Friday, January 5, 2018

पालकांना वाचनाची गोडी लावली पाहिजे

     
मुलांच्या हातात कसलेही खेळणे दिले तर ते घेऊन मुले खेळत नाहीत; पण खेळणे आकर्षक असेल तर त्यासोबत मुले नक्की खेळतात. पुस्तकांचेही तसेच आहे. लेखनापासून त्यातील चित्र, सजावट, बांधणी... अशा चहूबाजूने पुस्तक आकर्षक पाहिजे. मग मुले नक्कीच पुस्तकांशी खेळतील. याचा अर्थ मुलांमध्ये वाचनसंस्कृती वाढविण्याची जबाबदारी ही केवळ लेखक-प्रकाशकांचीच आहे, असे नाही. पालकांचीही तितकीच आहे. मुले वाचत नाहीत, असे म्हटले जाते,त्याप्रमाणे मुले घरातील मोठ्या माणसांचेही अनुकरण करतात, असेही म्हटले जाते.त्यामुळे आधी पालकांमध्ये वाचनाची गोडी वाढायला हवी. तरच या गोष्टीचे मुले अनुकरण करतील. अलिकडे बालकुमार साहित्याची स्थिती मोठी चिंताजनक आहे. पण आजच्या विश्व बालकुमार साहित्यात अजिबात उमटत नाही, असे नाही. ते ज्या पद्धतीने यायला हवे, हे येत नाही. आपण काळाबरोबर असले पाहिजे. दुसरीकडे,कथा-कवितेत सर्रास इंग्रजी शब्द घुसवले जात आहेत. म्हणजे आपण लेखकच मुलांना बालपणापासूनच भाषेची नासाडी करायला शिकवतोय. आजची पिढी इंग्रजीत जास्त बोलते. म्हणून आम्ही अशा पद्धतीने लेखन करतोय, असे म्हणून चालणार नाही. प्रकाशकांनीही ज्याचा खप आहे, तेच प्रसिद्ध करू, ही वृत्ती बाजूला ठेवायला हवी. अशा सामूहिक जबाबदारीतून बालसाहित्याचा दर्जा वाढवता येईल. प्रौढ साहित्य आणि बालकुमार साहित्य यात दरी पडत चालली आहे. हे दोन प्रवाह जवळ आले पाहिजेत. यासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात बालसाहित्याला स्थान द्यायला पाहिजे. बालसाहित्यिक आणि बालकांचा, त्यांच्या पालकांचा  यात सहभाग वाढायला हवा.

No comments:

Post a Comment