Sunday, March 11, 2018

यशासाठी कौशल्याला कष्टाची जोड हवी


     अनेक लोकांजवळ माहितीचे भांडार असते.मात्र ते त्याचा उपयोग करू शकत नाहीत,कारण त्यांच्याजवळ कौशल्य ही क्षमता नसते. त्यामुळे ती माणसे जीवनात यशस्वी होत नाहीत. आपल्याजवळील माहितीचा उपयोग करता आला पाहिजे. आपण ते आपल्या कृतीतून साध्य केले पाहिजे. काही माणसे खूप हुशार असतात. त्यांची स्मरणशक्ती चांगली असते.मात्र त्याचा त्यांनी आपल्या पुढच्या आयुष्यात उपयोग केला तर त्याला त्याचा फायदा होणार आहे. म्हणजेच फक्त आपल्याजवळ गुण असून चालत नाही तर जीवनात यश मिळवायचे असेल तर कौशल्य अंगी असणे आवश्यक आहे. 2016 साली एक पुस्तक प्रसिद्ध झाले आहे. ग्रीट: द पॉवर ऑफ पॅशन अॅण्ड पर्सेवरन्स (grit:the power of passion and perseverance) नावाचे हे पुस्तक अन्जेला ली डकवर्थ यांनी लिहिले आहे.

     डकवर्थ यांच्या म्हणण्यानुसार यशस्वी माणसे अपयशी झाल्यानंतरही थांबत नाहीत. ते न घाबरता, कुणाचा विचार न करता पुढे पुढे जात राहतात. काही लोकांकडे तर काहीच गुण नसतात.पण आपल्या आयुष्यात यशस्वी होतात. तर काही लोकांना आपल्या आयुष्यात यश आहे की नाही, याचा पत्तादेखील नसतो. पण अशी माणसे कोणतेही ध्येय न बाळगता किंवा त्याचा विचार न करता त्यांच्या कामाचा आनंद घेतात आणि स्वत:मध्ये सुधारणा करत असतात. अशी माणसे जीवनात यशस्वी होतात,कारण त्यांच्याकडे धैर्य असते.
     माझी एक मैत्रीण आहे, ती नेहमी म्हणत असते की माझ्या जीवनात काहीच चांगलं घडत नाही. कितीही काम केले तरी लोकांना त्याची पर्वा नसते. मला हवी ती गोष्ट मिळत नाही वगैरे वगैरे... पण ती खूप छान बोलू शकते. नाचू शकते. आवाज अगदी गायिकेसारखा नसला तरी ती छान गाऊ शकते. तिने मनात आणले तर ती छान लिहू शकते. एवढे सगळे तिच्याजवळ असताना ती मात्र माझ्या आयुष्यात फक्त संघर्ष आणि संघर्ष भरला आहे, असेच सांगत असते. खरे तर तिने तिच्या आवडीच्या गोष्टींकडे आणि कौशल्याकडे अधिक लक्ष दिले तर ती खरेच एक यशस्वी महिला ठरू शकते. आणि महत्त्वाचे म्हणजे ती आज यशस्वी शिक्षिका आहे. करायला गेले तर तिला यातदेखील करायला मोठी संधी आहे.
     आता तिचाच माझ्याविषयीचा दृष्टीकोन! तुम्हाला सगळं काही सहज मिळतं. तुम्ही पत्रकार आहात, लेखक आहात. शिक्षक आहात वगैरे वगैरे ती म्हणत असते. तुमच्या जीवनात सगळे काही मिळाले मग मला का नाही? असा तिचा असुया दाखवणारा प्रश्न असतो. अर्थात मला जेवढा लहानपणी संघर्ष करायला लागला, तेवढा संघर्ष पुढे करावा लागला नाही. अर्थात मी नोकरी लागल्यावर सगळे विसरून गेलो. लिहिण्या-वाचण्याचा छंद जोपासला. या व्यतिरिक्त काही घडलं नाही.त्यामुळे मी माझ्या आयुष्यात फार मोठी कामगिरी करू शकलो नाही. याचा अर्थ गुण असला तरी नोकरी हे ध्येय ठेवल्यावर त्यासाठीची धडपड संपली. आज मुले मोठमोठे आधिकारी होण्याची स्वप्ने बघतात.त्यासाठी मेहनत घेतात. पण ती मिळाल्यावर काय ध्येय राहणार आहे? शासकीय सेवेच्या माध्यमातून चांगले काम करत राहणे. पैसा तर मिळत राहतो. मात्र दुसर्या मार्गाने मिळणारा पैसा काहींना आकर्षित करत असतो. त्यांचे ध्येय फक्त पैसाच असतो.
     पैसा आजकाल फारच महत्त्वाचा आहे. जितका तो हवा आहे, तितकाच तो किंमत नसलेलाही आहे. म्हणून पैसा नको म्हणून चालणार नाही. फक्त त्याला कोठे ठेवायचे, हे आपल्या हातात आहे. पैसा नसलेल्या माणसाला किंमत नाही, ही आजची शोकांतिका आहे. त्यामुळे पैसे मिळवणे हे ध्येय बाळगणे चुकीचे म्हणता येणार नाही. पण त्याला आपल्यावर हावी होऊ देणं, आपल्याला महागात पडू शकतं. सरळ मार्गाने मिळाणार्या पैशांतला आनंद काही औरच असतो. आज एकेकाळी नावाजलेले डीएसके यांची वाताहत आपण पाहात आहोत. त्यांचे कुठे चुकले हे पाहात बसण्यापेक्षा चुकले हे महत्त्वाचे आहे.चुकीला माफी नाही. पाच हजारांहून अधिक ग्राहक त्यांच्याबद्दल तक्रार करत असतील तर त्यांचे कुठे ना कुठे बिनसले आहे, हेच म्हणायला हवे.
     मला सांगायचा मुद्दा असा होता की, आपल्याजवळ फक्त गुण असून चालत नाही तर मेहनतही आवश्यक आहे. गुण आणि मेहनत एकत्र आले की, कौशल्य साध्य होते. आणि कौशल्य आणि मेहनत एकत्र आल्यावर यश मिळते. त्यामुळे कौशल्यावर लक्ष द्या आणि यशाचा किनारा गाठा, हे सूत्र लक्षात ठेवायला हरकत नाही.

No comments:

Post a Comment