Friday, March 16, 2018

रोज नवे नवे... हवे हवे


ई-कचरा एक समस्या
दिवसेंदिवस नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत असल्याने, जीवनमान सुखद होत आहे. परंतु त्यामुळे निर्माण होणारा ई-कचरा ही मोठी डोकेदुखी ठरत आहे. राष्ट्रीय पातळीवर निर्माण होणार्‍या या कचर्‍यामध्ये महाराष्ट्र सर्वाधिक आघाडीवर आहे. आज या सदरात ई-कचरा व त्याचे दुष्परिणाम पाहणार आहोत. यामध्ये सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणे व साहित्य यांचा समावेश होतो. टी.व्ही, संगणक यासारख्या उपकरणांच्या ट्यूब खुल्या वातावरणात फोडून त्यातून काच, धातू व तांबे बाहेर काढले जाते. शिशाचा अंतर्भाव असलेली ही काच बेकरी, बांगडी विक्रेत्यांना विकली जाते. तसेच गरम करून ओव्हनमध्ये .वापरण्यासाठीही विकली जाते. या प्रक्रियेदरम्यान घातक असा फॉस्फरस बाहेर पडतो. टीव्ही उत्पादकांना सीआरटीसीची विक्री केली जाते. सर्किट बोर्डात सोनेरी आवरणाच्या ब्रास पीन्स, मायक्रोचिप्स व कण्डेन्सरला उष्णता देऊन विलग केले जाते, यामुळे अत्यंत विषारी धूर बाहेर पडतो. इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये ज्याप्रमाणे वेगवेगळे धातू वापरले जातात, त्याप्रमाणे वेगवेगळ्या रसायनांचाही वापर केला जातो. ही रसायने पर्यावरण व मनुष्यासाठी अत्यंत घातक आहेत. सध्या विविध प्रकारचा 3लाख 30 हजार मेट्रीक टन ई-कचरा निर्माण होत आहे. स्वस्त, कमी दर्जा असलेले वा जुने विविध प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य परदेशातून मुंबईच्या बंदरावर येते. या कचर्‍याचे अशास्त्रीय पद्धतीने वर्गीकरण केले जाते. या प्रक्रियेद्वारे हवा, पाणी, भूमी यांचे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होऊन त्यामूळे पर्यावरणाची हानी होत आहे.

अंगिकार सामाजिक मूल्यांचा
सामाजिक मूल्यांमध्ये धार्मिक कार्याचा मोठाच अंर्तभाव असतो. घरातले सणवार, चालीरिती, रूढी-पंरपरा हे सारे सूनेने यथायोग्य पद्धतीने चालु ठेवावे अशी अपेक्षा सार्वत्रिक असते. यात तिचा विश्‍वास, मर्जी, तिला उपलब्ध असलेला वेळ, शक्ती यांचा विचार कधीच कोणी करत नाही.
तीन-चार दिवस अनू तापाने फणफणली होती. कसेबसे उठून स्वयंपाक करत होती. सकाळी ती जागी झाली तर शेजारची सीमा तिला बघायला आली होती. अनूचा पती अजित घर झाडून काढत होता. अशक्त झालेली अनू ताडकन उठली अन त्याच्या हातातून झाडू काढून घेत म्हणाली ’मी काढते केर राहू दे’. खरंतर घर दोघांचं असते. परस्परांत कामाची वाटणी करण्यात चूक काहीच नाही. पण सामाजिक दबावाला बळी पडून स्त्री सार्‍या घरकामाची जबाबदारी स्वतःवर घेते. पुरूषाला घरकाम करायला लावले तर लोक नावे ठेवतील असे तिला वाटते. सामाजिक मूल्ये आणि निकष यांच्या धाकाने स्त्री लहानमोठी घरकामे, आल्यागेल्याचे कष्ट आणि सासरच्यांची सेवा अगत्याने करत रहाते. रोजच्या कामात वक्तशीरपणा, नीटनेटकेपणा आणि काटकसरीबरोबरच काटेकोरपणा स्त्रीकडून अपेक्षित असतो. घराची सफाई, स्वयंपाक-पाणी, लहान मुले व वृद्ध यांची कामे ठराविक वेळेत विशिष्ठ पद्धतीनेच पार पाडणे ती आपले इतिकर्तव्य समजते. यात कोठेही खंड पडला वा कमतरता निर्माण झाली तर त्यात स्त्रीचे अपयश मानले जाते. अगदी अडीअडचणीच्यावेळीही ही सारी जबाबदारी स्त्रीची मानली जाते. धार्मिक प्रथा पार पाडण्यातही पुरूषाचा फारसा सहभाग नसतो. मुलींना वाढवताना वेळोवेळी त्यांना त्यांच्या दुय्यम स्थानाची जाणीव करून दिली जाते. सामाजिक मूल्यांच्या अतिशयोक्त अंगिकाराने स्त्रीचा सार्‍या बाजूने मर्यादित आयुष्य जगण्याकडे कल वाढतो. स्वतःच्या बुद्धीचा, स्वतःविषयीच्या अपेक्षांचा स्वतःच्या लायकीचा, ज्ञानाचा सगळ्याचाच विचार गौण ठरवला जातो. सामाजिक अपेक्षांमध्ये सगळ्यात प्रभावशाली अपेक्षा ही स्त्रीच्या शरीराच्या आकर्षकपणाविषयी समजायला लागल्यापासूनच मुलींना शरीर शृंगाराचे प्रशिक्षण पद्धतशीरपणे दिले जाते. यातनामय प्रकारांनी नाक, कान टोचून घेणे, पार्लरमध्ये जाऊन त्रासदायक पद्धतीने सौंदर्यवर्धन करणे, विविध प्रकारचे गैरसोयीचे कपडे परिधान करणे हे तर आवश्यक मानले जाते. अनाकर्षक स्त्री समाजात जणू मान्यता पावत नाही. तरूणच नव्हे तर वृद्धत्वाकडे झुकलेल्या स्त्रीलाही हे निकष लागू होतात. कानातले अलंकार घालण्यासाठी केलेले, कानाच्या पाळीची छिद्रे, न वापरल्याने पूर्ण बुजलेल्या पाच स्त्रिया आपल्या परिचयात आहेत का? याचा विचार आपण करू शकतो. या सार्‍या प्रकारामुळे निसर्गाने दिलेल्या अत्यंत कार्यक्षम अशा मेंदूच्या वापराकडे स्त्रिने फारसे लक्ष देऊ नये, असे समाजाला आणि कुटुंबालाच नव्हे तर तिला स्वतःलाही वाटते. स्त्री एका सांस्कृतिक पिंजर्‍यात अडकली आहे आणि याची फारशी जाणीवही तिला नाही. पुरूषाची बरोबरी करण्याचा विचार बाजूला ठेऊन प्रथम तिने मानव म्हणून जगण्याचा विचार केला पाहिजे. न पेक्षा पिढ्यानपिढ्या स्त्रीत्वाच्या कालबाह्य कल्पना तिचे आयुष्य व्यापून टाकतील.

सरदार शितोळे वाडा
कसबा पेठेत कसबा गणपतीच्या मंदिराजवळ दर्शनी भागात नरसिंह वाचनालय अशी पाटी लावलेला एक भव्य जुना वाडा दिसतो. सरदार शितोळे या मराठेशाहीतील मातब्बर सरदारांचा हा वाडा. पुण्यातील हेरिटेज इमारतींमध्ये या वाड्याचा समावेश करण्यात आला आहे. सरदार शितोळे हे साधारणत: 15 व्या शतकात देशमुखीची वतने घेउन महाराष्ट्रात आले. शिवपूर्व काळात त्यांच्याकडे पुणे आणि आसपासच्या शंभर गावांची वतनदारी होती. ते त्यावेळच्या मुघल सुलतानांची चाकरी करत असत. नंतरच्या काळात ग्वाल्हेरच्या शिंदे घराण्याशीही शितोळे यांचे नातेसंबंध जुळले. या खानदानी वतनदारीच्या वैभवाची कल्पना या वाड्याचं आजचं जुनं रूप पाहूनसुद्धा करता येते. ‘नरसिंह भवन’ असं नाव असलेल्या या वाड्याचं बांधकाम मध्यप्रदेश आणि राजस्थानच्या स्थापत्यशैलीशी मिळतंजुळतं असल्याचं दिसतं. त्याच्या नक्षीदार कमानी, जाळीचे सज्जे आणि प्रवेशद्वाराची भव्य कमान या गोष्टींवरून या वाड्याचा इतिहास मोठा असणार हे वेगळं सांगावं लागत नाही.

रमाबाई रानडे
पुण्यासारख्या सनातनी शहरात स्त्रियांच्या हक्कांसाठी चळवळ उभी करणार्‍या काही पहिल्या महिलांमध्ये रमाबाई रानडे यांचा समावेश होतो. त्याकाळच्या प्रथेनुसार न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या इच्छेविरूद्ध त्यांचा दुसरा विवाह फक्त 11 वर्षे वयाच्या रमाबाईंशी लावून देण्यात आला होता. न्या. रानडे हे सुधारक विचारांचे असल्यामुळे त्यांनी रमाबाईंना शिक्षण देण्यास सुरूवात केली. मराठीबरोबरच इंग्रजी आणि बंगाली भाषाही त्या शिकल्या. पतीबरोबर सामाजिक कार्यात भाग घेणे त्यांनी सुरू केले. हे सर्व करताना त्यांना समाजाबरोबरच कुटुंबियांचा विरोधही सहन करावा लागला. त्यांनी स्त्रियांसाठीच्या कार्याला वाहून घेतले होते. रमाबाई या पुण्यातल्या सेवासदन संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा होत्या. हुजूरपागा ही पुण्यातली प्रसिद्ध मुलींची शाळाही त्यांनी सुरू केली. पुण्याबरोबरच मुंबईतही त्यांनी स्त्रियांसाठी आर्य महिला समाज स्थापन केला. न्या. रानडे यांच्या निधनानंतरही रमाबाईंनी खंबीरपणे आपले कार्य सुरू ठेवले होते. कैदी स्त्रिया, सुधारगृहातील मुले आणि रुग्णालयांमधील रुग्ण यांना नेमाने भेटून त्यांचे मनोधैर्य उंचावण्याचाही त्यांचा प्रयत्न असे. त्या काळाचा विचार करता हे खूप धाडसाचे कार्य होते.

थायलंडमधील नान्झाओ राजवट
बौद्ध तत्वज्ञानाचा खूप प्रसार झालेल्या थायलंड देशाचा गेल्या आठशे वर्षांचाच इतिहास ज्ञात आहे. त्याआधीचा इतिहास फारसा माहीत नाही. या देशात सुमारे 729 सालच्या सुमारास नान्झाओ राजवट अस्त्त्विात होती. पिलोग या तिथल्या एका लहानशा जमातीच्या प्रमुखाने ही राजवट प्रस्थापित केली. तिबेटियन लोकांची आक्रमणे थोपवण्यासाठी या राजानं त्या काळातल्या चीनच्या राजाबरोबर मैत्रीचा करार केला होता. या करारामुळे त्याचं सामर्थ्य वाढलं आणि त्यानं आजूबाजूच्या पाच प्रदेशांवर आपली सत्ता स्थापन केली. ‘लेक अर’ या ठिकाणी त्यानं आपल्या राज्याची नवीन राजधानी स्थापन केली. या ठिकाणची भौगोलिक रचना शत्रूच्या आक्रमणांपासून संरक्षण देणारी चीनची दोन आक्रमणे या राज्यानं परतवून लावली. भारत आणि ब्रह्मदेशाबरोबरच्या चीनच्या व्यापाराचे मार्गही नवव्या शतकाच्या सुमारास नान्झाओंच्या नियंत्रणाखाली आले होते. या राजवटीत थायलंडमध्ये कलाकौशल्य, सोन्याच्या आणि मिठाच्या खाणी, कुशल राज्यकारभार आणि रेशमी वस्त्रांचा मोठा उद्योग अस्तित्वात होता.

चंदीगढ
एकाच वेळी दोन वेगळया राज्यांची राजधानी असलेलं चंदीगढ हे शहर भारतातलं पहिलं नियोजनबद्ध रीतीने वसवलेलं शहर आहे. जागतिक कीर्तीच्या नगररचनाकारांनी या शहराच्या नियोजनासाठी काम केलं आहे. चंदीगढ, मोहाली आणि पंचकुला या तीन शहरांचं मिळून एक शहरसंकुल बनलं आहे. इथून पंजाब आणि हरयाणा या दोन राज्यांचा कारभार चालत असला, तरी हे शहर म्हणजे एक केंद्रशासित प्रदेशही आहे. भारत पाकिस्तानच्या फाळणीनंतर पश्‍चिम पंजाबबरोबर लाहोर शहर पाकिस्तानात गेलं. त्यानंतर चंदीगढला पंजाबची राजधानी बनवण्यात आलं. या शहराजवळ असलेल्या चंडीमातेच्या मंदिरावरून या शहराचं नाव पडलं आहे. इथली संस्कृती आणि लोकांचं जीवन हे आधुनिक शहरी पद्धतीचं आहे. अत्यंत विकसित अशा औद्योगिक पट्ट्यामुळे चंदीगढमध्ये आर्थिक समृद्धीही चांगली आहे. पंजाबी आणि हरयाणवी प्रथा परंपरांचा प्रभाव इथं मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे साहजिकच इथले सगळे सण उत्सवदेखील त्याच परंपरांप्रमाणे पार पडताना दिसतात. चंदीगढमधील रॉक गार्डन आणि झाकिर हुसेन रोझ गार्डन या बागा खूप प्रसिद्ध आहेत.

गोखले अर्थशास्त्र संशोधन संस्था
अर्थशास्त्र या विषयातील शिक्षण आणि संशोधनात्मक कार्य करणारी ही संस्था 1930 मध्ये स्थापन करण्यात आली. ही या प्रक ारची देशातील एक जुनी आणि नामवंत संस्था म्हणून ओळखली जाते. अर्थशास्त्र विषयातील पदव्युत्तर पदवी आणि डॉक्टरेट करण्याची सुविधा या संस्थेत उपलब्ध आहे. ही संस्था पुणे विद्यापिठाच्या आधीपासूनकार्यरत होती. विद्यापीठ स्थापन झाल्यानंतर इथले सर्व अभ्यासक्रम विद्यापिठाशी संलग्न करण्यात आले. शेतीवर आधारित अर्थशास्त्र या विषयावरही संस्थेने महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. या कार्यामुळे विद्यापीठअनुदान आयोगाने या संस्थेला 1962 मध्ये ‘सेंटर फॉर अ‍ॅडव्हान्स स्टडीज इन अ‍ॅग्रीकल्चरल इकॉनॉमिक्स’ म्हणून मान्यता दिली. या वास्तूतील गोखले यांच्या निवासाची खोली संस्थेने जतन केलेली आहे. मुख्यत: अर्थशास्त्र या विषयाला वाहिलेले या संस्थेचे ग्रंथालयदेखील खूप समृद्ध आहे.

No comments:

Post a Comment