Saturday, January 20, 2018

हवामान अपडेट्सची प्रतीक्षा

     राज्यात मंडलनिहाय स्वयंचलित हवामानकेंद्रे उभारणीचे काम पूर्ण झाले असून लवकरच हवामानाचे अपडेट्स आणि पीक सल्ले शेतकऱ्यांना उपलब्ध होतील, अशा बातम्या वाचायला मिळत आहेत. ही बातमी राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची असून शेतकरी त्याच्या आधारावर पीकपाणी नियोजन करतील आणि यश पदरात पाडून घेतील, यातही काही शंका नाही. मात्र हवामान केंद्रे उभारली म्हणजे सर्वकाही झाले असे नाही. अजून त्याचे बाळंतपण मोठे आहे. हवामान अंदाज असा तसा निघत नाही.किमान मागील तीस-पस्तीस वर्षांचे हवामान अपडेट्स उपलब्ध होणे आवश्यक आहे. त्याशिवाय अंदाज व्यक्त करणे कठीण आहे.

     राज्यात जवळपास दोन हजारांवर ठिकाणी स्वयंचलित हवामान केंद्रे उभारण्यात आली आहेत. स्कायमेट नावाच्या एका खासगी कंपनीने ही यंत्रणा उभी केली आहे. या हवामान केंद्रामुळे लगेच हवामान डाटा उपलब्ध होऊ शकतो,मात्र सल्ल्यासाठी संशोधन, मागील हवामानाचा अभ्यास महत्त्वाचा आहे. यातून माहिती एकत्रित करून त्या आधारावर सल्ले देणे शक्य आहे.यासाठी नवीन यंत्रणा विकसित करण्याची आवश्यकता आहे. हवामान डाटावर आधारित अंदाज बांधताना त्यावर आधारित विभागाची स्थापना करावी लागेल. पीकनिहाय सल्ले देणारी यंत्रणा उभी करावी लागेल. तज्ज्ञ टीम उभी करावी लागेल. स्कायमेट ही खासगी कंपनी यासाठी किती उत्सुक आणि तत्पर आहे, हे पाहावे लागेल. खरे तर यासाठी राज्य सरकारने स्कायमेटला बरेच उदार धोरण स्वीकारत सवलतींचा वर्षाव केला असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे सरकारचीही जबाबदारी ही आहे की, सल्ला यंत्रणा तातडीने उभी राहण्यासाठी कंपनीला  सतत 'पुश' करावे लागणार आहे.
     सद्याचे हवामान खात्याचे अंदाज बरोबर येत नाहीत. बऱ्याचदा खाते तोंडावर आपटले आहे. यामुळे अंदाज कोणाच्याच उपयौगाचा ठरत नाही. त्यातून फायदाही होत नाही. आपल्या देशातील,राज्यातील शेती उन्नत पावायची असेल तर हवामान अंदाज अचूक यायला हवा आहे. गाव पातळीवर हवामान यंत्रणा सक्षम असेल तर अंदाज देण्यात अचूकता येणार आहे.यासाठी सध्या मंडलनिहाय हवामान केंद्रे उभारली आहेत. पुढे ती गाव पातळीपर्यंत जायला हवी आहेत. सरकारने यासाठी पावले उचलण्याची गरज आहे.


No comments:

Post a Comment