Sunday, January 7, 2018

सावधान! तरुणांचे मानसिक स्वास्थ्य बिघडतेय

     आजच्या मानवाची जीवनशैली बदलली आहे. त्याचे प्रतिबिंब रोजच्या जीवनात दिसत आहे. त्याची छाया कुटुंबावर मोठ्या प्रमाणात पडल्याचे जाणवते.अशा परिस्थितीत आजची तरुणपिढी वावरतेने आहे. या जीवनशैलीचा पुरता प्रभाव या पिढीवर पडला असून त्यांचे मानसिक स्वास्थ्य बिघडल्याचे दिसत आहे. आजचे तरुण पटकन रागाला येतात. त्यांच्यात हट्टीपणा ठासून भरला आहे. कोणत्याही गोष्टीत टोकाची भूमिका घेताना दिसतात. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्याच्या वर्तणुकीकडे जाणीवपूर्वक लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. पुण्यातल्या एका महाविद्यालयात नुकतीच मानसिक आरोग्याची चाचणी घेण्यात आली. यातून मोठे धक्कादायक सत्य बाहेर आले आहे. आक्रमकपणा, नैराश्य, असमतोल विचारसरणी आदी लक्षणे तपासणीत आढळून आली आहेत. सध्या हे प्रमाण अडीच ते तीन टक्के असले तरी हा पालकांना इशारा आहे. मुलांशी संवाद, सलोखा राखायला हवा आहे. संवादातून एकमेकांचे गैरसमज दूर होतात.मतभेद मिटतात. अडचणीत मार्ग सापडतो, तर सलोख्याच्या भावनेतून उद्ध्वस्त होत चाललेल्या अथवा झालेल्या कुटुंबाची गाडी रुळावर येऊ शकते.

     आज घरात चारच माणसे आहेत,पण त्यांच्यातला संवाद हरवला आहे. मोबाईल,इंटरनेट आणि टीव्ही यांच्यामुळे घरातच लोक एकमेकांशी परकेपणाने वागताना दिसत आहे. जो तो या वस्तूंना चिकटून राहिला आहे. जीवनशैली बदलल्याने कामाच्या वेळा,कामाचा ताण यात माणसे गुरफटून गेली आहेत. यामुळे लोकांना एकांताची आवश्यकता असल्याने ही मंडळी घरी आल्यावर कोणाशी बोलायलाही तयार होत नाहीत. त्यांचे मित्र म्हणजे मोबाईल, लॅपटॉप आणि टीव्ही. ते त्यातच हरवून जातात. आई-वडील कामानिमित्ताने दिवसभर बाहेर असल्याने आपला मुलगा काय करतो आहे, हे पाहण्याची तसदी त्यांना घ्यावीशी वाटत नाही. विभक्त कुटुंब पद्धतीमुळे मुले एकलकोंडी बनत आहेत. अर्थात एकल कुटुंब पद्धती आजच्या घडीला अनिवार्य आहे. त्याला दोष देऊन चालत नाही. दोष त्याच्या अंमलबजावणीत आहे. पैशाच्या मागे लागल्याने आणि सगळे काही पैशात मोजण्याच्या मानसिकतेमुळे महत्त्व संगोपन, सांभाळ,नैतिकता या गोष्टीला नाही तर पैशाला आहे. मग घरातल्या एकुलत्या एक मुलाने आपल्या आयुष्याचे बरे-वाईट करून घेतल्यावर काय करायचे या संपत्तीला, असा प्रश्न आई-वडिलांना आणि समाजालाही पडतो. मात्र यातून बोध घेताना कुणी दिसत नाही.
     आपले भविष्य निश्चिंत करून माणसाने कुठे तरी थांबायला हवे. सात पिढ्या पुरुन उरेल इतकी संपत्ती जमा करून काय साध्य करणार आहोत? मुलगा नालायक निघाला की, सगळे मुसळ केरात! त्याला एवढी संपत्ती आयती करून दिल्यावर तो कशाला काम करेल? त्याच्या अंगी असलेल्या जिद्द,मेहनत,चिकाटी या यशाची वाट दाखवणार्या गुणांचा विकास होणार आहे का? माणसे यशस्वी झाली,पण आपल्या मुलांना तेच गुण द्यायला,रुजवायला ती विसरली. आपण कष्ट सोसले, मुलांच्या वाट्याला ते येऊ नये, या मायेच्या मानसिकतेतून त्यांनी मुलांना कष्ट होऊ दिले नाहीत. आपण समाजात वावरताना ज्या ज्या मान- अपमानाला सामोरे गेलो,त्यापासून ही मुले बचावली. त्यामुळे पुढे या गोष्टींना सामोरे जाताना मुलांना त्रास होतो. सहनशीलता त्यांच्यात नसते. त्यामुळे मुले पुढे कोण आहे,पाहत नाही. त्याचा अपमान करतो, मारहाण करतो किंवा मग स्वत:चेच बरे-वाईट करून घेतो. के टाळण्यासाठी मुलांना समाजात वावरायला शिकवले पाहिजे. परदेशात किशोर मुले स्वत:चा खर्च स्वत:च्या कमाईतून करताना दिसतात. त्यांच्यावर तसे संस्कार होतात. आपण मात्र आपल्या पाल्याला मोठा झाला तरी त्याला पॉकेटमनी देऊन पोसत असतो. बापाच्या पैशांवर तो मजा मारतो. बापदेखील पैसा आहे,म्हणून त्याचा हट्ट पुरवायला तयार होतो. त्याच्यासाठी वेळ द्यायला आपल्या फुरसत नाही, त्याची भूक तो पैशाने तोलतो आणि मुलाला पाहिजे तेवढी खर्चाची मोकळीक देतो.
     काही पालक आपली इच्छा आपल्या मुलांवर लादतात. मुलांना व्हायचं असतं वेगळंच! पण बाप म्हणतो डॉक्टर,इंजिनिअर हो. त्यासाठी पाहिजे तेवढा खर्च करण्याची त्यांची तयारी असते. मुलगा मात्र घरच्यांची इच्छा पूर्ण करताना मेटाकुटीला येतो. त्रास करून घेतो. यामुळेही त्यांचे मानसिक स्वास्थ्य बिघडते. सहनशीलता, अडजेस्टमेंट करून घेण्याची क्षमता संपली की माणसाचे आयुष्य, कुटुंब उदध्वस्त व्हायला वेळ लागत नाही. घरातील क्षुल्लक वाद-भांडणे मुलांच्या जीवनावर परिणाम करतात.कुटुंबात सलोखा आणि संवाद न घडल्यास अहंकार (इगो) कारणीभूत असतो. मी काय म्हणून माघार घेऊ, हा विचार जीवन नष्ट करतो. झुकना तो ज्ञानी की शान है- अकडना मुर्दों की पहचान है, असे म्हटले जाते. या गोष्टी पालकांनी स्वत:मध्ये अंगिकारल्या पाहिजेत आणि मुलांमध्येही उतरवल्या पाहिजेत.
     आज कामापेक्षाही कुटुंब स्वास्थ,जीवन स्वास्थ्य आणि स्वत:चे आरोग्य महत्त्वाचे आहे. शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता असून यासाठी कौटुंबिक संवाद,सलोखा निर्माण व्हायला हवा. पालकांनी याकडे अधिक लक्ष द्यायला हवे. आज तरुणांमध्ये वाढत चाललेला आक्रमकपणा, आक्रस्ताळपणा धोक्याची घंटा आहे. पालकांनी याला खतपाणी घालू नये. आज कॉलेज तरुण शिक्षक-प्राध्यापकांवरही हात टाकत आहेत.त्यामुळे शिक्षक मंडळीही बिथरली आहेत. मुलांना समजून सांगायला कुणी धजावत नाही,त्यामुळे पालकांवर आणि समाजावर मोठी जबाबदारी येऊन पडली आहे. स्वास्थ्यपूर्ण भावी पिढी निर्माण करायची असेल,तर सगळ्यांनीच यात योगदान देण्याची आवश्यकता आहे.

No comments:

Post a Comment