Wednesday, January 3, 2018

(हिरव्या वाटा) राधिका,शॉपिंग बॅग आणि टॅक्सी ड्रायव्हर

     शहरात नव्या वर्षाचा उत्साह होता. शहरातील रस्ते,दुकाने माणसांच्या गर्दीने गजबजली होती. शहरातला प्रत्येकजण आपापल्या परीने नवीन वर्ष साजरा करत होता. कुणी फटाके उडवत होतं. कोण हॉटेलात भोजन करत होतं. कुणी शॉपिंग मॉलमध्ये डिस्काऊंटचा लाभ घेत मोठी खरेदी करत होते. सगळ्यांच्याबरोबर आज राधिकादेखील आपल्या मुलाबरोबर काही तरी खास करण्याच्या इराद्याने शॉपिंग मॉलमध्ये आली होती. वर्षभर दुसर्यांच्या घरची भांडी घासून, घर साफसफाई करून राधिकानेही काही पैसे जमा केले होते. शॉपिंग मॉलमध्ये दोघांनी खूप मस्ती केली. खूप सारे गेम्स खेळली. चांगल्या चांगल्या भोजनाचा आस्वाद घेतला. त्यानंतर राधिकाने आपल्या मुलासाठी दोन हजाराचे नवीन कपडे घेतले. तो दिवस राधिकेच्या मुलाच्या आयुष्यातला सर्वात मोठा दिवस होता. इतके सारे शॉपिंग तिने यापूर्वी कधी केले नव्हते.
शॉपिंग मॉलमधून आइस्क्रीम खात बाहेर पडल्यावर तिचा मुलगा तिला म्हणाला, आई, आज आपण टॅक्सीने घरी जाऊ. गल्लीतले लोक आपला थाट पाहून चाट पडतील. राधिकाने त्याची इच्छा पूर्ण केली. ते दोघे टॅक्सीने घरी आले. टॅक्सीने कोण आले म्हणून तिच्या गल्लीतले लोक टॅक्सीभोवती गोळा झाले. राधिका आणि तिचा मुलगा टॅक्सीतून खाली उतरले. ड्रायव्हरला पैसे दिले. या दरम्यान गल्लीतल्या लोकांनी तिला घेरले आणि तिच्याशी बोलू लागले. त्यात ती टॅक्सी निघून गेली. मग तिच्या लक्षात आले की, शॉपिंग बॅग गाडीतच राहिली. राधिका आणि तिच्या मुलाचा आनंद एका क्षणात मावळलाआता सगळे गल्लीतले लोक त्या दोघांवर हसू लागले. राधिकाची एक मैत्रीण म्हणाली, वर्षभरातली सगळी कमाई कुणी असं उडवतं का? राधिका मनातल्या मनात विचार करू लागली, मी तर फक्त माझ्या मुलाला एक आठवणीतला दिवस देऊ इच्छित होते.यात मी असं काय वाईट केलं? गल्लीतले सगळे त्या टॅक्सी ड्रायव्हरला बोल लावत होते. सगळेच राधिकाला म्हणाले, आता काहीच होणार नाही. सगळं मुसळ केरात! पण काही वेळातच टॅक्सीवाला परत आला. त्याने त्यांची शॉपिंग बॅग,त्यातले सगळे सामान परत केले. गल्लीतले लोक फक्त पाहातच राहिले.

 छोट्या छोट्या आनंदाचे क्षण जीवनातल्या मोठ्या आनंदाची पुंजी असते.



No comments:

Post a Comment