Saturday, November 4, 2017

खरा सुपरस्टार कोण?

     आजच्या मल्टिफ्लेक्सच्या जमान्यात हिंदी चित्रपटाच्या यशाची समिकरणे बदलली आहेत. पूर्वी 25 -25 आठवडे एकच चित्रपट थिएटरवर लागलेला असायचा. जास्तीत जास्त जो चित्रपट चालाला,तो हिट समजला जायचा. साहजिकच राजेश खन्ना, अमिताभ बच्चन यांचे चित्रपट अधिक दिवस चालायचे. राजेश खन्नाच्या अस्तानंतर सुपरस्टार म्हणून अमिताभ बच्चन उदयास आला. मात्र त्यानंतर सुपरस्टार या नावाची पदवी कोणालाच मिळाली नाही. बॉलीवूडचा बादशहा म्हणून ओळखला जाणारा शाहरुख बॉलीवूडचा खरा सुपरस्टार आहे का, हा सवाल उपस्थित होतो. कारण खरा सुपरस्टार या उपाधीसाठी निवड कशी आणि कोणाची करायची? कारण आज हिट चित्रपटाचे समिकरण बदलले आहे. आज शंभर कोटी क्लबमध्ये पोहचणारा चित्रपट हिट समजला जातो. म्हणजे चित्रपटाने शंभर कोटीचा बिझनेस केला की, तो चित्रपट हिट. आपल्यादृष्टीने सुपरस्टार कोणाला ठरवायचे? सगळ्यात जास्त ज्याचे चित्रपट शंभर कोटी क्लबमध्ये पोहचले आहेत, त्याला सुपरस्टार बहाल करावे का? तत्पूर्वी यावर्षीचा थोडा लेखाजोखा पाहू.

    2017 मध्ये सलमान, शाहरुख आणि आमिर या खान त्रिकुटासह ऋत्विक रोशन आणि रणबीर कपूर या सगळ्यांनाच बॉक्स ऑफिसवर जोरदार झटके बसले आहेत. मात्र अक्षयकुमारचे स्टारडम वाढले आहे. अजय देवगनला दिवाळीच्या मुहुर्तावर आलेल्या गोलमाल अगेनने आपली चमक कायम ठेवण्यास हातभार लावला आहे. हा दोनशेचा कोटीचा पल्ला गाठेल, असे सध्यातरी दिसत आहे. वरुण धवन स्टारडमच्या स्पर्धेत वेगाने पुढे येत आहे. त्याच्या यावर्षी दोन चित्रपट शंभर कोटीचा बिझनेस केला आहे. त्यामुळे त्याला आता लंबी रेस का घोडा म्हटले जात आहे. आता शेवटच्या दोन महिन्यात पद्मावती आणि टायगर जिंदा है या तगड्या चित्रपटांचे कलेक्शनदेखील चांगलेच असणार आहेत, असा तर्क काढला जात आहे. अशा सगळ्या परिस्थिती 2017 जाता जाता आशा- निराशाचे वातावरण देऊन जाईल, का असे म्हणायला अजून थोडा कालावधी आहेत्यामुळे हे पाहणं मनोरंजक आहे की, या चित्रपट तार्यांच्या रेसमध्ये शेवटी बॉक्स ऑफिसचा खरा बादशहा कोण असणार आहे. शंभर कोटी आज यशाची ओळख आहे. या आधारावर यावर्षीचा  स्टारडम कुणाचा किती चमकतो आहे, हे पाहता येणार आहे. मात्र ऑलटाइम सुपरस्टार कुणाला बहाल करायचे हा प्रश्न उरतोच नाही का? त्यामुळे आजच्या आघाडीच्या कलाकारांच्या आजवरच्या कारकिर्दीवर थोडा प्रकाशझोत टाकू.
सलमान खान
शंभर कोटी क्लबचा मेंबर बनवण्याच्या आजच्या हिट फार्म्युल्याचा विचार करताना दबंग सलमान खान यात आघाडीवर असल्याचे दिसते. कारण त्याच्या आजपर्यंत तब्बल अकरा चित्रपटांनी शंभर कोटीचा बिझनेस केला आहे. दबंग चित्रपटानंतर त्याची बॉक्स ऑफिसवर दबंगगिरी कायम राहिली आहे. दबंगपासून ट्युबलाइटपर्यंतच्या 11 चित्रपटांनी शंभर कोटीपेक्षा अधिक व्यवसाय केला आहे.दबंग,रेडी,बॉडीगार्ड,एक था टायगर, दबंग 2, जय हो, प्रेम रतन धन पायो आणि ट्यूबलाइट हे चित्रपट शंभर कोटी क्लबचे आहेत. किकने दोनशे कोटीचा बिझनेस ओलांडला होता तर बजरंगी भाईजन आणि सुलतान ने 300 कोटी कमावले होते.
अक्षय कुमार
यानंतर क्रमांक लागतो तो अक्षयकुमारचा! अक्षयकुमारने खूप मेहनत घेत या मुकामवर पोहचला आहे. त्याला हिट मशीनची उपमा दिली जाते. शंभर कोटी क्लबच्या या स्पर्धेत अक्षयकुमार शाहरुख आणि आमिरच्या पुढे आहे.त्याचे आतापर्यंत आठ चित्रपट  शंभर कोटी क्लबमध्ये पोहचले आहेत. टॉयलेट: एक प्रेमकथा,, जॉली एलएलबी2, रुस्तम, हाऊसफुल3 एयरलिफ्ट या पाच चित्रपटांनी शंभर कोटीचा बिझनेस केला आहे तर हाऊसफुल2, राऊडी राठोड आणि हॉली डे या चित्रपटांनी शंभर कोटीपेक्षा अधिक बिझनेस केला आहे.
शाहरुख खान
बॉलीवूडचा बादशहा म्हणून ओळ्खला जाणारा शाहरुख खान याचा सध्याचा काळ हा खराब चालला आहे.हॅप्पी न्यू इयर नंतर त्याचा एकही चित्रपट हिट झाला नाही. यावर्षी आलेला रईस चित्रपट कसा तरी शंभर कोटी क्लबचा दरवाजा खटखटू शकला.मोठ्या बजेटचा जब हॅरी मेट सेजल चित्रपट तर फक्त 60 कोटीचा पल्ला गाठू शकला. शाहरुखने फॅनसारखा फ्लॉप चित्रपटदेखील दिला आहे. शाहरुख खानजवळ 200 कोटीचा फक्त एक चित्रपट आहे, तो म्हणजे चेन्नई एक्सप्रेस! 2015 नंतर शाहरुखच्या कारकिर्दीला उतरती कळा लागली आहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये.
आमिर खान
आमिरखानचे पाच चित्रपट शंभर कोटी क्लबमध्ये पोहचले आहेत. बॉलीवूडमध्ये मिस्टर परफेक्शनिस्ट नावाने ओळखला जाणारा हा कलाकार आपल्या भूमिकेत अक्षरश: जीव ओततो. भूमिकेनुसार आपल्यात चेंजेस करणारा हा एकमेव कलाकार आहे. भूमिकेसाठी वजन वाढवणं, कमी करणं, हा प्रकार रिस्की आहे.पण आमिर खान असली रिस्क घ्यायला तयार असतो. अशा या कलाकारानेच बॉलीवूडमध्ये शंभर कोटी क्लबचा यशाचा फार्म्युला सुरू केला होता. 2008 मध्ये त्याच्या गजनी चित्रपटाने 114 कोटी कमावले होते. 2012 मध्ये आलेला तलाश (90 कोटी) सोडला तर आमिरखानची मुख्य भूमिका असलेल्या प्रत्येक चित्रपटाने देशभरात शंभर ते तीनशे कोटीचा बिझनेस केला आहे. त्याच्या थ्री इडियटस आणि धूम 3 या दोन्ही चित्रपटांनी 200 कोटी बिझनेसचा पल्ला गाठला आहे. पीके आणि दंगल ने 300 कोटीचा आकडा पार केला आहे.
अजय देवगण
शंभर कोटी क्लबचे चार चित्रपट देऊन अजय देवगण चौथ्या स्थानावर आहे. मात्र सध्या तो अपयशाच्या गर्देत अडकलेला आहे. सिंघम रिटर्न्स नंतर फ्लॉप आणि साधारण चित्रपट देणार्या अजय देवगणला गोलमाल अगेनने मात्र चांगला हात दिला आहे. 2017 मधील सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. गोलमाल-3, बोलबच्चन, सिंघम रिटर्न्स आणि गोलमाल अगेन या चार चित्रपटांनी शंभर कोटी क्लबची मेंबरशीप मिळवली आहे. मात्र आगामी काळात त्याच्या एकट्याच्या जीवावर चालणार्या मोठ्या यशस्वी चित्रपटाची त्याला गरज आहे.
वरुण धवन
नव्या पिढीचा सगळ्यात भरवशाचा कलाकार म्हणून वरुण धवनकडे पाहिले जात आहे. अल्पावधीत त्याचे चार चित्रपट शंभर कोटी क्लबमध्ये पोहचले आहेत. 2012 मध्ये प्रदर्शित झालेल्या स्टुडंट ऑफ इयर या चित्रपटाद्वारा आपले करिअर सुरू केलेल्या वरुणचे आतापर्यत नऊ चित्रपट आले. यातला एकही चित्रपट फ्लॉप ठरला नाही. एबीसीडी-2, दिलवाले, बद्रीनाथ की दुल्हनियां, जुडवा-2 या चार चित्रपटांनी शंभर कोटीवर व्यवसाय केला आहे. हम्प्टी शर्मा की दुल्हनियां आणि बदलापूर या चित्रपटांनीही चांगला व्यवसाय केला आहे.
ऋत्विक रोशन
कहो ना प्यार है या चित्रपटापासून ब्लॉकबस्टर सुरुवात करणारा ऋत्विक रोशन नंतर मात्र यशापयशाच्या हिंदोळ्यावर झुलत राहिला. घरच्या प्रॉडक्शनमध्ये तयार झालेल्या कोई मिल गया, क्रिश आणि क्रिश-3 या चित्रपटांमुळे त्याचे स्टारडम कायम राहण्यास हातभार लागला आहे. 2016 मधला सुपफ्लॉप मोहनजोदडो आणि यावर्षीचा साधारण व्यवसाय केलेला काबिल चित्रपटांमुळे त्याचे स्टारडम धोक्यात आले आहे. आता ऋत्विक शिक्षणतज्ज्ञ आणि गणिततज्ज्ञ आनंदकुमार यांच्या बायोपिकद्वारा आपले नशिब आजमावणार आहे. ऋत्विकच्या खात्यावर अग्निपथ, क्रिश-3 आणि बँग बँग हे  शंभर कोटी क्लबचे चित्रपट आहेत. आपली चमक कायम ठेवण्यासाठी त्याला चमकदार कामगिरीची गरज आहे.

No comments:

Post a Comment