Thursday, July 13, 2017

'समाजसुधारक' आगरकर

     ‘सुधारककर्ते गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म 14 जुलै 1856 चा.  टेंभू (सातारा जिल्हा) या गावी गरीब कुटुंबात त्यांचा जन्म झाला. अडीअडचणींना तोंड देत कर्हाड, रत्नागिरी, अकोला आणि पुणे येथे राहून त्यांनी एम. . पदवी संपादन केली. महाविद्यालयात शिकत असतानाच जॉन स्टुअर्ट मिल व हर्रर्ट स्पेन्सर यांच्या विचारसरणीने ते संस्कारित व प्रभावित झाले. त्यामुळे त्यांचा दृष्टिकोन बुद्धिप्रामाण्यवादी, उदारमतवादी व आशयवादी झालेला होता. आगरकर 19 व्या शतकाच्या उत्तरार्धात अवघे 39 वर्षे जगले; पण त्या अल्पकाळातील त्यांची कामगिरी व कर्तृत्व अनन्यसाधारण आहे.
      बुद्धिप्रामाण्यवादी, उदारमतवादी व आशयवादी हीच त्यांची भूमिका केसरी आणि सुधारकमधून व्यक्त झाली. त्यागी, निःस्वार्थी आयुष्याची सुरुवात करताना आगरकर आपल्या आईला लिहितात, ‘आपल्या मुलाच्या मोठाल्या परीक्षा होत आहेत. आता त्याला मोठ्या पगाराची चाकरी लागेल व आपले पांग फिटतील, असे मोठाले मनोरथ आई तू करत असशील; पण मी आताच तुला सांगून टाकतो की, विशेष संपत्तीची, विशेष सुखाची हाव न करता फक्त पोटापुरत्या पैशावर संतोष मानून सर्व वेळ परहितार्थ खर्च करणार आहे.’ 1880 च्या दशकात त्यांनीन्यू इंग्लिश स्कूलमध्ये अध्यापनाचे काम केले वकेसरीचे संपादक म्हणून सात वर्षे जबाबदारी सांभाळली. कुशल, सुयोग्य संपादनामुळेकेसरीथोड्याच काळात लोकप्रिय झाला; पण केसरी व मराठाच्या व्यवस्थापन मंडळास केसरीने राजकीय प्रश्नासंबंधी जाणीव जागृतीचे लेखन अधिक महत्त्वाचे वाटत होते, त्यामुळे त्यांची वैचारिक कुचंबणा, कोंडमारा होत होता. म्हणून गोपाळ गणेश आगरकर यांनी केसरीचे संपादकपद सोडले व स्वतःचे स्वतंत्र असेसुधारकपत्र सुरू केले.
     ‘सुधारक काढण्याचा हेतूया आपल्या लेखात आगरकर म्हणतात- ‘मूळ प्रकृती म्हणजे भारतीय अस्तित्व न सांडता या पाश्चिमात्य नवीन शिक्षणाचा व त्याबरोबरच्या या नवीन कल्पना येत आहेत, त्यांचा आम्ही योग्य रीतीने अंगीकार करीत गेलो, तरच आमचा निभाव लागणार आहे.’ समाजातील चालीरीती, व्यवहार, स्त्री-पुरुषांचे जीवन आदी बाबींसंबंधी सखोल, मूलगामी चिंतन हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा स्थायीभाव होता, हे चिंतन जनसामान्यांना जागे करून त्यांना विचार करण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी होते, देवतांची उत्पत्ती, मूर्तिपूजा इत्यादी तात्त्विक व धर्माशी निकटचे संबंध असलेले विषय आहेत, तसेच स्त्रियांचे पोषाख, पुरुषांचे पेहराव, संमतीचे वय, सोवळ्याची मीमांसा आदी विषय आहेत. ‘ज्याने आपल्या बुद्धिसामर्थ्याने व साधुत्वाने जगास वश केले, तो खरा शास्ता व त्याचा अंमल खरोखर भूषणावह होय,’ असे आगरकर यांनी म्हटले आहे. आगरकरांचा भर व्यक्तिस्वातंत्र्यावर होता. त्याचा पुरस्कार करताना रूढीच्या शृंखला तोडण्याचा आदेश दिला; पण व्यक्तीने स्वैराचार, स्वैरवर्तन करूस समाजसौख्य संकटात आणणे योग्य नव्हे, असा इशाराही त्यांनी दिलेला आहे. समाजाची संपत्ती वाढायला हवी, हे सांगताना संपत्तीची समान वाटणी झाली पाहिजे, हाही त्यांचा आग्रह होता.
     निखळ बुद्धिवादी दृष्टिकोनातून सार्या समाजजीवनाचे विश्लेषण केले. दुष्ट, अनिष्ट रूढींवर त्यांनी प्रखर हल्ले केले. नीतिमान, स्वच्छ, सदाचरणी समाजाच्या बांधणीसाठी, निर्मितीसाठी ईश्वर व धर्म यांचीही गरज, आवश्यकता त्यांना वाटत नव्हती. ‘देव मानणारा देवमाणूसअसे ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वि. . खांडेकर यांनी त्यांचेबद्दल म्हटले आहे. ‘सुधारकपत्राचे लेखन, संपादन आगरकर यांनी निष्ठेने, निश्चयाने, निर्धाराने सतत सात वर्षे केले. त्यांची शैली, स्पष्ट, रोखठोक, कठोर होती; पण त्याचबरोबर विवेक, परमसहिष्णुताही होती. त्यांचे विचार जहाल होते. म्हणूनसुधारककर्ते आगरकर हे जहाल उदारमतवादी होते, असे म्हटले जाते. आजही जनसामान्यांवर दुष्ट रूढी, खोट्या, जुन्या, भोळ्या अंधश्रद्धा यांचा प्रभाव आहे. सद्भाव, सहिष्णुता, सर्व समावेशकता यांची जोपासना करण्याची नितांत आवश्यकता आहे. म्हणून 21 व्या शतकाच्या दुसर्या शतकातसुधारककर्ते आगरकर यांचे विचार प्रस्तुत, प्रेरक आहेत, असेच म्हणायला हवे.

No comments:

Post a Comment