Friday, October 20, 2017

(कथा) दोन थेंब अश्रू

     तो कैदी होता.त्याला जन्मठेपेची शिक्षा मिळाली होती.एक दिवस संधी साधून तो तुरुंगातून पळाला. जोरजोराने तो धावत होता. आपली सगळी शक्ती एकवटून तो धावत होता.धावून धावून तो इतका थकून गेला की, वारंवार रस्त्यावर कोसळू लागला. पुन्हा धडपडत उठायचा आणि धावायला लागायचा. समोर एक रुंद नदी होती. नदी खूप खोलगट नव्हती.पण त्याला पोहायला अजिबात येत नव्हते.लाकडाचा एक चौरस तुकडा नदीच्या काठाला तरंगत होता.पोलिस शिपायांच्या भितीने भांबावून गेलेला तो कैदी आपला एक पाय लाकडावर ठेवण्याचा प्रयत्न करत होता.तेवढ्यात नदीकाठाला दोन माणसे आली. त्यातला एक त्याचा मित्र होता आणि दुसरा शत्रू. जो शत्रू होता, तो काही न बोलता गपचिप उभा राहिला.पण त्याचा मित्र आपली संपूर्ण ताकद लावून जोरजोराने ओरडू लागला, “ हे काय करतोयस? तुझं डोकं तर फिरलं नाही ना? दिसत नाही का, हा लाकडी तुकडा पार कुजलेला आहे तो? तुझं वजन पेलणार नाही त्याला. हा मध्येच तुटून जाईल. मग तू मेलासच समज!”

पण नदी पार करायला दुसरा पर्यायच नाही. दिसत नाही का, शिपाई माझा पाठलाग करत आहे ते?” असे म्हणत त्या दुर्दैवी माणूस लाकड्याच्या तुकड्याच्या दिशेने चालू लागला.
परंतु, मी असा तुझा सर्वनाश होऊ देणार नाही!” त्याचा मित्र मोठ्याने ओरडला आणि लाकडी तुकडा त्याने लांब भिरकावून दिला.प्राणाच्या भितीने गारवटून गेलेल्या कैदीला तो लाकडाचा तुकडा मिळवणं भाग होतं- स्वत:ला वाचवण्यासाठी हा एकमेव मार्ग होता. त्याने त्या तुकड्यासाठी पाण्यात उडी मारली. एकदा...दोनदा... तो वर आला आणि मग त्याने कायमची जलसमाधी घेतली.
त्याचा शत्रू जोरजोराने काही-बाही बोलून निघून गेला, मात्र त्याचा मित्र मात्र स्फुंदून स्फुंदून रडू लागला.
त्याच्या डोक्यात एक क्षणदेखील असा विचार आला नाही की, त्याच्या मित्राच्या मृत्यूला तो स्वत: जबाबदार आहे.
तो रडून रडून सांगत होता- “ त्याने माझे ऐकले नाही.माझी एकही गोष्ट ऐकली नाही.”  ज्यावेळेला लोकांनी त्याला खूप समजावलं,त्यावेळी त्याने स्वत:चे सांत्वन करण्याचा मार्ग शोधून काढला. “ जर तो जिवंत असता तरीही त्याला तुरुंगात सडून मरावे लागले असते. आता कमीतकमी त्याच्या यातना तरी कमी झाल्या.” तरीही लोकांमध्ये त्या कैद्याची चर्चा चालायची,तेव्हा त्याचे  डोळे डबडबून यायचे. आपल्या दुर्दैवी मित्रासाठी तो माणूस नेहमी दोन थेंब अश्रू वाहायचा.( मूळकथा-इयान तुर्गनेव )
अनुवाद-मच्छिंद्र ऐनापुरे    



No comments:

Post a Comment