Saturday, September 9, 2017

पती-पत्नीच्या नात्यामध्ये संशय होतोय 'हैवान'

     संशय एक असा आजार आहे, ज्याच्यावर कसलाच उपाय नाही. जर एकदा का पती-पत्नीपैकी कुणा एकाला त्याची लागण झाली तर हा आजार त्याला राक्षस बनवल्याशिवाय राहत नाही. अलिकडेच अशाच काही घटना घडल्या आहेत,यात माणसाच्या राक्षसी प्रवृत्तीचे दर्शन होते. राजकोटमध्ये अनैतिक संबंधाच्या संशयावरून बायकोने आपल्या नवर्याला जिवंत जाळण्याची घटना घडली.पत्नीचा आरोप होता की, नवर्याचा कुणा महिलेशी अनैतिक संबंध होते. दुसर्या एका घटनेत नवर्याचा बायकोवर संशय होता.त्याने तिच्या अंगावर कारच घातली. अहमदाबादमध्ये घडलेल्या या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहेत.

     आणखी एका घटनेत अनैतिक संबंधाच्या संशयावरून एका महिलेने आपल्या नवर्यावर चाकू हल्ला केला.यात तो गंभीर जखमी झाला.ही घटना हैद्राबादची आहे. दिल्लीतल्या विहार परिसरात घडलेल्या घटनेनुसार पतीने आपल्या बायकोचा मर्डरच केला.पोलिसांना त्याच्या जाबजबाबातून त्याचा आपल्या पत्नीवर संशय असल्याचे आढळून आले.त्याला वाटत होते की, त्याच्या बायकोची अनेक मुलांशी मैत्री होती. अशा घटना आपल्याही आसपास घडल्याच्या ऐकायला आणि पाहायला मिळाल्या असतील. मात्र अशा संशयीवृत्तीमुळे महिला असो वा पुरुष काही तरी रागाच्या भरात करून जातात आणि आयुष्यातून उठतात.शेवटी संशयीवृत्ती सर्वनाशच करते,हे एकदा आपण ध्यानात घेतले पाहिजे.
     मागे बहुचर्चीत अनुपमा गुलाटी हत्याकांडमध्ये न्यायालयाने पतीला खून प्रकरणात दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली.चारित्र्यावर संशय घेऊन नवर्याने बायकोचा खून तिचे 72 तुकडे केले होते.या अशा काही घटना आहेत, ज्यात फक्त संशयच प्रमुख व्हिलेन आहे.संशयामुळे पती-पत्नींमधले दाट नातेदेखील आपले अस्तित्व गमावून बसते.शेवटी हसत्या-खेळत्या दाम्पंत्यांमध्ये अशी कोणती गोष्ट घडते,ज्यामुळे दोघांमध्ये संशयाचे तण वाढायला लागते.
     कौटुंबिक जीवन विश्वासाच्या पायावर टिकलेले असते.त्यात संशय विष कालवण्याचे काम करते. अलिकडच्या काही वर्षात अनैतिक संबंधाच्याबाबतीत घेतल्या जाणार्या संशयावरून आपल्या लाईफ पार्टनरवर हल्ला करण्याच्या किंवा खून करण्याच्या घटना वाढत चालल्या आहेत.मानसशास्त्रज्ञ यामागे एकत्रित कुटुंब पद्धती मोडीत निघाल्याचे मोठे कारण जबाबदार असल्याचे सांगतात.वास्तविक एकत्रित कुटुंबामध्ये ज्यावेळेला पती-पत्नींमध्ये वाद-भांडणे होतात,तेव्हा घरातली मोठी माणसे त्यांच्यातले वाद-भांडणे चर्चेतून सोडवत असत. किंवा मोठ्यांच्या उपस्थितीमध्ये पती-पत्नी यांच्यामधील वाद-भांडणे मोठे स्वरुप घेत नाहीत. आताच्या घडीला जिथे फक्त  नवरा-बायकोच एकत्र राहतात,तिथे भांडणामध्ये दोघेही एकमेकांवर वरचढ राहण्याचा प्रयत्न करतात.त्यांच्यातल्या एकमेकांच्या संबंधातल्या संशयाच्या भिंतीचा बिमोड करणारे कोणी नसते. संशय दाट होत चालल्यामुळे  नवरा-बायकोची नाती आपला दम तोडताना दिसत आहेत.वर्तमान लाइफस्टाईलदेखील याला जबाबदार मानले जात आहे.
     दोघेही नोकरी करणारे असल्याने निम्म्यापेक्षा जास्त कालावधी त्यांचा घराबाहेर जात असतो.कित्येकदा कौटुंबिक जबाबदार्यांमध्ये अडकल्या कारणाने पती-पत्नी एकमेकांना अधिक वेळ देऊ शकत नाहीत.त्यांच्यात समस्या निर्माण होतात.तेव्हा ते बाहेरच्या संबंधांना जबाबदार धरतात. लाइफ पार्टनरविषयी अधिक पजेसिव होणं,हे देखील संशयाचं मोठं कारण आहे.आज महिला आणि पुरुष ऑफिसमध्ये एकत्रितरित्या मोठ-मोठ्या जबाबदार्या सांभाळताना दिसतातअर्थात त्यांचं एकत्रित येणं स्वाभाविक आहे.त्यांच्यातील वाढती जवळीकदेखील एकमेकांमध्ये संशय वाढण्यास मदत होते.
     अलिकडच्या काळात एकमेकांवर लक्ष ठेवण्यासाठी अनेक साधने, यंत्रणा उपलब्ध आहेत. स्मार्टफोनवरदेखील काही अॅप्स आहेत.त्यामुळे एकमेकांवर जासुशी करण्याची संधी मिळत आहे. वास्तविक नव्या तंत्रज्ञानाचा कसा वापर करायचा, हे आपल्यावर अवलंबून असते.खरे तर त्याचा उपयोग नाती सांभाळण्यासाठी,जपण्यासाठी करायला हवा,मात्र त्याचा उपयोग नाती तोडण्यासाठीच अधिक होत आहे.
नाती टिकवण्यासाठी काय करावे?
संशय वाढू देऊ नये: जर तुमची बायको रोज फोन,-मेल रिकॉर्ड तपासत असेल तर तिला अडवू नका.त्यांना त्यांच्या मनाची खात्री करू द्या. तुम्ही त्यांना रोज आपल्या मित्रांबाबत सांगत चला, कारण त्यामुळे त्यांचा संशय दूर होईल.
संशय चेष्टेवारी नेऊ नका
पत्नी जर संशयी स्वभावाची असेल तर त्यांच्या हरकती चेष्टेवारी नेऊ नका. त्यांना प्रेमाने समजावून सांगा.त्यांचा संशय कसा चुकीचा आहे,याची खात्री करून द्या. मी नवरा,पुरुष आहे,मी का सगळे सांगत बसावे, असे म्हणून त्यांना टाळू नका. दहशत माजवू नका. कोणी तरी एकाने सामंजस्याने घेतले तरच संसार सुखाचा होणार आहे.
नवर्याने बायकोला आपली रोजची दिनचर्या काय आहे, हे सांगण्याची आवश्यकता आहे.जर उशिर होणार असेल तर तसे फोन करून अगोदर घरी कळवा. न सांगता फिरायला जाणे,फोन न उचलणे अशा गोष्टी त्यांच्या संशयाला खतपाणी घालण्याचे काम करतात.त्यामुळे नात्यात दुरावा निर्माण होतो. आपल्या महिला सहकार्यांची ओळख पत्नीला करून द्या.नात्यामध्ये विश्वास कायम राखण्यासाठी शक्य तिथे प्रयत्न करा.
हेदेखील करा
नवरा-बायकोचे नाते इतकेही कमकुवत असू नये, जे एका क्षणात तुटावे.एकमेकांचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न व्हायला हवा. एकमेकांवर संशय घेण्याअगोदर पहिल्यांदा शांतपणे विचार करा.जर मन मानायला तयार नसेल तर प्रेमपूर्वक आपल्या शंकांचे निवारण करून घ्या. एकमेकांना सन्मान आणि आदरदृष्टीने पाहा.समोरच्याला कमी लेखण्याचा प्रयत्न करू नका.एकमेकांच्या गोष्टी पूर्णपणे ऐकून घ्या,विश्वास ठेवा.छोट्या छोट्या गोष्टींवरून एकमेकांना टोचून बोलू नका.कुटुंबात किंवा बाहेर मित्रांमध्ये आपल्या नात्याचे पावित्र्य जपा.त्यानुसारच वागा.प्रेमानेच विश्वसनीयतेचे कवच मजबूत बनू शकते.
यामुळे येतो बायकोला संशय
अभ्यासकांच्या मतानुसार मोबाईलवर अधिक बोलणे किंवा वॉट्सअॅपवर अधिक क्रियाशील राहणं पत्नीला संशय वाटण्याला प्रोत्साहन मिळते.अशावेळी परिस्थिती अधिक स्पष्ट करून सांगा. अचानक ऑफिशियल ट्रिपला जाणे, पत्नीला संशयात टाकू शकतो.त्यामुळे घरी विश्वास देणं महत्त्वाचं आहे. अचानक पती गोड बोलत असेल किंवा आवश्यकतेपेक्षा जास्त काळजी घेत असेल तर तिच्या डोक्यात संशयाची घंटी वाजत असल्याचे लक्षात घ्यायला हवे.नवरा एकटाच घराबाहेर जाण्यापूर्वी आवश्यकतेपेक्षा जास्त नटत-थटत असेल तर पत्नी संशयाच्या नजरेने पाहायला लागते.खरे तर संशय एक अशी वस्तू आहे, जी कुणाला कशी,केव्हा आणि कुठे वश करेल, सांगता येत नाही.त्यामुळे एक गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे की, आपल्या नात्याचा पाया विश्वासावर टिकून आहे.

No comments:

Post a Comment