Friday, November 10, 2017

यशासाठी जन्म आपुला

     आयुष्यात प्रचंड यश मिळवायचं असेल तर पहिल्यांदा आपण आपलं आवडीचं क्षेत्र निवडायला हवं. माणूस आपल्या आवडीच्या क्षेत्रात अगदी मनापासून,जीव तोडून काम करतो. आवडीचे क्षेत्र असेल तर त्याला त्या कामाचा कंटाळा येत नाही.आवड नसलेल्या क्षेत्रात माणूस कंटाळा करतो. ते काम ओढून ताणून करतो. मन नसले तरी ते त्याला करावे लागते.साहजिकच कामात चुका होत राहतात. वारंवार चुका व्हायला लागल्या तर बोलणी खाव्या लागतात.त्यामुळे टेन्शन येत.मनात भीती निर्माण होते. कामाची गरज असते.कामधंदा हवा असतो. त्यामुळे माणूस नोकरी जाण्याच्या वगैरे भीतीने सातत्याने ताणतणावाखाली वावरतो. साहजिकच त्याच्या मनातल्या इच्छा तशाच दबून राहतात.त्याला प्रगती करता येत नाही. मग आयुष्यभर त्यातच खितपत पडतो.

      मात्र तेच काम आवडीचे असेल तर माणूस प्रगती करत राहतो. त्याला जे ध्येय गाठायचे आहे,ते त्याला त्याच्या मेहनतीच्या जोरावर मिळून जाते. कारण माणूस आवडीचे क्षेत्र असल्यावर ते काम अगदी झपाटून  करतो. प्रिय काम असल्याने ते भरपूर काम करतात.त्यासाठी त्यांच्याकडे वेळच वेळ असतो. यशस्वी होणारी माणसे किंवा यशस्वी झालेली माणसे एका पेक्षा अधिक कामं करत बसत नाहीत.ते एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करतात. एकाच गोष्टीवर लक्ष दिल्याने कामदेखील परफेक्ट होते. काम परफेक्ट असेल तर काय होतं, हे आपल्याला माहीत आहेच. मागणी वाढते. कौतुक होते. आणखी बरेच काही होते.
     यशस्वी होण्यासाठी आणखीही काही गुणवैशिष्ट्ये आहेत. एकादे काम हाती घेतल्यावर ते पूर्ण केल्याशिवाय काही माणसे गप्प बसत नाहीत. काम हातावेगळे केल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही. अशी माणसे काम पूर्ण करण्यासाठी ते स्वतः ला आतून ढकलत असतात. कामावर जोर देतात. आपले काम छान व्हावे,सुंदर व्हावे,चांगले व्हावे यासाठी नवनव्या कल्पना लढवल्या जातात. कायम अशा कल्पना लढवणे आणि प्रत्यक्षात उतरवणारी माणसे गप्प बसत नाहीत. त्याच्या जोरावर ती पुढे पुढे सरकत राहतात.जिद्द,मेहनत यामागे असतेच, पण आपल्या परीने कल्पना लढवून आणि त्यात सातत्याने सुधारणा घडवून ते काम उत्तम झाले पाहिजे, यावर त्यांचा कटाक्ष असतो.अशी माणसे स्वतः मध्ये आणि कामात सातत्याने सुधारणा घडवत असतात.
     जीवनात पुढे जाण्याचे ध्येय बाळगून असलेली माणसे उत्तम सेवा देतात. त्यांच्यात नम्रपणा असतो.इतरांना कायम मूल्यवर्धन होईल, अशा प्रकारची सेवा देतात. चिकाटी असलेलीच माणसे जीवनात यशस्वी होतात. आयुष्यात हार-जीत होत असते. ही प्रक्रिया ज्याने समजावून घेतली आहे, तो अपयश आले तरी किंवा कठीण प्रसंग आळा तरी मागे सरत नाही. तो चिकाटीने पुढे सरकतो.
     यशस्वी व्यक्तींमध्ये अनुवंशिकता असते असे काहीजण म्हणतात.मात्र असे काही नसते. ही माणसे आपल्या कृतीतून पुढे येतात. आवडते तेच करण्याला प्राधान्य दिल्यास निम्मे यश पदरात पडते. त्यामुळे पहिल्यांदा एकादा अभ्यासक्रम निवडायचा आहे, करिअर साठी क्षेत्र निवडायचे असेल तर प्रथम आपल्या आवडीला  प्राधान्य द्यायला हवे. त्यामुळे एक महत्त्वाचे लक्षात ठेवा, यश हे उपजत असते, ते पालकंकडून त्यांच्या पाल्यामध्ये आनुवंशिकतेने उतरते, हे एक मिथक आहे.पण काही संशोधनाने असे सिद्ध झाले आहे की हे काही खरे नाही.कारण कष्ट,मेहनत आणि चिकाटीशिवाय त्याच्या पदरात काहीच पडत नाही.जे लोक यशस्वी झाले आहेत,त्यांची मुले आपल्या वडिलांचे निरीक्षण, अभ्यास करून पुढे आपला मार्ग त्यांनी निवडला आहे.म्हणजे त्यांची त्यात मेहनत आहे.
      त्यामुळे लक्षात ठेवा, आपल्या आयुष्यात यशस्वी व्हायचे असल्यास, ठरवलेले ध्येय गाठायचे असल्यास अंगी  झपाटलेपणा असायला हवा. सतत काम करत राहिले पाहिजे.कामावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. काम पूर्ण करण्यासाठी त्यावर जोर दिला पाहिजे.सतत वेगवेगळ्या कल्पना लढवल्या पाहिजे.त्यानुसार स्वतः त आणि कामात सुधारणा केल्या पाहिजेत.मूल्यवर्धन होईल अशी सेवा दिली पाहिजे आणि काहीही झाले तरी चिकाटी सोडता कामा नये. 

No comments:

Post a Comment