Wednesday, August 2, 2017

डाळिंबाच्या पिकाला भविष्याची चिंता

     डाळिंब पीक अलिकडच्या काळात शेतकर्‍यांसाठी वरदान ठरले आहे. कमी पाण्यात येणारे पीक दुष्काळी भाअगातील शेतकर्‍यांबरोबरच सर्वच भागातील शेतकर्‍यांसाठी पैशाचे झाड ठरले आहे. मात्र गेल्या दोन तीन वर्षात डाळिंबाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असल्याने त्याच्याबाबतीत वेगळीच चिंता शेतकर्‍यांना सतावत आहे. डाळिंबाला  मिळत असलेला कमी भाव,प्रक्रिया उद्योग व निर्यातक्षम उत्पादनाचा अभाव यामुळे ही चिंता उभी राहिली आहे. दर्जेदार उत्पादन निर्मिती आणि प्रक्रिया उद्योगाला चालना दिली तरच यातून मार्ग निघनार आहे आणि उत्पादकांचे नुकसान टळणार आहे.

     आतापर्यंत या डाळिंब पिकाने अनेक शेतकर्‍यांना चांगला मदतीचा हात दिला आहे. अनेक शेतकरी आर्थिकबाबतीत सक्षम होऊन त्यांचे राहणीमानही उंचावले आहे. त्यामुळे हे पीक महाराष्ट्र राज्यात सर्वदूर पसरले आहे. दुष्काळी भागातून डाळिंब पीक सधन भागातही पोहचले आहे.त्यातल्या त्यात  सांगली,सोलापूर, अहमदनगर,सातारा,पुणे, नाशिक, जळगाव,जालना,बीड आदी जिल्ह्यांत डाळिंबाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते.सांगली,सोलापूर हे जिल्हे तर डाळिंबाचे आगारच म्हणून ओळखले जातात. अलिकडच्या दोन-तीन वर्षात उत्पादन वाढल्याने बाजारात मागणीपेक्षा अधिक आवक होत आहे. तीन वर्षांपूर्वी डाळिंबाला प्रतिकिलो 20 ते 350 रुपयांपर्यंत भाव मिळत होता. तो आता 10 ते 90 रुपयांपर्यंत मिळत आहे. राज्यातून बंगळुरु,चेन्नई,दिल्ली,गोरखपूर,अहमदाबाद,गोवा,मुंबई आदी शहरांकडे माल पाठवला जातो. शिवाय विविध शहरांमधूनही मागणी आहे. पूर्वी आवक मर्यादित होती.शिवाय अलिकडे डाळिंबावर पडणार्‍या रोगांवर नियंत्रण करण्यासाठी औषधांची निर्मितीही झाली आहे. याचा परिणाम असा झाला आहे की, त्यामुळे उत्पादन वाढत आहे. बाजारात आवक वाढली की आपोआप भाव कमी होतात.हीच स्थिती राहिली तर शेतकर्‍यांचे  नुकसान होते.सध्या या संकटात डाळिंब पीक अडकले आहे.
   पूर्वी म्हणजे तीन वर्षापूर्वी एका एकरात शेतकर्‍याला 7 ते 8 लाखाचे उत्पन्न मिळत होते. शिवाय संशोधनाच्या माध्यमातून डाळिंबावर पडणार्‍या विविध मात करण्यासाठी अनेक औषधे बाजारात उपलब्ध झाली. त्यामुळे पिकावरील रोगाचे प्रमाण कमी झाले. साहजिकच बाजारात डाळिंबाची आवक वाढू लागली. त्यामुळे दरात मोठी घसरण होऊ लागली आहे. सध्याच्या परिस्थितीत एकरात फक्त 1 ते 2 लाखाचेच उत्पन्न मिळत आहे. डाळिंबाचे पीक घेण्यासाठी खर्चही मोठा आहे. फवारणी आणि मजुरीचा खर्चही वाढला आहे. त्यामुळे केलेला खर्च तरी निघेल की नाही, अशी चिंता सतावत आहे. 
    डाळिंबाची बाजारातील आवक अशीच राहिली तर त्याच्या दरात आणखी घसरण होण्याची शक्यता आहे. सगळ्याच जिल्ह्यात जवळपास दोन ते तीन पटीने डाळिंबाचे क्षेत्र वाढले आहे. शेतकर्‍यांना चांगला मिळावा यासाठी प्रक्रिया उद्योग आणि निर्यातीला प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे. प्रक्रिया उद्योग स्थापन्याची आवश्यकता असून यात दिरंगाई धोकादायक ठरणार आहे. शासनाने यासाठी प्रोत्साहन देऊन उद्योगवाढीला चालना देण्याची गरज आहे.
     नोटाबंदीनंतर सगळ्याच फळांचे बाजार कोसळले होते.लागवड क्षेत्र आणि उत्पादनात वाढ होत असल्याचा परिणाम भावावर होत आहे. डाळिंबाचा हंगाम हा सप्टेंबर, ऑक्टोबरपर्यंत चालतो.त्यानंतर गुजरात,राजस्थान येथील डाळिंबाचे उत्पादन सुरू होते. त्या काळात परराज्यातील मागणी कमी होते. डाळिंबाचे उत्पादन जास्त होत आहे आणि देशातील बाजारपेठेची मर्यादा आहे. त्यामुळे भविष्यात शेतकर्‍यांसमोर निर्यात हाही एक पर्याय आहे.डाळिंबावर प्रक्रिया उत्पादन करण्यासाठी राज्य सरकारने संशोधनास प्राधान्य देण्याची गरज आहे.

No comments:

Post a Comment