Saturday, July 8, 2017

खड्ड्यांपासून मुक्तता कधी मिळणार ?

     परवा सांगलीत  पावसाचे पाणी साचलेल्या खड्ड्यात मोटारसायकल गेल्याने त्यावर स्वार झालेला तरुण उडून रस्त्यावर पडला आणि मागून येणारे वाहन त्याच्या अंगावरून गेल्याने तो जागीच ठार झाला. असे अपघात सगळीकडेच कमी जास्त प्रमाणात होत असतात.खड्डे अपघाताला निमंत्रण देतात. या  खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातांत अनेकांना दरवर्षी जीव गमवावे लागतात. देशातील सर्वच महानगरे आणि मध्यम शहरे आणि नगर पालिका जिथे अस्तित्वात आहेत, अशी गावे अनेक प्रकारच्या समस्यांनी ग्रासल्याचे पाहायला मिळत आहेत.कितीही रस्ते दुरुस्ती करा पुन्हा खड्डे पडलेले आपल्या अनुभवास येत असतात.याला कारण आहे ते काम निकृष्ट झाले असल्यामुळेचे!टक्केवारीच्या या दुनियेत प्रत्यक्ष कामावर फारच कमी पैसे खर्च होतात.त्यामुळे खड्डे उखडतात आणि अपघात होतात.पावसाळा सुरू झाला की, असे खड्डे आपल्याला पाहायला मिळतात.

      0१५ मध्ये रस्त्यावरील खड्डे, काम सुरू असलेल्या रस्त्यांमधील अडथळे आणि स्पीडब्रेकर यामुळे झालेल्या अपघातांत १0 हजार २७२ जणांना जीव गमवावा लागला आहे. अर्थात, 0१४ ची आकडेवारी पाहता २0१५ मध्ये रस्त्यांवरील अपघातांमुळे जीव गमवावा लागलेल्यांच्या संख्येत थोडी घट झाली आहे; मात्र खड्ड्यांमुळे मृत्युमुखी पडणार्‍यांची संख्या वाढलेली दिसत आहे. २0१४ मध्ये मृतांची संख्या ३ हजार ३९ होती, तर २0१५ मध्ये हा आकडा ३ हजार ४१६ झाला. महाराष्ट्रात तर खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातातील मृतांची संख्या तब्बल सात पटींनी वाढली आहे. महाराष्ट्रात २0१४ मध्ये अशा प्रकारच्या अपघातांत १२४ जणांचा मृत्यू झाला होता, तर २0१५ मध्ये राज्यातील तब्बल ८१२ लोकांना केवळ खड्ड्यांमुळे जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे खड्डे प्रकरण किती महत्त्वाचे आहे, हे यावरून आपल्याला पाहायला मिळते.
     सर्वांत मोठी शोकांतिका अशी की, जे रस्ते नव्याने तयार केले आहेत किंवा जे रस्ते नुकतेच तयार करण्यात आली आहे तेही रस्ते जागोजागी उखडले आहेत. खरे तर रस्ते ही आपली आर्थिक,दळणवळण रक्तवाहिनी आहे. त्यामुळे ते मजबूत असायला हवेत.मात्र तसे होताना दिसत नाही. भ्रष्टाचार आपल्या नसानसात भिणला आहे. टक्केवारीवर सगळा प्रकार सुरू आहे.त्यामुळे खालपासून वरपर्यँत सगळेच मूँग गिळून गप्प असतात. त्यामुळे प्रसारमाध्यमे किंवा नागरिक कितीही कोकलले तरी त्याचा कुणावर काही परिणाम होत नाही. त्यामुळे फक्त खड्ड्यांमुळे अपघात होऊन मरणाऱ्यांची संख्या मोठी आहे. हेच जर दर्जाहीन काम करणार्‍यांवर कारवाई करण्याची हिंमत प्रशासनाने दाखविली असती, तर या मृत्यूच्या खड्ड्यांमध्ये गेलेल्या बळींची संख्या खूप कमी करता आली असती. खड्ड्यांमुळे 'सर्व्हाईकल' आजार जडतात. त्यामूळे फार लवकर माणसे शरीराच्या बाजूने बाद होतात. या खड्ड्यांमुळे अशा रुग्णांमध्ये दुचाकी चालविणार्‍या तरुणांची संख्या सर्वाधिक आहे, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. ही तरुण पिढी फार लवकर कामातून बाद होत आहेत. अनेकांच्या पाठीच्या मणक्यांमध्ये पोकळी निर्माण होते. धक्के खाल्ल्यामुळे मानेच्या आजारांमध्येही मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. 
     खड्ड्यांनी त्रस्त झालेल्या अनेक शहरांच्या  नागरिकांनी या समस्येपासून मुक्ती मिळविण्यासाठी एक अभिनव मोहीम छेडली. या समस्येकडे महापालिकेचे लक्ष वेधण्यासाठी या मंडळींनी या खड्ड्यांमध्ये झाडे लावायला सुरुवात केली. बेंगलूरमध्ये तर शहरातील काही कलावंतांनी खड्ड्यांभोवती सुंदर पेटिंग्ज काढली. या मंडळींनी खड्ड्यांसाठी खास एक फेसबुक पेज तयार केले आणि सर्व खड्ड्यांचे फोटो फेसबुकवर अपलोड केले. अशाच प्रकारची एक मोहीम जालंधरमध्येही राबविण्यात आली. 
     पुणे-मुंबई मार्गावर देहूरोडजवळ असाच एक भलामोठा खड्डा वर्षानुवर्षे तसाच दुर्लक्षित होता. तक्रार करूनही कुणी दखल घेतली नाही, तेव्हा अखेर या खड्ड्याभोवती रांगोळी काढण्यात आली. मोठा केक आणून तो कापण्यात आला. या केकचा सर्वांत मोठा तुकडा या खड्ड्यात टाकण्यात आला. उपस्थितांनी 'हॅपी बर्थडे' गाणे म्हणून खड्ड्याचा वाढदिवस साजरा केला. या वाढदिवसामुळे तरी कदाचित अधिकारी जागे होतील आणि खड्डा भरून टाकतील, अशी अपेक्षा या उत्सवामागे होती. सांगली जिल्ह्यातही खड्ड्यात वृक्षारोपण करण्याच्या घटना घडल्या. केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात रस्ते तयार करण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञान वापरून टिकाऊ रस्ते तयार करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र आपल्या देशात यासाठी विशेष प्रयत्न होताना दिसत नाही. रस्त्यांसाठी नवे तंत्रज्ञान उपलब्ध झाल्याशिवाय आपल्याकडे हा खड्ड्याचा प्रश्न संपणार नाही. पण यासाठी राजकीय इच्छाशक्ती महत्त्वाची आहे. भ्रष्टाचाराने बरबरटलेली ही यंत्रणा याकडे लक्ष देणार का,असा प्रश्न आहे. मात्र खड्ड्यांमुळे मरणाऱ्यांची वाढत चालली असताना गप्प बसून चालणार नाही.  जीवघेण्या खड्ड्यांपासून मुक्ती मिळविण्यासाठी आपल्याला ठोस प्रयत्न करावेच लागतील.


No comments:

Post a Comment