Tuesday, January 16, 2018

बालगुन्हेगारी रोखायला हवी

     महाराष्ट्र  पुरोगामी आणि प्रगत राज्य असल्याचा टेंभा मिरवला जात आहे,पण याच राज्यात गुन्हेगारी,स्त्री भ्रूण हत्या, बलात्कार, अपहरण, बालगुन्हेगारी,फसवणूक,भ्रष्टाचार वाढत चालला आहे.  यातील प्रगती हीच आता ओळख बनू पाहात आहे. राज्यात बालगुन्हेगारी फोफावली आहे.खरे तर याची फार गांभीर्याने दखल घेण्याची आवश्यकता आहे. दारिद्र्य,शिक्षणाचा अभाव, अज्ञान,व्यसन  या जेवढ्या गोष्टी याला कारणीभूत आहेत,तितक्याच जबाबदार राजकारणी लोकही आहेत. स्वतः च्या हितासाठी अशी व्यवस्था निर्माण करून त्यांनी पिढी बिघडवण्याचे काम पूर्वापार चालत आले आहे. सद्याची परिस्थिती पाहता बालगुन्हेगारीला  आवर घालणे कठीण असून सर्वांनीच यावर अधिक मंथन करण्याची आवश्यकता आहे.

      नुकताच  राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) 2016 मध्ये घडलेल्या गुन्हय़ांची सविस्तर माहिती देणारा अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालानुसार तुलनात्मकदृष्टय़ा 2016 मध्ये बालगुन्हेगारी आणि सामान्य गुन्हेगारीच्या प्रमाणातही मोठी वाढ झाल्याचे या अहवालावरून दिसत आहे.ही फार मोठी चिंतेची गोष्ट आहे. भीमा-कोरेगाव दंगलीनंतर मुंबईत उद्रेक घडला. यात मुंबई पोलिसांनी 16 अल्पवयीन युवकांवर कारवाई केली. शिवसेना उपविभागप्रमुख अशोक सावंत हत्येमध्ये एका अल्पवयीन युवकाचा सहभाग आहे,हेही स्पष्ट झाले आहे. देशभरात जे काही मोठे गुन्हे घडले आहेत,त्यात अल्पवयीन मुलांचा सहभाग बुद्धिजीवी लोकांना विचार करायला लावणारा आहे.
     दिल्लीचे निर्भयाकांड आणि मुंबईतील शक्ती मिल बलात्कार प्रकरणातही अल्पवयीन युवकांचा सहभाग होताच. या पाश्र्वभूमीवर या अहवालाने गंभीर वास्तव मांडले आहे, हे स्पष्ट होत आहे. या अहवालानुसार 2016 मध्ये जबरी चोरी वगळता हत्या, हत्येचा प्रयत्न, सदोष मनुष्यवध, बलात्कार, विनयभंग, चोरी, दरोडा, घुसखोरी, फसवणूक, अपहरण,  गैरकायद्याची मंडळी जमवणे, दंगल, अनैसर्गिक गुन्हे या सर्व शीर्षकांखालील गुन्हे 2014, 2015 पेक्षा जास्त नोंद झाले आहेत.
     या  अहवालानुसार 2016 मध्ये अल्पवयीन युवकांविरोधात 6239 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत  2015 मध्ये गुन्हय़ांची संख्या 5482 इतकी होती. गेल्या वर्षी 2015 च्या तुलनेत सातशे पेक्षा अधिक गुन्हे घडले आहेत. युवकांच्या गुन्हेगारीत राज्यातील पोलीस आयुक्तालये आणि जिल्ह्यांपैकी मुंबई (901), सातारा (811), पुणे (727), नागपूर (364) आणि ठाणे (344) अग्रेसर आहेत. मुंबईपाठोपाठ सातारा याबाबतीत आघाडीवर आहे. याचा अर्थ ग्रामीण भागातही या बालगुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. 
दारिद्र्य ही आपल्या देशातील फार मोठी समस्या आहे. आपल्या आर्थिक धोरणाचा फक्त मूठभर लोकांना लाभ होत आहे. श्रीमंत आणखी श्रीमंत होत चालला आहे, तर गरीब आणखी गरीब होत चालला आहे. आपल्या अर्थकारणातून आपल्याला आर्थिक समानता साधता आली नाही.त्याचा विचार कोणी करताना दिसत नाही. सरकारी यंत्रनेने नोकरभरती बंद केली आहे. त्यातही कंत्राटी पद्धत सुरू केल्याने एका बाजूला 40-50 हजार पगार घेणारा तर त्याच कार्यालयात सात-आठ हजार रुपयात राबणारा कंत्राटी नोकर अशी भीषण विषमता दिसून येत आहे. भवितव्य काय, असा आणखी एक प्रश्न सतावत आहे. त्यातच मोबाईल,टीव्ही,इंटरनेट या वस्तूंनी लोकांच्या मनाचा कब्जा घेतला आहे. काम न करता पैसे कमावण्याची प्रवृत्ती बळावत  आहे. त्यामुळे झटपट पैसे मिळवण्याच्या नादात आजचा तरुण काहीही करायला तयार होत आहे. लहानपणीच पैशाची चट  लागल्याने अल्पवयीन मुलेदेखील याकडे वळत आहेत. अल्पवयीन असल्याने गुन्ह्यात या मुलांना शिक्षा होत नाही. याचा फायदा या मुलांचा वापर करून घेणारे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक,राजकारणी घेत आहेत. 
     आजच्या बदलत्या जीवनशैलीत संस्कार नावाची चीज लुप्त होत चालली आहे. पालकांकडे पोटा-पाण्याचा प्रश्न सोडवण्याच्या नादात आपल्या पाल्यांकडे लक्षच नाही. श्रीमंत व्यक्ती सगळी सुखसोयी पायात लोळण घेत असतानाही पैशाच्या हव्यासापायी रात्र अन् दिवस घराबाहेर असतात. तर गरीब,झोपडपट्टीतले लोक पोटाचा प्रश्न मिटवण्यासाठी धडपडताना दिसत आहे. शालेय वयातच मग मुलांना वाईट सवयी लागताना दिसत आहेत. 
     पूर्वी शाळेत शिक्षकांचा धाक होता. मुलांवर भीती होती. आज परिस्थिती बदलली आहे. शैक्षणिक धोरण बदलले आहे. मुलांना मारायचे नाही, असे वेळोवेळी फतवे निघत असल्याने शाळेतून छड़ी हद्दपार झाली आहे.  टीव्ही,इंटरनेट यामुळे मुलांना लवकर समज येऊ लागल्याने मुलेही आता शिक्षकांना भित नाहीत. समाज व्यवस्थेत मुले तापट बनत चालली आहेत शिक्षकांवर मुले हात उचलू लागली आहेत. संस्कार घरात मिळत नाहीत, शाळेत नाही,त्यामुळे वाईट गोष्टींचा प्रसार पटकन होऊ लागल्याने त्याच गोष्टी मुलांना आवडू लागल्या आहेत. हे महासत्ता होण्याची स्वप्ने पाहणाऱ्या भारतासाठी फारच धोकादायक आहे. 
    या बालगुन्हेगारीला आवर घालण्यासाठी कायद्यात काही तरतुदी करण्याची मागणी होत आहे.16 वर्षांचा युवक प्रौढ गुन्हेगारच समजण्यात यावा,ही मागणी जोर धरत आहे. काही माजी आयपीएस अधिकारीही यांशी सहमत असून बालगुन्हेगारी रोखली नाही तर भविष्यात गुन्हेगारी नियंत्रणात ठेवणे अशक्य असेल, अशा प्रतिक्रिया अनुभवी अधिकाऱ्यांकडून व्यक्त केल्या आहेत.16 वर्षे पूर्ण करणाऱ्या युवकाला प्रौढ मानून त्यानुसार कारवाई केली जायला हवी आहे. यासाठी लवकरात लवकर एकमत होऊन पुढील कार्यवाही होणे गरजेचे आहे. 


No comments:

Post a Comment