस दलाचा उत्कृष्ट खेळाडू म्हणून त्यांनी अगदी कमी वयात पोलिस महासंचालकांचे सन्मान चिन्ह हा बहुमान मिळवण्याची कामगिरी केली आहे.
     ऐनापुरे हे जतसारख्या जत दुष्काळी गावचे कुटुंब. वडील कृषी विभागात नोकरीला असल्याने सांगलीला स्थायिक झाले. शिक्षण सांगली हायस्कूलला झाले. इथेच त्यांचे लक्ष अडथळा शर्यतीकडे गेले.शालेय स्तरावर असतानाच त्यांनी त्याचा कसून सराव करायला सुरुवात केली. या कालावधीत त्यांना राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धेत बक्षिसे मिळाली. त्यांना प्रशिक्षक राजेंद्र कदम यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. या       खेळाचा त्यांना फायदा झाला आणि 2008 मध्ये ते खेळाडू म्हणून सांगली पोलिस दलात भरती झाले.
पोलिस दलातही त्यांनी आपले वर्चस्व सिद्ध करताना 400 आणि 110 मीटर अडथळा शर्यती जिंकल्या. 2009 आणि 2011 मध्ये अनुक्रमे केरळ आणि नवी दिल्ली येथे पार पडलेल्या अखिल भारतीय पोलिस क्रीडा स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला. 2014 पर्यंत या स्पर्धांमध्ये त्यांनी उत्कृष्ट कामगिरी नोंदवली आहे. 23 व्या राज्य पोलिस क्रीडा स्पर्धेत 400 मीटर अडथळामध्ये 54.85 सेंकदाची नोंद करत अनिल ऐनापुरे यांनी पूर्वीचा असलेला विक्रम मोडीत काढत नवा विक्रम नोंदवला. 2012 ते 2015 पर्यंत सलग चार वर्षे राज्य पोलिस स्पर्धेत प्रथम क्रमांक कायम राखण्याचा विक्रम रचला. या सगळ्या कामगिरीच्या जोरावर त्यांची 2014 मध्ये गोवा येथे झालेल्या चौथ्या लुसूफोनिया आंतरराष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धेसाठी निवड झाली.
     पोलिस दलाच्यावतीने अॅथलेटिक्स आंतरराष्ट्रीय स्पर्धेत निवड होणारे ऐनापुरे हे पहिलेच खेळाडू आहेत. या स्पर्धेत पाचवा क्रमांक मिळाला. अजूनही खूप मोठी कामगिरी करण्याची मनिषा बाळगून आहेत. नोकरी आणि कौटुंबिक जबाबदारी सांभाळतानाच सरावाकडेही लक्ष द्यावे लागते. शिवाय शारिरीक तंदुरुस्ती राखण्यासाठी त्यांना खाण्या-पिण्याकडे लक्ष द्यावे लागते.मात्र राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्याची जिद्द आणि धडपड कायम असल्याने सरावाकडे जाणीवपूर्वक लक्ष देत आहेत.

No comments:

Post a Comment